सुश्रुत 

ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील ही कथा आहे. लढाईत नाक कापलेला एक सैनिक एका शल्यविशारदाकडे गेला. त्या शल्यविशरदाने त्याला नाक पूर्वव्रत करण्याचे आश्वासन देऊन दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी आधी नाकाची जखम खरवडून त्या शल्यविशरदाने ती ताजी केली. नंतर त्या सैनिकाच्याच गालाचा ताज्या मांसाचा तुकडा कापला. आणि नाकाच्या जागी बसवला. मग त्याला व्यवस्थित पट्टी बांधली. श्वासोच्छवासास त्रास होऊ नये म्हणून कमळाचे देठ नाकपुडीत घातले. रक्तचंदन वनस्पतीचा रस जेष्ठमध पूड लावली. आणि अहो आश्चर्यम! काही काळातच त्या सैनिकाचे नाक व गाल जैसे थे झाले. अशा प्रकारे ख्रिस्तपूर्व काळात प्लास्टिक सर्जरी करणार्‍या या भारतीय शल्यविशारदाचे नाव होते सुश्रुत. सुश्रुत सतत नवनवे प्रयोग करीत असत. आतड्याची शस्त्रक्रिया करण्यातही ते पटाईत होते. ही शस्त्रक्रिया झाल्यावर आतडी शिवण्यासाठी ते चक्क मुंगळ्यांचा वापर करीत असत. आतड्याची कापलेली  टोके जुळवून चिमट्याने मुंगळ्यांना तेथे चावा घ्यायला लावत. मग ते त्या मुंगळ्यांचे शरीर तोडून टाकत.  व डोक्याचा भाग तसाच ठेवत. साहजिकच आपोआप टाका घातला जाई. काही काळानंतर मुंगळ्यांच्या नांग्या रोग्याच्या शरिरात आपोआप विरघळून जात. निकामी पाय कापून खोटा पाय लावण्याचे तंत्रही सुश्रुतांना अवगत होते. पोटाला शस्त्रक्रिया करून मूल जन्माला आणण्याचे प्रयोगही त्यांनी केले होते. इतकेच नाहीतर मोतीबिंदूसाठी आवश्यक शस्त्रक्रियाही ते करत असत.
सुश्रुत स्वतः प्रयोग करीत असतच पण त्याचबरोबर अध्यापनाचे कार्यही ते करीत असत. प्रात्यक्षिकावर त्यांचा विशेष भर होता. शरीर शास्त्राच्या अभ्यासासाठी ते मृत देह वापरीत असत. त्यासाठी ते बेवारशी मृतदेह मिळवत. ती प्रेते नदीच्या वाहत्या पाण्यात गवताने झाकून ठेवत. त्यामुळे शवाची कातडी काढणे त्यांना सोपे जाई. आणि शरिरांतर्गत अवयवांचा अभ्यास करणे शक्य होत असे.
ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात भारतातील हिमाचल प्रदेशात रहाणारे सुश्रुत औषधी विज्ञानाचे जाणकार होते. क्षयरोग्याला रोगमुक्त करण्यासाठी बकरीचे दूध हा रामबाण उपाय आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. ते स्वतःला विश्वामित्राचा शिष्य म्हणवून घेत असत. वेदातील शल्यकर्म ज्ञान व स्वतः प्रयोगातून मिळवलेले ज्ञान यावर आधारित त्यांनी लिहिलेला "सुश्रुतसंहिता" नावाचा ग्रंथ प्राचीन कळापासून प्रसिद्ध आहे.