मुक्तता 

"मुक्त आम्ही स्वतंत्र आम्ही" असे म्हणून आपलीच पाठ थोपटणारे आपण, मुक्ती आणि स्वातंत्र्य याचा खर्‍या अर्थाने कधी विचार खरच करतो का? असा प्रश्न अनेकवेळा माझ्या मनात उपस्थित होतो. मुळातच जे बांधल आहे ते मोकळ सोडल की मोकळेपणा येतो हे खर. पण ही बांधिलकी आपल्यावर केंव्हा आणि कोणी लादली ?
माणसाचा जन्म होणे हीच मुळी मुक्तता. नऊ महिने आईच्या पोटात कसल्या कसल्या घाणीत खितपत पडलेले आपण, नऊ महिन्यानंतर मोकळा श्वास घेतो, तोही रडतच. मातेच्या उदरातून मुक्तता झाली. आता स्वतंत्रपणे जगायच याचा आनंद तेंव्हाही का होत नाही? ती स्वातंत्र्याची भीती असते कि पुन्हा नव्याने बांधले जाणार म्हणून जीव घाबरा होतो ? काहीच कळत नाही. एवढच जाणवत की नऊ महिन्यानंतर स्वातंत्र्य मिळूनही आपण रडत रडतच या जगात प्रवेश करतो.
मानवाच्या प्रारंभिक अवस्थेत मनुष्य पूर्णपणे मुक्त होता. पशुपक्षासारखा नागडा उघडा भटकत होता. मिळेल ते, मिळेळ तस, मिळेल तेंव्हा खात होता. मनसोक्तपणे कोठेही विहार करत होता. पण या मुक्ततेत होती भीती. ती भीती नष्ट करण्यसाठी प्रगतीचा विचार त्याच्या मनात आला. आणि मग गम्मतच झाली प्रगतीबरोबरच मानव एकेका बंधनात अडकू लागला. मुक्ती, भीती , प्रगती, आणि बांधिलकी असा हा मानवाचा प्रवास.
थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून संरक्षण हव म्हणून अंगाभोवती झाडाची पाने,वेली,मग कपडे तो लपेटू लागला, इतर प्राण्यांपासून संरक्षण म्हणून गुहेत राहू लगला. मग गुहेतून घरात आला. आणखी संरक्षण म्हणून घराभोवती कुंपण आल. मुक्त माणूस बंधनात अडकला तो असा भीतीपयी. याच भीतीतून चार माणसे एकत्र राहू लागली. चाराची आठ, आठाची सोळा,अस होता होता समुह आणि समुहाचा समाज बनला. पण म्हणून भीती कमी झाली अस नाही. आता समुहाला, समाजाला आपल्याच माणसंची भीती वाटू लागली. त्यांनी सर्वांना मान्य असे नियम तयार केले. इतकच नाही तर नियम तोडणार्‍याला शिक्षाही ठरविल्या. आणि मग मनुष्य पुरता अडकला सामाजिक बांधिलकीमध्ये. हक्क, कर्तव्य, जबाबदार्‍या या सार्‍यात आपणच आपल्याला बांधून टाकलय. बंधन तोडली तर इतरांपसून वेगळ होऊ ही भीती. समाज काय म्हणेल, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया काय असतील , आपल्या कृतीचा भविष्यकालिन परिणाम काय होईल,या  सार्‍या भीतीमुळे आपणच आपल्याला बंधनात घट्ट लपेटून घेतो. जणु ही बंधने आपली कवचकुंडलेच. शिक्षण,नोकरी,लग्नसंबंध या सार्‍याच प्रश्नांचा विचार आपण स्वतःला बंधनात गुरफटवून करीत असतो. केवळ मला एखादी गोष्ट कराविशी वाटते म्हणून मी ती करणारच असे म्हणणारे फरच थोडे. पण तेच असतात खरे निर्भय ,मोकळ्या विचारांचे. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारे,असे हे लोकच मुक्ततेचा खरा आनंद उपभोगू शकतात. पण असा आनंद उपभोगत असताना, प्रगती करणे शक्य होईल असे वाटत नाही. प्रगतीसाठी काही बंधने स्वतःच स्वत:वर लादून घेणे आवश्यक आहे.
रस्त्यावर उघडीनागडी फिरणारी, दगडाधोंड्यात खेळणारी, चिखलात लोळणारी मुले पाहिली कि मुक्तताम्हणजे काय ते अनुभवता येते. ना समाज काय म्हणेल याची भीती, ना उद्याची चिंता.मनाला येईल तस जगायच,मिळेल ते खायच, हव तेंव्हा हव तेवढ हसायच्,आणि रडायचही तसच. मोठमोठ्याने बोलायच आणि कशाचीही लाज न बाळगता, मिळेल ते काम करायच. हेच त्यांच मुक्त आयुष्य. अस्सल नैसर्गिक जीवन ते हेच. याउलट मोठमोठ्या इमारतीत बंदिस्त ब्लॉकमध्ये रहाणारी मुले शरिराबरोबरच मनानेही बंदिस्तच असतात. मोजकच बोलण आणि कृत्रिम वागण. सदैव धास्तावलेली ही मुले खर्‍या अर्थाने मुक्ततेचा आनंद उपभोगूच शकत नाहीत. लहानांच हे आपल एक उदाहरण. मोठ्यांच विश्व तरी यापेक्षा वेगळ असत का?
पण एक मात्र खर. जिथे बंधन आहेत तिथे प्रगती आहे. मग ती बंधने स्वतःच स्वत:ला घातलेली असोत, कि इतरांनी लादलेली असोत. आचारविचारांच, बोलण्याचालण्याच, काळवेळाच बंधन थोडफार जो स्विकारेल, त्याचे प्रगतीच्या मार्गावर स्वागतच होईल.