नातीगोती 

आपली भारतीय संस्कृती नात्यावर आधारलेली आहे. आणि म्हणूनच ती टिकून आहे. आपले सण, आपले उत्सव आपले रामायण ,महाभारत आदि ग्रंथ , आपली नाटके,इतकेच नव्हे तर आपल्या आजच्या टि. व्ही. सिरियल्सचे विषय या सार्‍यांचा केंद्रबिंदू नाते हाच असतो. नात्यांमध्ये व्यवहार नसतो, नसते कशाची अपेक्षा. तो असतो भावभावनांचा खेळ. विश्वासाच्या भक्कम पायावर नात्याची इमारत उभी असते. त्यात प्रेमाबरोबर रुसवे-फुगवे, रागावणे-भांडणे, सारेच सामावलेले असते. नाती तोडू म्हटली तरी तुटत नाहीत. उलट तुटलेली वाटली तरी आतून कोठेतरी घट्ट होत जाणारी अशी ही नाती असतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी जीवनाला प्रेरणा देणारी, जीवनाला अर्थ प्राप्त करून करून देण्यात नातीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच नात्याची जुळवाजुळव करण्यात आणि जुळलेली नाती टिकवून ठेवण्यातच सार्‍या आयुष्याची इतिश्री होते.
शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख प्राप्त करून देणारी नाती जन्मापासून सुरू होतात ती मृत्युनंतरही चालूच रहातात. म्हणूनच आम्ही अमक्यामक्याचे वारसदार आहोत हे सांगण्यात , वंशावळ गोळा करण्यात आणि कुलवृत्तांत कथन करण्यात माणसे धन्यधन्य होतात. आपण कोणाचे तरी आहोत आणि कोणीतरी आपले आहे ही भावनाच मानवी जीवनाला बळकटी देते. बोलता येत नाही, चालता येत नाही असे पाळण्यातले लहान मूलही गोंडस हसून नात जोडण्यासाठी हात पुढे करते. हीच नाती घट्ट पकडून ठेवण्यासाठी घरातली स्त्री दिवस-रात्र राबत असते .  सासू सासरे, दीर नणंदा, पती, मुले, सून, जावई आणि
अशाच नात्यांचा गोतावळा  सांभाळताना तिची दमछाक होते. पण तरीही नात्याची पकड तिला काम करण्याचा उत्साह देते. जीवनातून सारी नाती वजा करून अफाट संपत्ती गोळा केली तर होईल का जीवन सुखमय ? कोणासाठी ही धडपड असाच प्रश्न निर्माण होईल ना ? म्हणूनच जेथे रक्ताची नाती संपतात तेथे मानलेली नाती गोळा केली जातात कोणी कर्मावती राखीच्या सहाय्याने भवाचे नाते निर्माण करते तर कोणी मूल न झालेल अभागी जोडप मूल दत्तक घेण्याचा पर्याय निवडत. दुपारी एकटाच घरात रहाणारा बालजीव फोनवरून त्यासारख्याच एकाकी आजोबांशी मैत्रीच नात जोडून आपला एकाकीपणा कमी करतो.तर कोणी मीराबाई परमेश्वराशीच नाते जोडून त्याच्याच सेवेत तल्लीन होऊन जाते. कोणी पाळीव प्राणी आपलेसे करतो तर कोणी वृक्षासाठी प्राण द्यायला तयार होतो.आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात तर देशभक्तांनी सारी रक्ताची नाती तोडली आणि स्वदेशाशी नाते जोडून त्याच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण केले.
कामगार-मालक, शिक्षक-विद्यार्थी,अधिकारी व त्यांचे सहकारी, डॉक्टर-पेशंट, अशी व्यावसायिक नाती तर कळत- नकळत जुळत जातात. प्रारंभी असणारी श्रेष्ट-कनिष्ठाची जाणीव केंव्हाच गळून पडते आणि रुसवे फुगवे , भांडणे मतमतांतरे केंव्हा सुरू होतात ते कळतही नाही आणि जेंव्हा निरोपाचा क्षण येतो: तेंव्हा आत लपलेला प्रेमाचा पाझर नकळत डोळ्यावाटे पाझरू लागून नात निर्माण झाल्याची साक्ष देतो. कोणाशी मैत्री कोणाशी शत्रृत्व निर्माण झाले आहे ते त्या क्षणाला कळते. या नात्यांचीही गंमतच असते. मैत्री फुलवण्यासाठी जशी धडपड करावी लागते तशीच धडपड शत्रूत्वाच नात टिकवण्यासाठीही करावी लागते. एकमेकांवर कुरघोडी करण्यात वेळ कसा मजेत जातो. ' अपनी जीत हो उनकी हार हो ' अस म्हणत त्या नात्यातही आपण गुंततच जातो.
व्यावसायिक नाती ही अशी अनेक दिवसांच्या सहवासाने जुळतात. पण पाण्यातल्या बुडबुड्यांप्रमाणे क्षणात जुळणारी व क्षणात विरघरळणारी नातीही कमी नसतात. ती कोठे केंव्हा कोणाशी आणि कधी जुळतील ते सांगता येणार नाही. अपघातासारख्या आपत्तीच्या क्षणी कोण कुठचा येतो आणि कोणाला तरी मदत करून जातो. कोणी आंधळ्याला रस्ता पार करण्यात मदत करतील तर कोणी एखाद्या वृद्धेशी नातवाचे नाते जोडून तिला तिचे सामान न्यायला मदत करील. कोणी रक्तदान करील तर कोणी धनदान करील. आपण म्हणतो,"कोण कोठचा नात्याचा ना गोत्याचा तरी त्याने खूप केल हो." पण तिथेही नात असत मानवतेच. मनावर कोरलेले चांगले संस्कार अशी नाती जोडत असतात. आणि परोपकाराचा संदेश इतरांना देऊन जातात. पैशाने विकत घेता येणार नाही अस समाधान अशा नात्यातून मिळते. "मी कोणासाठी काही करू शकतो" किंवा उलटपक्षी "माझ या जगात कोणीतरी आहे." ही भावनाच एकमेकांना जीवनदायी ठरते. "स्वतःसाठी जगलास तर मेलास: दुसर्‍यासाठी जगलास तरच जगलास." असा संदेश ही नातीच देतात. गाडगेबाबा, बाबा आमटे आणि कुटुंबीय, डॉ. बंग पती-पत्नी अशा कितीतरी व्यक्ती समाजाशी, आपल्या परिसराशी नाते जोडून त्याचे भले करण्यात जीवनाची यथार्थता मानतात. तर या समाजसेवकांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांचे कार्य पुढे नेण्यास त्यांचे अनुयायी त्यंना हातभार लावतात.
उदबत्तीप्रमाणे क्षणभर प्रज्वलित झालेली आणि आठवणींचा सुगंध देऊन चर्चारूपी धूर सर्वत्र पसरविणारी चंदेरी दुनियेतील असफल प्रेमाची नाती जशी निर्माण होतात तशी दहशतवादी लोक,  गुंड लोक इत्यादिंशी नकळत जुळलेली तोडता येत नाहीत आणि धरताही येत नाही अशी विचित्र अवस्था निर्माण करणारी नातीही निर्माण होत असतात. राहत्या घराशी, शाळेशी, कार्यालयाच्या भिंतींशी, रेल्वे स्टेशनशीच नव्हे तर त्या ठराविक लोकलशी, जातायेत्या लागणार्‍या रस्त्यांशी आणि दुकांनाशी जी आपुलकीची भावना मनात निर्माण होते तेही  निर्जीवांशी जुळलेले एकप्रकारचे नातेच नाही का ?
तर अशी ही असंख्य नाती. काही रक्ताची, तर काही मानलेली, काही लादलेली तर काही गरज म्हणून निर्माण झालेली , काही क्षणात निर्माण झालेली तर काही वर्षानुवर्षे एकत्र राहूनही 'न आत ये ' असे म्हणणारी, काही फसवी तर काही धुमसणारी. अशी अनेक प्रकारची नाती जपत जपतच प्रत्येकाचे आयुष्य पुढे सरकत असते. जणू सारी धडपड ही नाती जपण्यासाठीच. सुख दु:खाचे कंगोरे घेऊन जन्मलेली ही नाती आयुष्यभर अगदी कहीना काही आठवणींचे धुमारे फुलवत रहातात. आशा निराशेचा खेळ दाखवत रहातात. नकळत झालेल्या चुकांचा हिशेब मांडण्यात आणि त्यातून निर्माण झालेला नात्याचा गुंता सोडवण्यात आलेल्या वृद्धापकाळाचा विरंगुळा बनतात.