धुमकेतु आणि महाकवि 

तुम्ही दोघे कोठुनि चुकलां इकडे हो वाटे?
अन्य श्रेयस विश्वामधुनी खचित मला वाटे!
निश्चिंत तुम्ही स्वयंप्रकाशी अप्रतिहत फिरतां,
केन्द्र सोडुनी दूरवरी हो स्वैरपणें भ्रमतां!

भास्कर-भसित स्थानापासुनि वेध घेत मोदें,
विश्रान्तीचे तमांत शिरता आपुल्याचि नादें !
जगांतिल महाक्रान्तीचें तें भविष्य सांगाया
तुम्ही येतसां-लावितसांही तें लोकां गाया !

जड धातुचे तुम्ही न दिसता - तेजस्तत्त्वाचे !
कोठुनि अथवा ब्रह्मांडी हो स्वेच्छ गमन तुमचें ?
कधीमधि तुम्ही विचित्र पुतळे उगवतसां थाटे  !
वदा तर तुम्ही कोठुनि चुकलां इकदे हो वाटे ?


कवी: केशवसुत