धर्म आणि राजकारण 

धर्म म्हणजे जीवनाचा मार्ग. व्यवहार्य जीवनाची संपूर्ण पद्धती घालून देणारे ते एक शास्त्र आहे. धर्मामुळे व्यक्तीच्या जीवनाला आवश्यक अशी श्रेष्ठ मूल्ये मिळतात. आणि या मूल्यांचे अनुसरण केले की व्यक्तीचे जीवन सुखकर होते. म्हणून धर्म हे जीवनाचे कृतीशास्त्र किंवा आचरणाचे शास्त्र आहे. उदाहरणार्थ गृहिणी धर्म, विद्यार्थी धर्म वगैरे. अशा धर्मामुळे व्यक्तीविकास घडून येतो.
राजकारणात समाजाच्या विकासाला महत्त्व असते. समाजविकासाला आवश्यक मूल्ये राजकारणात ठरवली जातात. जनतेशी संपर्क ठेऊन परस्पर सहकार्याने जीवन जगण्याची सुधारित शासनपद्धती राजकारणातून ठरवली जाते.राष्ट्रातील प्रत्येक नागरिक आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक विकसित होऊ शकेल अशी शासनयंत्रणा निर्माण करण्याचे काम राजकारणात होते. धर्मामध्ये व्यक्तीचा तर राजकारणात समाजाचा विचार होतो. समाज व राष्ट्र हे व्यक्ती व्यक्तीनी बनले जाते. आणि समाजाचे सुख किंवा रष्ट्राची शक्ती ही त्यात रहाणार्‍या व्यक्तिच्या मनोरचनेवर, आचारविचारावर अवलंबून असते. म्हणून अनंत काळापासून धर्म व राजकारण यांचा घनिष्ट संबंध आला आहे. राष्ट्रात रहाणार्‍या सर्व व्यक्तींचे आचारविचार, निष्ठा व मूल्ये एक असतील तर राष्ट्र टिकून रहाते. आणि राष्ट्राची प्रगती होते. याच विचाराने अनेक राज्यकर्त्यांनी आपापल्या धर्मनिष्ठा आपल्या नागरिकात रूजविण्याचा प्रयत्न केलेला इतिहासात दिसून येतो. अकबरने सर्व धर्मांचा अभ्यास करून स्वतःच्या अशा "दीन इलाही'" धर्माची स्थापना केली. औरंगजेबाने "इस्लाम"चा प्रसार केला तर छत्रपती शिवरायांनी "मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा", हे धोरण स्वीकारले. गुरू गोविंदसिंगाने "शिख" धर्म तर सम्राट अशोकाने "बौद्ध" धर्माचा प्रसार करून रज्यविस्ताराचे धोरण आखले. आणि इंग्रजांनी आपल्या साम्राज्याबरोबरच ख्रिश्चन धर्म जगभर पसरविला.
काळ बदलतो. जगात भौतिक प्रगती होत जाते. मानवाचा विकास होतो. तसतसे पूर्वीच्या निष्ठा, मूल्ये, आचारविचार निरूपयोगी ठरतात. जुन्या रूढी परंपरांना चिकटून रहाणे समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने कठीण होऊन बसते.पूर्वीच्या निष्ठा व आजची प्रगती यात रस्सीखेच होऊ लागते. समाजातील व्यक्तींच्या आचारात व विचारात एकवाक्यता न राहिल्याने समाजात अंदाधुंदी,  अराजकता माजू लागते. आणि मग धर्म बुडाला अशी ओरड बुजुर्ग लोक करू लागतात. खरतर तेंव्हा धर्म बुडत नसतो तर काळानुसार नवीन धर्माचा उदय होत असतो. नवीन काळाला आवश्यक अशा आचारविचारांची समाजात रुजवण होऊ लागलेली असते. नव्या धर्म स्थापनेची ती सुरूवात असते. समुह वा समाज टिकविण्यासाठी अशा नव विचारांची, नव्या धर्माची आवश्यकता असते. महाभारत काळात कौरव पांडव युद्धाच्या वेळी राष्ट्र टिकवून ठेवण्यासाठी अर्जूनाच्या मनात बिंबलेल्या जुन्या रूढी, कल्पना यांचा पगडा दूर करून नवा धर्म ऐकविण्याची गरज श्रीकृष्णाला भासली. {"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |" } अशा प्रकारे प्रत्येक नवीन धर्म स्थापनेमध्ये समाजविकासाचा विचार असतो. आणि प्रत्येक समाज टिकविण्यासाठी धर्माचा म्हणजेच व्यक्तीच्या आचारविचारांचा विचार करावा लागतो. कारण एकाच आचारविचाराची म्हणजे धर्माची माणसे एकत्र येऊन राष्ट्र निर्मिती होत असते. त्यासाठी राज्यविस्तार करायचा तर धर्म विस्तारही झाला पाहिजे, या उद्देशाने ख्रिश्चनांनी, मुघलांनीच नाही तर अशोकानेसुद्धा राज्यविस्ताराबरोबरच धर्म प्रसारही केल्याचे दिसून येते.
पण काहीवेळा आपल्या बुद्धीला पटलेल्या निष्ठांनी राज्यकर्ता इतका झपाटला जातो, की मग त्याजकडून समाजापेक्षा स्वतःच्या मतांनाच जास्त महत्त्व दिले जाते. आणि मग धर्मकारण, राजकारण दोन्ही बाजुलाच रहाते आणि केवळ स्वहिताचे अर्थकारणच पुढे येते. तेंव्हा मात्र या स्वार्थी खेळात सामाज पुरता भरडला जातो, दिशाहीन होतो. जी परिस्थिती आजच्या काळात चालू आहे. आजचे राजकारण कोण्या एका धर्मासाठी नाही, समुहासाठी नाही तर केवळ स्वतःचाच आग्रहीपणा टिकवण्यासाठी असल्यासारखे वाटते.