झपूर्झा २ 

नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी ! पण शेतकरि-
सनदी तेथे कोण वदा
हजारांतुनी एखादा !
तरी न तेथुनि वनमाला
आणायाला। अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला-
"झपूर्झा -गडे- झपूर्झा !"

पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृति । क्रीडा करिती;
स्वरसंगम त्या क्रिडांचा
ओळखणें हा ज्ञानाचा
हेतु; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता--। प्रत ती ज्ञाता
वाडेंकोडे गा आता
"झपूर्झा -गडे- झपूर्झा !"

सूर्यचंद्र आणिक तारे
नाचत सारे । हे प्रेमभरें
खुडित खपुष्पें फिरति जिथे
आहे जर जाणें तेथे,
धरा जरा नि:संगपणा,
मारा फिरके । मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा,म्हणा-
"झपूर्झा -गडे-झपूर्झा !"

कवी: केशवसुत.