कर्तव्य श्रेष्ठ 

विट्ठलच्या मंदिरात गेले की बाबांची आठवण होते. याच देवळात त्यांनी मला प्रथम पुंडलिकाची गोष्ट संगितली होती. "कर कटेवरी उभा विटेवरी" असे विट्ठलाचे रूप त्यांना खूप आवडायचे. म्हणायचे, "या विट्ठलाचा आपल्यावर विश्वास आहे. शांतपणे उभे राहून तो आपले काम बघतोय. नाही तर इतर देव बघ भक्तांच्या मदतीसाठी कोणी शस्त्रास्त्र घेऊन उभे आहेत तर कोणी आशीर्वादासाठी हात वर करून उभे आहेत. पण एकट्या या विठोबाची आपल्या भक्ताच्या कर्तृत्वावर खात्री आहे.कमरेवर हात ठेऊन जणू तो म्हणतोय' " माझ्या मदतीची तुला गरज काय? तू मनापासून काम कर यश तुझेच आहे."मातृपितृ भक्त असलेला पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. त्याचवेळी विट्ठल रूपात परमेश्वर त्याला भेटायला आले. तर बाजुला पडलेली वीट त्याकडे फेकून पुंडलिक त्याला म्हणाला ,"थांब तेथेच. माझ्या आईवडिलांना शांत झोप लागली कि येतोच मी. तोपर्यंत या वीटेवर उभा रहा." पुंडलिकाच्या या वागण्याने विट्ठलही थक्क होऊन गेला. आजपर्यंत असा भक्त त्याने बघितलाच नव्हता. केवळ हाक मारताच सर्व सोडून हातात नैवेद्याचे ताटघेऊन त्याकडे धावणारे भक्तच त्याला माहीत होते. म्हणूनच या अभूतपूर्व भक्ताकडे कमरेवर हात ठेऊन कौतुकाने पहात तो उभा राहिला.
पुंडलिक आणि विट्ठल यांची ही गोष्ट  सदैव लक्षात ठेवायला हवी. मालक आणि सेवक , अधिकारी आणि नोकर यांच्यातील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारी ती गोष्ट आहे. अधिकार्‍यांनी विट्ठलाप्रमाणे असावे. आपल्या कनिष्ठांच्या केवळ कामाकडेच कौतुकाने बघावे. त्यांच्या कामावर खूष व्हावे. अर्थातच कनिष्ठांनी पुंडलिक बनावे. सतत कार्यमग्न असावे. आपल्या कार्यावर निष्ठा ठेवावी. केवळ आपल्या उत्कृष्ट कार्यानेच अधिकार्‍यांना खूष ठेवणारा कनिष्ठ आणि इतर कशाचीही अपेक्षा न ठेवता कनिष्ठाच्या कामावर संतुष्ट होणारा वरिष्ठ यांचीच आज गरज आहे. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फ्लेषु कदाचन" अशी वृत्ती व्यक्तीला उन्नत्तीच्या मार्गाप्रत घेऊन जाते. अर्थात कार्यामध्ये सचोटी, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, आणि अचुकता असलीच पाहिजे. आपल्या वाटेला आलेले कार्य हाच परमेश्वर असे मानून केलेल्या कोणत्याही कामामध्ये वरील सर्व गुण असणारच. असे प्रामाणिकपणे केलेले काम व्यक्तीला यश तर देतेच पण त्याबरोबरच मानसिक समाधानही भरपूर देते.
"कर्तव्य श्रेष्ठ" असे सांगणार्‍या कथा आपल्या पोथ्यापुराणातही भरपूर आहेत. सदैव परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन असणार्‍या नारदांना एकदा भगवान विष्णू म्हणाले," चल माझ्याबरोबर . माझ्या एका परम भक्ताला भेटून येऊ."  नारद आश्चर्यचकीत झाले. आपल्याशिवाय दुसरा कोणी परम भक्त असेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. दोघेही एका शेतकर्‍याच्या घरी दोन दिवस राहिले. दोन दिवसानंतर नारद म्हणाले," भगवन आपल्याला श्रेष्ठ भक्ताकडे जायचे आहे ना?" भगवान विष्णू म्हणाले," अरे, हाच तर माझा आवडता भक्त." नारद म्हणाले ,"अहो अस कस शक्य आहे? याने तर केवळ दिवसातून दोनदाच तुमचे नाव घेतले. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना. इतर वेळी त्याला तुमची आठवणही झालेली दिसली नाही मग तो तुमचा परम भक्त कसा?" भगवान विष्णू काहीच बोलले नाहीत काही दिवसांनंतर त्यांनी एक वाटी काठोकाठ तेल भरून नारदाच्या समोर धरली. आणि सांगितले," जा त्या डोंगरावरच्या देवळातल्या माझ्या मूर्तीभोवती दहा प्रदक्षिणा घालून यातले संपूर्ण तेल मूर्तीवर ओतून ये. जाताना एकही थेंब तेल खाली जमीनीवर सांडता कामा नये." नारद उठले विष्णूंच्या आज्ञेनुसार देवळात जाऊन तेल ओतून आले. भगवंतांनी विचारले ,"प्रदक्षिणा घालताना कितीवेळा माझे नाव घेतलेस?" नारद म्हणाले, " भगवन, कस नाव घेणार? अहो माझे सारे लक्ष त्या वाटीकडेच होते. एकही थेंब खाली सांडायचा नाही अस तुम्हीच तर म्हणाला होता ना? किती काळजीपूर्वक काम करावे लागले त्यात तुमचे नाव घ्यायचेच राहून गेले." भगवान विष्णू म्हणाले," आता कळल असेल तुला तो शेतकरी माझा परम भक्त कसा ते. अरे, माझ्या या भक्ताला मी शेतात धान्य पिकवण्याच काम दिल आहे. तो ते किती तन्मयतेने करतोय ते तू बघितलेस ना? शेतीच्या कामात तो इतका तल्लीन झाला आहे कि माझ्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नाही. आपले काम म्हणजे परमेश्वर असे मानले आणि ते मन लावून केले की मग वेगळ्या नामस्मरणाची गरजच काय?"आता तल्लीन होऊन मी दिलेले काम करणारा शेतकरी माझा परम भक्त कसा ते तुला कळले असेल ना ?"
तेंव्हा परमेश्वराला भेटण्यासाठी देवळात रांगा लावण्यापेक्षा आपल काम करता करताच परमेश्वराच नामस्मरण करणे केंव्हाही चांगल. आणि काम हाच परमेश्वर समजून नामस्मरणही न करता वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केले तर निश्चितच अधिक समाधान मिळते.