आनंद 

सुमा काल रडत होती. तशी ती खूपच सोशिक, सार्‍यांसाठी झटणारी अशीच आहे. म्हणूनच कधी कोणाबद्दल तक्रारही न करणार्‍या सुमाला रडताना पाहून मला खूप वाईट वाटले. तिला तसेच रडत ठेऊन मी चहा करायला गेले. चहा पितापिता मग सुमाच बोलू लागली. आणि तिच्या रडण्याचे कारण समजले. तिची समजूत काढली आणि तिला निरोप दिला                                                                                                                                                          सुमाचे म्हणणे जगावेगळे मुळीच नव्हते. आजपर्यंत तिने घरातल्या प्रत्येकासाठी खूप केले होते. बरेच वेळा स्वतःचे सुख, स्वतःचा फायदा याचा विचारही न करता इतरांसाठी झटतांना मी तिला बघितले होते. इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारी सुमा आज रडत होती. कारण ज्यांच्यासाठी तिने कष्ट केले, त्यांना तिच्या कष्टाची, तिच्या त्यागाची जाणीव नाही असे तिला वाटत होते. तिच्या मते तिचे आयुष्य फुकट गेले. तिच्या पदरात काहीच पडले नाही.
सुमाच  कशाला बर्‍याच लोकांना अशा प्रकारच्या तक्रारी करताना मी पाहिल आहे. मोठ्या हौसेने  कुणासाठी काही करायचे, आणि मग त्याने माझ्यासाठी काही कराव, अशी अपेक्षा बाळगून बसायच.,आणि अपेक्षा भंग झाला कि दु:ख करायच ,अशा सवयीची माणस कमी का असतात? अशा व्यक्तींपेक्षा इतरांसाठी काहीच न करणारी माणस मला आवडतात. कारण "मला कहीच मिळाल नाही", म्हणून ती स्वतःची आणि इतरांची फसवणूक तरी करत नाहीत.
इतरांसाठी आपण झिजतो, तेंव्हा आपल्याला काहीच  फायदा होत नाही हे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. आई मुलाचा अभ्यास घेते, परीक्षेच्या काळात त्याच्यासाठी जागते,त्याला हव नको ते सर्व बघते. स्वतःची तहानभूक विसरून मुलाच्या हौसामौजा पुरवते, तेंव्हा का तिला आनंद मिळत नाही ? आपला मुलगा शिकून मोठा व्हावा ही तिचीच तर इच्छा असते. ती पूर्ण करून मुलगा तिला आनंद देतच असतो. मग त्याने आणखी काही कराव अशी अपेक्षा तिने का धरावी ? आपली इच्छा त्याने पूर्ण केली यातच आनंद का मानू नये ?  एखादा माणूस आजारी असताना आपण त्याची सेवा करतो, ती जशी त्या माणसासाठी असते तशी ती आपलीही गरज असते. कारण त्या आजार्‍याला तसेच टाकून गेल तर आपल्याला चैन पडणार नसत. मग अशावेळी मी त्याच्यासाठी एवढ केल पण तो आता मला विचारत नाही म्हणून रडत बसण्यात काय आर्थ आहे ? मला चैन पडाव, शांत झोप लागावी, म्हणून मी त्याची सेवा केली असे म्हटले की परिस्थितीचे स्वरूपच बदलून जाईल.
आपल्याला नेमक काय हव आहे,  हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे . काहीतरी केल्याचा आनंद, मानसिक समाधान, भलेपणा, प्रशंसा, पैसा , परतफेड यापैकी काय मिळवण्यासाठी एखादे काम करायचे आहे ते पक्के ठरवावे. कारण प्रशंसा, पैसा , भलेपणा या गोष्टी आपल्या हातात नसतात. तेंव्हा त्या गोष्टी मिळवण्यासाठी काही करायच असेल तर अपेक्षाभंगाची तयारी ठेवावी. कारण त्या इतरांवर अवलंबून असतात. आणि इतरांची मनोवृत्ती आपल्यासरखीच असेल असे नाही. पण मानसिक समाधान किंवा आनंद मिळवण्यासाठी एखादे काम केले तर ते आपल्याला नक्कीच मिळणार आहेत. कारण आनंद मानण, न मानण हे आपल्या हातात आहे.
सुमाला नेमक काय हव होत ? इतरांनी सुखी व्हाव म्हणून तिने कष्ट केले होते. त्यांच्या सुखात मला आनंद आहे असे ती दाखवत होती. मग आता सर्व सुखी असताना ती दु:खी का बर झाली ?इतरांनी माझ्यासाठी काही कराव अशी अपेक्षा ठेवल्याने आलेल ते दु:ख होत. यापेक्षा इतरांसाठी काहीच न करता ती स्वतःसाठी जगली असती तर अधिक सुखी नसती का झाली ?