यात्रा जगन्नाथपुरीची 

भारतात ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरीची यात्रा प्रसिद्ध आहे. साधारण जून जुलै महिन्यात आषाढ शुद्ध द्वितीयेला ही यात्रा सुरू होऊन द्वादशीला समाप्त होते. यावेळी जगन्नाथाचा रथ "पुरी" येथील आपल्या निवास स्थानातून निघून "गुंदिचा" येथील  मंदिराकडे जातो. गुंदिचा मंदिरात जगन्नाथाचा सात दिवस मुक्काम असतो. जगन्नाथाच्या रथाबरोबर कृष्ण व बलरामांचेही रथ असतात. हजारोंच्या संख्येने भाविक या रथयात्रेत सामिल होतात.
जगन्नाथ, बलराम, सुभद्रा यांचे हे रथ अवाढव्य असून ते लाकडाचे बनविलेले असतात. निष्णात कारागिरांकडून ते बनविले जातात. अर्थात हा मान वंश परंपरेने काही सुतार घराण्यांकडे दिलेला असतो. हे रथ इतके जड असतात की, जाडजुड दोरखंडांच्या सहाय्याने हजारो भाविक ते ओढून नेत असतात. झांजा, ढोल, मृदुंग आणि मंत्रघोष यांच्या गजरात या मिरवणुका पुढे पुढे सरकत असतात. "पहाडी" या नावाने ओळखल्या जाणार्‍या या मिरवणुकीत जगन्नाथाचा मोठा भाऊ बलराम याचा रथ सर्वात पुढे असतो. त्यानंतर सुभद्रेचा आणि सर्वात शेवटी जगन्नाथाचा रथ असतो. बलरामाच्या रथाला "तालध्वज", सुभद्रेच्या रथाला "दर्पदालन", तर जगनाथाच्या रथाला ''नंदीघोष",असे म्हटले जाते. जगन्नाथाचा "नंदीघोष" नावाचा रथ लाल व पिवळ्या वस्त्राने सजवला जातो. बलरामाचा "तालध्वज" लाल व निळ्या वस्त्राने सजविला जातो. आणि सुभद्रेचा "दर्पदालन" लाल व काळ्या वस्त्राने सजविला जातो. तिन्ही देवतांचे रथ सजवण्याची ही पद्धत परंपरेने चालत आलेली आहे. मूर्तीबाबतही परंपराच जपलेली आढळते. तिन्ही मूर्ती काष्ठाच्या बनविलेल्या असतात. त्यांच्या मस्तकावर त्यांना साजेसे असे पुष्पमुकुट भव्य पण प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये जपणारे असे असतात. त्यांच्या मुकुटांना "तहिआस" असे म्हटले जाते.
यात्रा पुरीमंदिरातून निघून गुंदिचा मंदिरात पोहचल्यावर मूर्तींना लगेच मंदिरात नेत नाहीत. रात्रभर त्यांना त्यांच्या त्यांच्या रथातच ठेवले जाते. आणि दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांना मंदिरात नेले जाते. यालाच "फंडी" असे म्हटले जाते. या गुंदिचा मंदिरात मूर्तींची पूजा, होमहवन,  इत्यादि  धार्मिक विधी  सात दिवस केले जातात.
दशमीच्या दिवशी "बहुदा यात्रा" असते.  या दिवशी तिनही  रथ पुन्हा पुरीच्या  मंदिरात जाण्यासाठी  निघतात. जाताना हे रथ "अर्धमाशिनी" मंदिराजवळ  थांबतात. ही देवी जगन्नाथाची मावशी आहे  असा समज आहे. तिथे करपलेल्या भाताची मूद म्हणजेच "पोडा पीठा" जगन्नाथाला दिला जातो.  व नंतर पुरीच्या मंदिरात ही यात्रा येते. दुसर्‍या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला जगन्नाथ, सुभद्रा,  व बलराम यांची वस्त्रे बदलून सोनेरी धाग्यांची सोनेरी वस्त्रे त्यांना परिधान करण्याचा समारंभ असतो.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला जगन्नाथ, सुभद्रा, बलराम यांच्या मूर्तींना गाभार्‍यात आणून
त्यांच्या सिंहासनावर विराजमान केले जाते.
या यात्रेत जगन्नाथ, सुभद्रा, व बलराम अशा तीन भावंडांचे रथ पुरी मंदिरातून बाहेर पडतात. जगन्नाथाची पत्नी लक्ष्मी हिच्या रथाचा त्यात सहभाग नसतो. "हिरापंचमी" म्हणजे पंचमीच्या दिवशी तिचा रथ बाहेर पडतो. आणि गुंदिचा मंदिरात नेऊन लगेचच पुरीच्या मंदिरात परत आणला जातो. याची आख्यायिका अशी सांगितली जाते की, जगन्नाथाने आपल्याला बरोबर घेतले नाही म्हणून लक्ष्मी रागावते. हा राग व्यक्त करण्यासाठी ती पंचमीला गुंदीचा मंदीरात जाऊन जगन्नाथाच्या रथाची मोडतोड करते, आदळआपट करते. आणि परत येते.
या यात्रेबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. सुमारे सातशे आठशे वर्षापूर्वी पुरीचा राजा अनंतवर्मन चोडगंगा याचा नातू अनंगभीमा देव हा राजा होता. त्याने जगन्नाथाला आपले कुलदैवत मानले. आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून तो राज्य करू लागला. त्यानेच या रथयात्रेला प्रारंभ केला. स्वतः राजा यात्रा सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या झाडणीने देवतांची सफाई करीत असे. ती प्रथा अजूनही तेथे आहे. त्यालाच "चेरा पहनरा" असे म्हणतात.