मराठी साहित्यातील फडके युग 

सन १९२० च्या आसपासच्या कालखंडात मराठी साहित्याच्या प्रांगणात ना. सी. फडके नावाचा साहित्यिक आपल्या लेखणीने आत्मविश्वासपूर्वक विहारकरू लागला. नाट्य, वृत्यपत्रिय लेखन,कादंबरी लेखन, लघुकथा, लघुनिबंध, प्रवास वर्णन,इत्यादि क्षेत्रात त्यांनी आपली लेखणी कुशलतेने चालवलीच पण त्याबरोबरच संगीत, क्रिकेट यासारख्या विषयावरही लेखन केले. उत्कृष्ट चित्रकाराबरोबरच ते उत्कृष्ट टिकाकारही होते. पण काव्याखेरीज इतरत्र वावरणारे हे नारायण सिताराम फडके लोकप्रिय झाले ते कादंबरीकार म्हणूनच.
प्रोफेसर फडके यांनी अनावश्यक वर्णने, सामान्याना आकलनास बोजड अशी भाषा, कृत्रिमता व भरकटलेले कथानक या सर्वातून मराठी कादंबरीला मुक्त केले. तिला नखरेल व सुटसुटीत बनवले.तिच्यात प्रणयाचे गुलाबी रंग भरले. चटकदार निवेदन व आल्हादकारक संवाद यांच्या सहाय्याने कादंबरीची रंजकता वाढते हे प्रो. फडके यांनी दाखवून दिले. लहानलहान पण नाजुक संवाद, छोटी सुटसुटीत वाक्ये, सधे सोपे आकलनीय असे शब्द यांच्या वापराने त्यांचे लिखाण आटोपशीर व बांधीव बनले. त्यांच्या कादंबर्‍या वाचताना अनेक नमुनेदार व्यक्तींची ओळख होते. अनेक रमणीय ठिकाणी भटकून येता येते. सुखदु:खाचे विविध पैलू, नियतीच्या लहरींचा खेळ अनुभवायला मिळतो. कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता रसिकांचे केवळ मनोरंजन करणे हाच त्यांचा कादंबरी लेखनामागचा उद्देश असे.
फडके यांच्या कादंबर्‍या चित्ताकर्षक, वैशिष्ठ्यपूर्ण तर आहेतच. पण त्यांच्या कथानकांना वेगही आहे. निसर्गाच्या सूक्ष्मनिरिक्षणाची त्याला जोड आहे. निसर्गाबरोबरच मानवी स्वभावाचे वास्तव व यथार्थ दर्शनही त्यांच्या कादंबर्‍यात आढळते. हे स्वभावरेखाटन करताना विविध प्रसंग, कृती, भाषा, वेशभूष यांचा आश्रय घेतल्याने त्यांच्या कादंबर्‍या अतिरंजित न वाटता रेखीव व उठावदार झाल्या आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांतील प्रकरणे वाचताना पुष्कळवेळा एखादा चित्रपटच नजरेसमोरून सरकत आहे असे वाटते. कथानकाच्या मध्यबिंदूपासून सुरूवात करून गतजीवनाचा चित्रपट उलगडण्याची खास पद्धत फडके यांनी मराठी कादंबरीत आणली. साम्यविरोध धर्मानुसार प्रसंगाची निवड करून मुख्य गोष्टीला अनुकुल वातावरण कसे निर्माण करावे ते फडके यांच्याकडून शिकायला मिळते. कादंबरीतून काय सांगायचे यापेक्षा ते कसे सांगायचे याकडे त्यांनी अधिक लक्ष पुरविले. निवेदनापेक्षा संवादाला अधिक महत्त्व दिले. त्याजोडीला प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोदाच्या सहाय्याने कादंबरी अधिक फुलविता येते हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या कादंबरीत त्यांनी संघर्षाला अधिक महत्त्व दिले. व्यक्तीव्यक्तीतील विरोध, व्यक्ती आणि परिस्थितीतील विरोध, मनाची द्विधा अवस्था, इत्यादि गोष्टी त्यांनी मोठ्या चतुराईने हताळल्या.
फडके यांच्या कदंबर्‍या तरूण मनात उचंबळणार्‍या भावनांचे मुग्ध मधूर स्वरूप व्यक्त करून दाखवणार्‍या आहेत. त्यांच्या कादंबर्‍यात सुंदर सुविद्य नायिका आणि हौशी, मनमोकळा,बोलका, धाडसी, सुंदर नायक प्रणयाइतकी जिव्हाळ्याची गोष्ट जगात दुसरी नाही असे गृहीत धरून हिंडत असतात. त्यांच्या गाठीभेटीही अगदी सहज घडतात. प्रणयासारख्या दुर्दम्य भावनेची विविध रूपे त्यांच्या कादंबरीत आहेत. त्या भावनेतील सूक्ष्म छटा , फरक, अडचणी त्यांनी दाखवून दिल्या आहेत. त्यांच्या कादंबर्‍यात तारुण्यातील प्रेमाबरोबरच चोरटे प्रेम, उत्कट स्नेहभाव, शारीरिक प्रेम, असफल प्रेम, व्यापारी प्रेम अशा प्रेमाच्या विविध रूपांबरोबरच मातृ पितृ आणि मित्रप्रेमाचीही झलक आहे. त्यांच्या कादंबर्‍या भाषा व कलाविलास या दृष्टीने जशा अभ्यासनीय आहेत तशा स्वभावरेखाटनाच्या दृष्टीनेही मार्गदर्शक आहेत.
थोडक्यात ना. सी. फडके यांनी वाचकांचे मानसशास्त्र ओळखले होते. प्रणयाबरोबरच वाचक खून, मारामार्‍या साहसे ,अपघात इत्यादि घटना आवडीने वाचतात हे त्यांनी जाणले होते. तसेच रसाळ संवाद, नाट्यपूर्ण प्रसंग, वात्रट खेळकर विनोद,सुंदर कर्तबगार व बुद्धिमान व्यक्तीरेखा वाचक अधिक पसंत करतात; सुष्टांना बक्षिस आणि दुष्टांना शिक्षा झाली तर वाचकांना अधिक समाधान मिळते, हे त्यांनी बरोबर हेरले. आणि म्हणूनच स्वतःच्या विद्वत्तेच प्रदर्शन न करता वाचकांच्याच आवडीला महत्त्व देऊन त्यांनी लेखन केले. आपल्या आत्मकथनात ते म्हणतात," मी जगलो ते साहित्य निर्मितीसाठी, मी जे जे उद्योग केले ते साहित्य निर्मितीचा हेतू डोळ्यासमोर ठेऊनच. केवळ स्वतःचे अनुभव समृद्ध करण्यात मी समाधान न मानता त्या अनुभवांची समृद्धी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी लेखन केले."