गुढी पाडवा 

>हिंदू धर्मियांचा नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे गुढी पाडवा. हा सण चैत्र महिन्यात येतो. यालाच वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. साडे तीन मुहूर्तापैकी तो एक मानला गेल्याने कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ या दिवशी केला जातो. सकाळी लवकर उठून देवपूजा केली जाते. घराबाहेर अंगणात रांगोळी काढून गुढी उभारली जाते. व तिची पूजा केली जाते. गुढी तयार करण्यासाठी बांबूची काठी घेतली जाते. ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र व त्यावर एक लोटा बांधला जातो. त्यावर फुलांची व बत्ताशाची माळ बांधली जाते. व तिची पूजा केली जाते. घरात गोडाचे जेवण केले जातेच. पण या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कडू लिंबाची चटणी. त्यामुळे आरोग्य चांगले राखले जाते. कडू लिंबाची कोवळी पाने, मिरी,  हरभर्‍याची डाळ, ओवा, मीठ या वस्तू एकत्र करून ही चटणी वाटली जाते. सायंकाळि सूर्यास्तापूर्वी गुढीला हळदकुंकू लावून पूजा करून गुढी खाली उतरवली जाते.
या सणाच्या काही आख्ययिका आहेत. १. या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली.  २. आपला चौदा वर्षाचा वनवास संपून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले.  ३. याच दिवशी शालिवाहन नावाच्या राजाने शकांचा पराभव केला आणि त्याची आठवण म्हणून शालिवाहन शक सुरू करण्यात आला. इसवी सन आणि शालिवाहनशक यात ७८ वर्षांचा फरक आहे.
भारतीय कालगणना सूर्यावर आधारित आहे. त्याला सौर वर्ष असे म्हणतात. सूर्य ज्या दिवशी वसंत संपाती येतो त्याच्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे २२ मार्च पासून सौर वर्षाचा पहिला महिना सुरू होतो. भारताचे राष्ट्रीय सौर पंचांग २२ मार्च १९५७ या दिवशी सुरू झाले. हा दिवस चैत्र प्रतिपदा शके १८७९ होता असे शास्त्रीय आधाराने ठरवण्यात आले.