उधई 

 बरेच दिवस झाले. घरात  झाडझुड करीत असताना कपाटाचे एक दार पूर्ण पोकळ झालेले दिसले. हाताने त्यावर मारले तर एक पट्टीच निघून आली. सगळी फळीच भुसभुशीत झाली होती. नीट निरखून पाहिलेतर त्यात पिवळट पांढर्‍या रंगाची हालचाल होत असताना दिसली. माझ्या यजमानांना ताबडतोब ही गोष्ट मी दाखवली तर ते म्हणाले, " अग ही वाळवी  आहे. पटकन हालचाल केली पाहिजे नाहीतर सार फर्निचर खराब होणार." कपाटाच दार बाहेर फेकून दिल आणि पेस्ट कंट्रोल एजन्सीला फोन करुन उपाययोजना करुन घेतली.

खर तर सार फर्निचर नवीनच करुन घेतल होत. पॉलिश, ऑइलपेंट करुन सुदधा कपाट वाळवीच्या  भक्षस्थानी पडल होत. माझ्या काटकसरी स्वभावानेच दगा दिला. "सागवानाच फर्निचर करुन घेऊ" अस मिस्टर म्हणाले  होते. पण मीच ऐकल नाही. आमच्या गावाच्या घराला  सागवानाचा वापर करुन कधीकाळी तयार केलेले दरवाजे, फर्निचर तसच आहे.  आणि आम्ही  दोन वर्षापूर्वी केलेले हे प्लायवूडचे  कपाट नष्ट झाल; याच कारण कागद आणि प्लायवूड खाणे हा वाळ्वीचा छंद असतो. हे आता मला समजले. पॉलिश किंवा ऑईलपेंटच्या थराखालूनही ती लाकूड असे कुरतडते की वरचा रंगाचा थर तसाच रहातो आणि त्यामुळे कित्येक दिवस घरात वाळवीचे आगमन झाले आहे हे आपणास समजतच नाही.

वाळवीला उधई असेही म्हणतात. शास्त्रीयदृष्ट्या "आईसोप्टेरा" या वर्गात मोडणारे हे कीटक आहेत. समुहाने वस्ती करुन राहण्याच्या या किटकांच्या  अनेक जाती आहेत. सामान्यत:  या पांडुखर्‍या पिवळट रंगाच्या असून  त्यांच्या पोटाचा भाग  रुंद  असतो. त्यांच्या तोंडा जवळ दोन  ठिपकेदार  तुरे  असतात.  त्याला लागून दोन अणकुचीदार नांग्या असतात. त्यांच्या सहाय्याने वाळवी लाकूड, झाड, फर्निचर  अशा  गोष्टींचा  फडशा पाडत असते. अंधार्‍या व ओलसर जागी त्या वस्ती करतात. कोरड्या हवेत त्या टिकून  राहू शकत नाहीत. आपल्या वस्तीत त्यांना जीवन जगण्यास आवश्यक असे उष्णतामान  व आर्द्रता कायम ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असते.  त्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे कठीण जाते.
 जामिनीखाली,झाडात झाडांच्या बुंध्यांत, भिंतीत अंधार, ओल व लाकूड असेल तेथे यांची वस्ती असते, कारण लाकडातील पिष्टमय पदार्थ पचवण्याची ताकद त्यांच्यात असते. एका वस्तीत दहा लक्ष इतक्या प्रचंड संखेने त्या राहतात.

वाळवीचे प्रजनन फार मोठ्या संखेने  होते. वय  व  आकार  यानुसार  वाळ्वी   दिवसभरात  ३६०० अंडी  देउ शकते. ५० वर्षा पर्यंत तिची ही क्षमता टिकून असते.मुंग्यांप्रमाणे वाळवींमध्ये राणी वाळवी असते. तिचा आकार नरापेक्षा मोठा असतो. मुंग्यांप्रमाणे त्यांच्या वस्तीमध्ये कामकरी वाळवी व सैनिक वाळवी असे प्रकार असतात. अन्न जमा करणे,वस्तीतील इतर वाळवींची काळजी घेणे. ही कामे कामकरी वाळवी करते. वस्तीच्या रक्षणाची जबाबदारी सैनिक वाळव्यांकडे असते. त्यांचे जबडे मोठे व नांग्या धारदार असतात. लाकडातील पीष्टमय पदार्थ,जंतू,आपलीच विष्टा, मृतवाळवी हे त्यांचे अन्न असते.