लोकशाही,राजकारणी आणि आपण 

पुस्तके मला जीव की प्राण! कित्येक वर्षापासूनची पुस्तके मी अगदी जपून ठेवली आहेत. परवा खूप दिवसांनी सर्व पुस्तके व्यवस्थित लावून टाकावी म्हणून बाहेर काढली. आणि त्यात "मजेदार गोष्टी" नावाचे पुस्तक हातात आले. मुले लहान असताना मी ते त्यांना खूप वेळा वाचून दाखवायची. आणि आम्ही खूप हसायचो. शेजारीच बसलेली माझी मुलगी मला म्हणाली "आई, पुन्हा एकदा वाचू या का ग? गंमत येईल."
मी ते हातात घेऊन वाचायला सुरूवात केली. मुलगाही जवळ येऊन बसला.                                      गोष्ट थोडक्यात अशी होती. विविध कपड्यांचा शौक असणारा एक राजा होता. रोज नवीन प्रकारचे कपडे त्याला हवे असत. एके दिवशी दोन लबाड माणसे त्या राज्यात आली. राजाची कपड्यांची आवड त्यांना समजली. परिस्थितीचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवले. ते गेले राजाकडे. म्हणाले, "आम्ही विणकर आहोत. आम्हाला असे उत्तम कापड विणता येते कि, त्यात छान नक्षी तर असेलच पण त्याचा खास गुण असा असेल कि, जी माणसे मूर्ख असतील, जी माणसे आपल्याला मिळालेल्या अधिकाराला योग्य नसतील अशा माणसांना ते कापड अजिबात दिसणार नाही. त्या कापडामुळे आपल्या राज्यात कोण माणसे लायक आहेत , कोण माणसे मूर्ख आहेत हे महाराजांना चटकन ओळखता येईल". हे ऐकून राजा एकदम खूष झाला. त्याने त्या विणकरांना कापड बनवायची आज्ञा दिली. पंधरा दिवसांनी विणकरांनी कापड तयार झाल्याचे राजाला कळविले. राजाने कापड बघण्यास प्रधानाला पाठवले. प्रधानाला कापड कोठेच दिसेना. पण "दिसत नाही", असे म्हणावे तर आपण मूर्ख ठरू अशी भीती प्रधानाला वाटली. म्हणून न दिसलेल्या त्या कापडाची भरपूर स्तुती करून प्रधान निघून गेला. असे अनेकजण आले. न दिसलेल्या कापडाची स्तुती करून निघून गेले. शेवटी राजा आला. तो बुचकळ्यात पडला. कापड कोठेच दिसत नव्हते. पण इतक्या सार्‍यानी स्तुती केल्यावर त्यालाही स्तुती करावीच लागली नाहीतर तो स्वतःच नालायक ठरला असता. मग नित्याप्रमाणे  राज्यातील सर्वांना तो नवा पोषाख दाखवण्यासाठी ,तो पोशाख घालून राजाची मिरवणूक काढायचे ठरले. त्या विणकरांनी तो न दिसणारा पोशाख राजाच्या अंगावर घालण्याचे नाटक केले. राजाने आरशात बघितले. अंगावर एकही कपडा दिसत नव्हता. पण आपण नालायक ठरू या भीतीने काहीच न बोलता राजा अंबारीत जाऊन बसला. प्रजा पहात होती. आश्चर्यचकीत होत होती. पण बोलणार कोण? सारे चूप बसले. नागडा राजा पाहून हसावे की रडावे तेच समजत नव्हते. काही मुले रस्त्यात खेळत होती. त्यांनी ते दृश्य पाहिले. आणि ती मुले पोट धरधरून हसू लागली. राजा अंबारीतून खाली उतरला. मुलांजवळ गेला. त्याने त्यांना हसण्याचे कारण विचारले. मुलांनी खरे कारण सांगताच राजा लाजला. मिरवणूक अर्धवट सोडून राजवाड्यात गेला. आपल्या मूर्खपणाचा त्याला राग आला. पण आता वेळ निघून गेली होती.
गोष्ट वाचून आम्ही हसलो पण त्यात पूर्वीची मजा नव्हती.मुलांचे बालपण संपून त्यांनी तारुण्यात पदार्पण केले आहे. एकमेकांची फिरकी घेत ती आपापल्या कामाला निघून गेली. तारुण्यातून वृद्धावस्थेकडे झुकलेली मी मात्र राजाच्या या गोष्टीचा नव्याने विचार करू लागले. तो राजा आणि त्याची प्रजा यांच्या जागी मला "समोर दिसेल त्याला व्वा! छान असे म्हणणारे" आपण दिसू लागलो. आज समाजाच्या कित्येक क्षेत्रात टोकाचा भ्रष्टाचार बोकाळलेला असताना आपण सारेच चूप आहोत. सर्वच घोटाळ्यांविषयींच्या बातम्या वाचताना वाईट याचेच वाटते कि, या सार्‍य योजनंचे सुरवातीला आपण प्रत्येकांने भरभरून कौतुक केले होते. या घोट्याळ्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींचे गोडवे पूर्वी आपणच गायिले होते. यातील कित्येक योजना चुकीच्या, फसव्या आणि भविष्यकाळाला मारक आहेत याबाबत अनेक विचारवंतांनी ओरड केली होती. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटल्याही होत्या पण तरीसुद्धा आपण "व्वा! छान !" असेच म्हणत राहिलो. का? आपण नालायक ठरू अशी भीती तर आपल्याला वाटली नव्हती ना?
महाबलाढ्य लोकसंख्या असलेल्या या भारतात सत्य उघड व्हायला एवढा वेळ लागावा, याचा अर्थ आपण त्या गोष्टीतल्या प्रजेप्रमाणे डोळे असून आंधळ्याची भूमिका घेत आहोत. आणि त्याचे दूरगामी परिणाम आपल्यालाच नाही तर आपल्या पुढील पिढीलाही अनंतकाळपर्यंत भोगावे लागणार आहेत याचेच वाईट वाटते. चूक करणार्‍यापेक्षा चूक समोर दिसत असूनही ती उजेडात न आणणाराच अधिक दोषी असतो असे म्हणतात. पाण्यात पडून बुडणार्‍याला न वाचवता " व्वा!काय छान बुडतोयस !" असे म्हणत काठावरच बसणार्‍या मूर्ख माणसासारखेच हे वागणे आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असताना आपण मात्र कित्येक वेळा सरकारच्या चुकीच्या निर्णयालाही , "व्वा ! छान !" असे म्हणून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. आणि मग जखम होऊन वेदना भोगाव्या लागल्या की ओरड करायला सुरूवात करतो. पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.क्षणिक भलेपणासाठी कशालाही "व्वा! छान!" म्हणणे योग्य नाही हे त्या गोष्टीतल्या राजाने आज मला शिकवले.