पाळणा 

नंदाच्या घरी, रांगतो हरी |
पायी तोरड्या, बिंदल्या करी ||
जावळ माथी, रेशीमलडी |
रेशमी कुंची, गोंड्याची जोडी |
यशोदेचा पान्हा, दाटतो उरी ||
कृष्ण सावळा, नंदाचा बाळ |
तीट कपाळी, डोळा काजळ |
गालावर खळी,भाग्याची खरी ||
रांगता रांगता, खोडी काढतो |
मथणीची स्वये, दोरी ओढितो |
बाळमुठी दोन्ही, लोण्याने भरी ||
विष्णूचा अवतार, श्रीरंगबाळ |
भक्क्तिमुक्तीचा, खेळतो खेळ |
सारे चराचर, कवेत धरी ||
नंदाच्या घरी, रांगतो हरी ||