ज्ञानपीठ पुरस्कार 

दिल्लीतील जैन कुटुंबानी एक ट्रस्ट स्थापन केला. आणि अनेक प्रतिष्ठीत विद्वान साहित्यिकांशी चर्चा करून साहित्यिकांसाठी व साहित्याच्या प्रचारासाठी सन १९६३ मध्ये "भारतीय ज्ञानपीठ" ही संस्था स्थापन केली. सन १९६५ मध्ये मल्याळी साहित्यिक शंकरा कुरूप यांची पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली. सन १९८२ पर्यंत साहित्यिकाच्या साहित्यकृतीला हा सन्मान दिला जात असे. पण त्यानंतर लेखकाच्या एकूण साहित्यसेवेचाही विचार हा पुरस्कार देताना केला जाऊ लागला. भारतीय ज्ञानपीठ स्थापनेपासून आजपर्यंत सात पुरस्कार कन्नड साहित्यिकांना, पाच पुरस्कार बंगाली साहित्यिकांना, चार मल्याळम साहित्यिकांना आणि तीन पुरस्कार मराठी साहित्यिकांना मिळाले आहेत.
पुरस्कारप्राप्त लेखकंची निवड निवडसमितीकडून होते. या निवडसमितीचे अध्यक्षपद साहित्याचा सखोल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडेच जाते.अध्यक्षाबरोबर समितीमध्ये सात ते अकरा सदस्य असतात. समितीचे सदस्यही दोन तीन भाषांमध्ये पारंगत असतात. त्यांना त्या भाषांतील साहित्यिकांचाही परिचय असतो. भरपूर वाचन ,लेखन असलेले  हे सदस्य स्वतःसुद्धा लेखक असतात. याशिवाय प्रत्येक भाषेसाठी तीन साहित्यिक सदस्यांची सल्लागारसमिती असते. पुरस्कारासाठी आलेली नावे या समितीकडे पाठविली जातात. यावर आपले स्वतंत्र मत नोंदविण्याचा अधिकार या सदस्यांना असतो. निवड समितीच्या तीन बैठका होऊन एकमताने पुरस्कासाठी नि:पक्षपातीपणाने लेखकाची निवड केली जाते. म्हणूनच साहित्यिक विश्वात या पुरस्काराला मानाचे स्थान आहे.