अक्षय्य तृतीया 

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. या तिथीला केलेले दान, पुण्य, हवन कधीही क्षयाला जात नाही म्हणजेच कमी होत नाही म्हणून हा दिवस "अक्षय्य तृतीया". देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते. या दिवशी केलेले पितरांचे श्राद्ध, जप, तप, दान, होम इत्यादि कर्मे पुण्यकारक ठरतात. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी, हिरे, मौल्यवान खडे, जमीन, घर खरेदी केल्यास ते लाभते. आणि अक्षय टिकते.या मुहूर्तावरकोणत्याही शुभकार्याचा, नोकरी-व्यवसायाचा आरंभ केल्यास त्यात यश मिळते. या दिवशी उन्हापासून संरक्षण करणार्‍या वस्तू म्हणजे छत्री, जोडे, उदक कुंभ दान केल्यासत्याचे चांगले फळ मिळते. तसेच तलम वस्त्रे, चंदन, पुष्पे, शीतल पेय, द्राक्ष, केळी, जल इत्यादि वस्तूंचेदान करावे असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
हिंदू धर्मात साडे तीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्त मानला जातो. पौराणिक संदर्भानुसार या तिथीला कृत युगाचा किंवा त्रेता युगाचा प्रारंभ झाल्यामुळे या दिवसाला "युगाब्दी" असेही म्हणतात. याच दिवशी श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशूरामाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी परशूराम जयंती साजरी केली जाते. वैशाख शुद्ध तृतीयेला पुनर्वसू नक्षत्रावररात्रीच्या पहिल्या प्रहरी भगवान परशूरामांचा जन्म झाला. अन्यायविरुद्ध लढणे आणि धर्म स्थापना करणे हे त्यांचे कार्य होते. चैत्रशुद्ध तृतीयेपासून सुरू झालेल्या चैत्रगौरी उत्सवाचे विसर्जनही याच दिवशी करतात. या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू करतात. आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे, ओले हरभरे आणि गजरा स्त्रियांना दिला जातो. चैत्रांगण ही विशेष रांगोळी याच दिवसात अंगणात काढली जाते.