मातृशक्ती 

परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे मानव. ज्ञानग्रहण करण्यासाठी पंचेंद्रिये, ग्रहण केलेले ज्ञान समजण्यासाठी आकलनशक्ती, समजलेले लक्षात ठेवव्यासाठी स्मरणशक्ती,स्मरणातील ज्ञानाबाबत चांगल्या वाईटाचा विचार करण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी,आणि या सारासार विवेकबुद्धीने नवनिर्मिती करण्यासाठी दोन हात हे सार काही त्या परमेश्वराने आपल्याला दिले. इतकेच नव्हे तर विविध आवाज काढण्यासाठी स्वरयंत्रही बहाल केले. अन्न वस्त्र निवार्‍याचीही सोय केली. जे जे काही शक्य होते, ते ते सर्व मानवाच्या ठायी अर्पण करून त्या जगन्नियंत्याने आपल्या या विश्व निर्मितीच्या कामाला आटोपते घेतले. त्यानंतर त्याच्या हातून दुसरी निर्मिती झालीच नाही.

अशा प्रकारे परिपूर्ण असा मानव परमेश्वरांने स्वतः निर्माण केला. आणि त्यानंतर असे असंख्य मानव निर्माण करण्याची जबाबदारी त्याने स्त्रीवर सोपविली. स्त्रिला मिळालेल्या या शक्तीला आपण मातृशक्ती म्हणतो. या मातृशक्तीमुळे स्त्री निसर्गतःच श्रेष्ठ ठरली आहे. कारण परमेश्वराचे कार्य ती करणार आहे. नवमानव निर्मितीचे कार्य हे परमेश्वराचे आहे, म्हणून ते चांगलेच झाले पाहिजे याची जाणीव मात्र प्रत्येक स्त्रिला हवी. ही निर्मिती करण्यासाठी स्त्रिला पुरुषापेक्षा जास्त काही विशेष गुण बहाल केले आहेत. सहनशीलता, मृदुता, क्षमाशीलता, वात्सल्य, आणि पवित्रता या गुणांचा संगम म्हणजे माता. पण याव्यतिरिक्त काही परस्पर विरोधी गुणही मातेच्या ठीकाणी आढळून येतात. माता जितकी सहनशील असते तितकीच ती हळवीही असते. तिच्या स्वभावात मृदुता असते तितकीच ती कठोरही होऊ सकते. प्रसंगी वाघिणिसारखी चवताळून उठणारी माता क्षणात मेणाहूनही मऊ होते. वात्सल्याने मुलाच्या पाठीवर प्रेमाने फिरणारा तिचा हात मुलाच्या हातून चुका होताच कसे रट्टे देतो याचा अनुभवही सर्वांनी घेतला असेल. प्रीती, भक्ती, मैत्री या सार्‍या भावना मातेच्याच ठिकाणी एकवटलेल्या आढळतात. जगातील प्रत्येक वस्तूला पर्याय सापडेल पण मातेला पर्याय नाही. आणि तिच्यातील अपूर्व अशा मातृशक्तीइतकी बलवान शक्ती दुसरी कोणतीही नाही. म्हणूनच भारतीय संस्कृतीत मातेला मानाचे स्थान आहे.


"उपाध्यायान्दशाचार्य आचार्याणाम शतं पिता |
सहस्त्रंतु पितृन्माता गौरवेणातिरिच्यते || "

असा तिचा गौरव मनुस्मृतीत केला आहे. "आई माझा गुरू | आई कल्पतरू || "असेही म्हटले जाते. काहीवेळा आई केवळ गुरूच नाही तर सर्व काही तत्काळ पुरवणारा, अडचणीत धाऊन येणारा अल्लाऊद्दिनचा दिवाच आहे अशीही समजूत करून घेतली जाते. कुमार वयात मैत्री तुटू नये म्हणून, तारुण्यात प्रिती संपू नये म्हणून, तर वृद्धापकाळात भगवंताच्या भक्तीत अंतराय होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीची धडपड चाललेली असते पण बाल्यावस्थेत या तीनही भावना एकट्या आईच्या ठिकाणी व्यक्त केल्य जातात. " बोल ना ग आई ." "आई रागावलीस ?" या सारख्या वक्तव्यातून आईच्या सहवासाची ओढ मुलला किती असते हे दिसून येते. आपल्या शारीरिक, भावनिक, मानसिक गरजा पुरवणारी आई आपल्यापासून दुराऊ नये, तिचे मन जिंकून घ्यावे, यासाठी प्रत्येक मुलाची धडपड चाललेली असते. आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. मग ती माता सुंदर असो वा कुरूप असो, सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, कमावणारी असो वा बिनकमावणारी असो. ,तिचे मूल तिच्याकडे आपोआप खेचले जाते. निसर्गतःच ही शक्ती तिला मिळालेली आहे.

अपल्या या शक्तीची जणीव मातेला कितपत आहे यावर मूल घडविले जाणार कि बिघवडले जाणार ते अवलंबून असते. साने गुरुजींच्या "श्यामच्या आई"ला आपल्या या शक्तीची जाणीव होती. म्हणूनच तिच्या वागण्यात मृदुतेबरोबरच कठोरताही आढळते. मूर्तीमंत कारुण्याचा झरा असलेल्या त्या स्त्रीने प्रसंगी कडक शब्दात ,अगदी काठीचा आधार घेऊनही श्यामची कान उघाडणीही केल्याचे दिसून येते. आपल्या मारण्याने आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल अशी भीती तिला वाटत नाही. पण सर्वसाधारणपणे समाजात असे आढळते कि बर्‍याच माता आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल या भीतीने त्याचे केवळ लाडच लाड करताना दिसून येतात. तोंडातून शब्द निघण्याच्या आत त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या जातात. आणि मग मूल घडवण्याऐवजी अधिकाधिक बिघडविलेच जाते.

एक कथा या ठिकाणी सांगाविशी वाटते.कोर्टात एका जज्ज साहेबांनी एका दरोडेखोराला फाशीची शिक्षा सुनावली. आणि त्या दरोडेखोराने अखेरची इच्छा म्हणून आपल्याच आईचा कान चावला.हे पाहून जज्जसाहेब आश्चर्यचकीत झाले. तेंव्हा आपल्या या कृतीच्या समर्थनार्थ तो दरोडेखोर म्हणाला, "साहेब, शाळेत असताना पेन्सिलीचा एक छोटा तुकडा मी चोरून आणला. तेंव्हाच या आईने मला झोडून काढले असते तर आज मी असा दरोडेखोर झालोच नसतो. ती लहानपणापासून माझे फक्त लाडच करत आली. आणि माझ्या चुका लपवत आली. म्हणून आज मी तिचा कान चावून माझ्या आधी पहिली शिक्षा मी तिलाच दिली." अशाप्रकारे मुलाला घडवणारी माताच आणि बिघडवणारीसुद्धा माताच असते. योग्य वेळी योग्य ठिकाणी ठोकून ओबडधोबड दगडातूनही सुंदर मूर्ती घडवता येते. जाणकार मूर्तिकारच हे काम करू शकतो. तद्वतच मुलाला घडवताना योग्य वोळी योग्य समज देणे हे मातेचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्या मातृशक्तीचा वापर तिने करावा.