प्रीति 

प्रीति मिळेल का हो बाजारीं ?
प्रीति मिळेल का हो शेजारीं?
प्रीति मिळेल का हो बागांत?
प्रीति मिळेल का हो शेतांत?
प्रीतिची नसे अशि ग मात; पहा शोधुनी.हृदयांत.
नंदनवनामधी आला
कल्पलतेला बहर भला;
तिचीं हृदयिं बीजें पडलीं
प्रीति त्यातुनी अवतरली;
प्रीतिची असे अशि ग मात; पहा आपुल्या हृदयांत.
प्रेमळ कृत्यांची माळ;
प्रियजनकंठी तू घाल;
द्विगुणित मग तो प्रीति तुला
देइल, न घरी शंकेला.
प्रितिचा असा असे ग सौदा,प्रीतिने प्रीति संपादा!
हृदयीं आलिंगन पहिले,
चुम्बन मुखकमलीं वहिलें;
आणिक रुचतिल ते चार
प्रीतिला होती उपचार .
प्रीति वाढली गडे ग ! सतत
पहा तूं प्रियजन-हृदयांत
प्रीति असेल का ग बाजारीं ? वेडे, प्रीति मिळेल का ग शेजरी ?

कवी - केशवसुत