प्राचीन भारतीय संशोधक-----कणाद, खन, आर्यभट्ट, भास्कराचार्य 

१.] कणाद  <=====>
भारतातील पहिला अणूशास्त्रज्ञ म्हणून कणाद मुनींचे नाव घेतले जाते. इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात ते जन्मले. सोमशर्मा हे त्यांचे गुरू होते. कणाद वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध होते. सुरवातीला ते कश्यप नावाने ओळखले जात. त्यांना ज्ञानग्रहणाची खूप आवड होती. ते सतत लेखनात मग्न असत. दिवसभर लेखन झाले की संध्याकाळी ते शेतात जात. आणि शेतात पडलेले धान्यकण खाऊन आपले पोट भरत. अशाप्रकारे कणकण गोळा करून उदरभरण करणार्‍या या ऋषींचे नाव 'कणाद' असे  पडले. घुबडाप्रमाणे रात्रीच्यावेळी बाहेर पडून पोट भरण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे लोक त्यांना 'उलूक' म्हणजे घुबड असेही म्हणत.
कणादांनी "वैशेषिक दर्शन" नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्य्रे त्यांनी आपले परमाणूविषयक विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या मते १.]  प्रत्येक द्रव्य हे त्या द्रव्यातील परमाणूंच्या संरचनेमुळे तयार झाले असते.  २.]  सर्व पदार्थाची उत्पत्ती व जडणघडण अत्यंत सूक्ष्म व अविभाज्य अशा परमाणूंपासून होते.  ३.]   परमाणूत तीव्र स्पंदने निर्माण झाली की प्रलयंकारी शक्ती निर्माण होते. पृथ्वीवर प्रलय निर्माण होतो व हे सर्व परमेश्वर घडवून आणतो.  ४.]  परमाणूंचा उपयोग कालमापनासाठी करता येतो. एक परमाणू म्हणजे  सेकंदाचा ३७९६७.७५वा भाग असे त्याकाळि मानले जाई.  ५.]  मानवी मनही परमाणूंच्या संयोगाने घडलेले असते.  ६.]  जगातील सर्वच वस्तू या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, व अभाव अशा सात पदार्थात विभागलेल्या असून या सर्वांचा मूळ घटक परमाणूच आहे . असे विचार कणादांनी मांडले आहेत.

२.] खन  <=====>
सहाव्या ख्रिस्तोफर शतकाच्या उत्तर काळी बंगालमध्ये खन नावाचे शेतीतज्ज्ञ होऊन गेले. सृष्टी निरिक्षण आणि वैज्ञानिक अनुभव या आधारे कृषीक्षेत्रात अनेक संशोधने त्यांनी केली. नांगरणी, पेरणी, लावणी,इत्यादिबाबत ते नवे नवे प्रयोग करत असत. नवे सिद्धांत मांडत असत. त्यासाठी "कृषीप्रसार" या प्राचीन ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता. कोणती जमीन कोणत्या पिकाला योग्य, कोणत्या पिकाला कशा प्रकारची नांगरणी आवश्यक आहे, कोणत्या महिन्यात पडलेला पाऊस कोणत्या पिकाला योग्य आहे, कोणत्या वर्षी दु:ष्काळ पडणार या बाबतचे अचुक मार्गदर्शन ते करीत असत. कृषीविषयक नवी तत्त्वे मांडणारा "कृषीप्रबोध" हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

  ३.] आर्यभट्ट  <=====>
इ.स. ४७६ मध्ये बिहार राज्यातील पाटणा शहराजवळ कुसुमपूर नावाच्या गावी आर्यभट्ट यांचा जन्म झाला. गणित व ज्योतिष शास्त्र विषयक त्यांची कामगिरी विलक्षण होती. त्यांचा "आर्यभट्टीय" नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात एकशे आठ आर्या म्हणजे श्लोक असून त्यातील तेहतीस आर्या भूमिती , बीजगणित, अंकगणित या विषयासंबंधी आहेत. त्रिकोण, वर्तुळ यासारख्या विविध भौमितिक आकृत्यांच्या क्षेत्रफळांची सूत्रे, विविध गुणधर्म, 'पाय'ची किंमत इत्यादि बाबतची सूत्रे आर्यभट्टांनी दिली आहेत. गणिताच्या इतिहासात त्रिकोणमितीतील "भुजज्या कोष्टक" हे  आर्यभट्टानी प्रथम मांडले. आंकगणितातील त्रैराशिक, वर्गमूळ, घनमूळ तसेच गणिती श्रेणीसंबधी प्रगत विचार व सूत्रे आणि नैसर्गिक संख्येच्या पूर्णांकांच्या वर्गाची बेरीज देणारी सूत्रे आर्यभट्टानी दिली आहेत. पृथ्वीची दैनंदिन गती जाणणारे आर्यभट्ट हे पहिले ज्योतिषी होते. 'पृथ्वी अक्षाभोवती फिरते' ही कल्पनाही त्यांनी मांडली होती. याशिवाय एका वर्षाचा कालावधी ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे १५ विपळे इतका आहे  हेही आर्यभट्टानी सिद्ध केले होते.

  ४.] भास्कराचार्य  <======>
 प्राचीन भारतातील महान गणितज्ज्ञ व शास्त्रज्ञ म्हणून भास्कराचार्य ओळ्खले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सन १११४ मध्ये झाला त्यांचे वडील उत्कृष्ट गणितज्ज्ञ होते. त्यांचाकडेच त्यांनी गणिताचा श्रीगणेशा केला. आणि मग आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याच्या बळावर"भास्कराचार्य म्हणून नाव कमावले. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी म्हणजे सन ११५० मध्ये त्यांनी "सिद्धांन्त शिरोमणी" हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये चार भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये अंकगणिताचे ज्ञान आहे. हा भाग काव्यात्मक आहे. या भागाला त्यांनी आपल्या मुलीचे "लिलावती" असे नाव दिले. या भागाला"पाटी गणित" असेही म्हणतात. त्याकाळात वापरात असलेल्या वजनामापाच्या एककापासून सुरूवात करून त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ इत्यादि प्रमुख वीस अंकगणितीय क्रियांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच त्रिकोण, चौकोन, वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, कोन, पिरॅमिड्स, आदि भौमितिक आकृत्यांबाबतचे सिद्धांत व त्यावरील सोपी व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत. दुसरा भाग बीजगणिताचा आहे. त्यामध्ये धन व ऋण चिन्हांची कल्पना मांडली आहे. याशिवाय शून्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. बीजगणिताची मांडणी सोपी व सुटसुटीत करण्यात भास्कराचार्यांचा मोलाचा वाटा आहे. सिद्धांतशिरोमणीचे "महागणिताध्याय" व "गोलाध्याय" असे आणखी दोन भाग असून त्यामध्ये भास्कराचार्यांनी ग्रह व त्यांची गती, अवकाश आदिंची चर्चा केली आहे. दिवसापेक्षाही कमी कालावधीत सूर्याच्या स्थानात सतत बदल होत असतो व हा बदल सर्व कालावधीत सारखाच असतो, हे त्यांनी दाखवून दिले.