एकनाथांचे रूपक ----थट्टा 

अशी ही थट्टा, भल्याभल्यासि लाविला बट्टा ||
ब्रम्हदेव त्रैलोक्याला शोधी | थट्टेने हरविली बुद्धी ||
केली नारदाची नारदी | अशी ही थट्टा ||
थट्टा दुर्योधनाने केली | पांचाळी सभेमाजि गांजिली ||
गदाघाये मांडी फोडिली | अशीही थट्टा ||
थट्टा गेली  शंभूपाशी | कलंक लागला चंद्रासी ||
भगे पीडिले इंद्रासी | अशी ही थट्टा ||
थट्टेने मेला दुर्योधन | भस्मासूर गेला भस्म होऊन |
वालीही मुकला आपुला प्राण | अशी ही थट्टा ||
थट्टा रावणाने केली | नगरी सोन्याची बुडविली ||
थट्टा ज्याची त्यास भोवली | बरी नव्हे थट्टा ||
थट्टेपासून सुटले चौघेजण | शुक, भीष्म आणि हनुमान |
चौथा कार्तिकस्वामी जाण | त्याला नाही बट्टा ||
एका जनार्दन म्हणे सर्वाला | थट्टेला भिऊन तुम्ही चाल ||
नाईतर नेईल नरककुंडाला | अशी ही थट्टा ||