आरक्षण 

'विठ्ठल दर्शनासाठी आरक्षण' ही बातमी वाचली आणि उडालोच. पंचवीस वर्षापूर्वीचा काळ झरझर डोळ्या पुढून सरकून गेला. इंजीनिअरींगच्या शेवटचा वर्षीच्या रिझल्टची वाट बघण्याचा ,नोकरीची प्रतिक्षा करण्याचा तो काळ. देवावरची श्रद्धा, भक्ती म्हणून म्हणा किंवा वेळ जायच एक ठिकाण म्हणून म्हणा नक्की काय ते मला आठवत नाही. पण दर मंगळवार,शनिवार मी देवळाच्या रांगेत उभा असायचो. भली मोठी रांग असायची. एक दोन तास तरी मजेत जायचे. एकेक माणसांचे नमुने बघायला मिळायचे, मित्रांशी गाठीभेटी, गप्पाटपा येथेच व्हायच्या. तरुणींचेही दर्शन व्हायचे. शेरे ताशेरे पास व्हायचे.  मजा असायची. देवाच्या कृपेने ७-८ महिन्यातच नोकरी व छोकरी ही याच काळात मिळाली. हो! माझी पत्नी चारुताची ओळख देवळातच झाली.देवळातील गर्दी हवीहवीशी वाटू लागली. कारण गर्दी जास्त तशी रांगही मोठी. आणि एकमेकांचा सहवासही अधिक. लग्नाच्या बंधनात कधी अडकलो  कळलच नाही.मग दोघही राजरोसपणे नियमित देवळात येऊ लागलो.

असच दीड वर्ष गेल चारुता आई आणि मी बाबा झालो. तशी बिचारी चारुता घरातच अधिक अडकू लागली. मग वेळ मिलेळ तसा आम्ही एकेकटेच देवळात बिनगर्दीच्या वेळी जाऊन दर्शन घेऊ लागलो. आणखी तीन वर्षांनी दुसर्‍या  अपत्याचा जन्म झाला. मग चारुता घर, नोकरी, बच्चेकंपनी यात पुरती अडकून पडली. आणि देवदर्शनाची जबाबदारी मी एकट्या माझ्यावर घेतली. झालं. चार सहा  महिन्यातच चारुताने एक पुस्तक माझ्याकडे  दिले.  म्हणाली, "वाच ही गोष्ट". मी गोष्ट वाचली. त्याचा सारांश असा होता की देवळातील गर्दी, भजन, आरत्या, लाऊडस्पीकर यांना कंटाळ्लेला देव निवांतपणा शोधता शोधता शेवटी माणसाच्याच हृदयात जाऊन बसला.

कथा वाचली आणि मी चारुताकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागंलो. ती म्हणाली, "अरे देव आपल्याच हृदयात आहे ना? मग कशाला देवळात जातोस? घरातच बसून करना पूजा.आणि म्हणना प्रार्थना. मुलांच्याही कनांवर चांगल काही पडेल." बायकोच्या हुशारीच कौतुक वाटून मी घरातच पूजा करु लागलो.  पूजापाठ, प्रार्थना यात बराचवेळ जाऊ लागला.  अशी चार पाच वर्ष गेली. मुले मोठी होत होती. ऑफिसमध्ये माझ्याही जबाबदार्‍या वाढल्या. प्रमोशन मिळाल. आणि वेळ अपुरा पडू लागला. वेळातवेळ काढून कशी करायची पूजा काही समजेना. पुनर्नियोजन करण्यासाठी मी चारुताकडे गेलो. त्याबाबत बोललो. "कसा वाचवूया ग वेळ पूजेसाठी ?" चारच दिवसात चारुताने पुन्हा एक पुस्तक माझ्याकडे दिल आणि वाचायला सांगितल. नारायण आणि नारदाची गोष्ट होती. "सतत नारायण नारायण अस नामस्मरण करणार्‍या भक्तापेक्षा  सकाळ संध्याकाळ देवाच्या  फोटोला केवळ नमस्कार करून कामावर जाणारा शेतकरीच देवाला अधिक प्रिय होता.हे ऐकून रूसलेल्या नारदाला समजवण्यासाठी देवाने तेलाने काठोकाठ भरलेली वाटी दिली. आणि आजिबात एकही तेलाचा थेंब न सांडता डोंगरावरील देवळतील मूर्तीला वहाण्यास सांगितले. नारदाने काम चोख पूर्ण केले  पण या काळात तो नारायण नारायण म्हणायला विसरला. देवाने प्रेमाने त्याला जवळ घेतले. म्हणाला,"नाही माझे नाव घेतले तरी चालेल रे! पण माझ काम मात्र चोख झाल पहिजे.तो शेतकरी माझे नाव न घेता मी दिलेल शेतीच काम चोख करतो म्हणून तो मला आवडतो."अशी ती गोष्ट होती.

याही वेळा मी गोष्ट वाचली. चारुताकडे  प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. ती म्हणाली, " शेवटचे वाक्य पुन्हा मोठ्याने वाच ". मी वाचले.  म्हणाली," आपणही तसच करायच. वेळ महत्त्वाचा.  नोकरी आणि तेवढेच काम महत्त्वाच. ते काम म्हणजेच परमेश्वर आहे असे समज ते प्रामाणिकपणे कर. सकाळ संध्याकाळ  देवाला फुल घाल. हात जोड  म्हणजे झालं.

चारुता खरच हुशार. तिच्या म्हणण्याप्रमाणे मी वागू लागलो. वेळ वाचला. बॉसची काम काटेकोर पणे करू लागलो. मन लावून केलेल्या अचूक कामामुळे बॉस खुश झाला. आणखी प्रमोशन, पगारवाढ, आनंदीआनंद पदरात पडू लागला.

आज सकाळी  "देव दर्शनाच्या आरक्षणा"बाबतची बातमी वाचली.संध्याकाळी जेवताना चारुताला ती सांगितली.आणि म्ह्टले "आता देवदर्शनासाठी आरक्षण म्हणजे देवळात भक्तांच्या रांगा काही दिसणार नाहीत. मला सांग देवळातील रांगा अशा नाहीशा झाल्यात तर माझ्यासारख्या पुरुषांना तुझ्यासरखी चारुता आता कुठे व कशी मिळणार ?" बायको खरच  हुशार. आता तीने कोणतच पुस्तक माझ्यापुढे केल नाही,.म्हणाली "अहो प्रत्येक सजीवात  परमेश्वर असतो हे  आपण शिकलो.तसा प्रत्येक झाडातही प्रमेश्वर असतो. आता देवळांऐवजी सरकारने तुमच्यासारख्या तरुण भक्तांसाठी मोकळ्या जागा  राखून ठेवाव्यात. तेथे प्रत्येक भक्ताने एक झाड लावावे. परमेश्वराचे काम समजून त्याला नियमित प्रामाणिकपणे  खतपाणी घालावे. झाडांना वाढवावे.  ती वाढता वाढता तरुण तरुणींचे प्रेमही वाढेल. तुमच्यासरख्या पुरुषांना माझ्यासारख्या चारुता नक्कीच मिळतील.शिवाय पर्यावरणाचा तोलही सांभाळला जाईल."

  पत्नीचा हा सल्ला ऐकला आणि तिच्या हृदयातील परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून मी कामाला लागलो.