सटवाई 

चांगली बया गरती होते, मी शंभूची नार |
गंगा बसली डोकीवरती, सवतीचा ग कार ||
मला बया आवड व्हती, त्रिलोक फिरण्याची |
भक्तजनांची आंबिल बोणी, निवेद घेण्याची ||
निवेद भक्षुन रक्षन करते,पोरबांळांचे |
ब्रीद मिरविले माज्या माथी, आदिमायेचे ||
कुणी उपाशी कुणी नागडा, येता सामोरी |
स्वामीला मी सदा विनविले, चला तिथं झडकरी ||
सवत गंगा डोक्यावरती, भोळ्या सांबाच्या |
मुळी हलेना तिला सोडुनी, शंभू शिखरीचा ||
किती इनवण्या केल्या,परि तो दादच देईना |
शिवगण करिती नाद डमरुचा, भानच येईना ||
रडले, चिडले रुसले आणी, सोडी कैलास |
खाली उतरुन इथे उमटले, गावाच्या पास ||
येताळ, खंकाळ, भूत डाकिणी, घालिती थैमान |
गावकर्‍यांना रोगराई अन, चकवा बेभान ||
म्यापण यावर इचार केला, दावावे रूप |
आदिमाया म्हणून प्रकटले, दिधला मी शाप ||
भुते पळाली, डाकीण जळली, येताळ हडबडला |
मी हातीचा त्रिशूळ त्याच्या, पाठाणी हाणला ||
भक्त भाविका दिसले माझे, सटसटते बाण |
सटवाई म्हणूनी मजला दिधलं, शीमेवर ठाणं ||
इथलं माजं ठाणं दिसलं, शंभू द्येवाला |
कळवळला धनि, हितं धावला, मजला न्यायाला ||
ठाण्यावरुनी इथल्या मजला, उठताच येईना |
भोळा शंभू मजला सोडुनी, येथून जाईना ||
सवत झाली बहीण वदली, येथे मी र्‍हाते |
असेन गंगा गावशिवेचा ओढा मी होते ||
शिवशंभूने शबुद पाळला, नेले कैलासी |
गंगा म्हणुनी मला बशिवले, आपुल्या माथ्यासी ||
सटवाईची अशी कहाणी, आयाबायांनो|
 सवतीलाही बहीण माना, माज्या भगिनींनो ||
                                                                संत एकनाथ