बालगुन्हेगारी 

"नातवंडांनी केलेला आपल्याच आजीचा खून", "आठ वर्षाच्या मुलीवर दहावीतल्या मुलांनी केलेला बलात्कार", "आपल्या प्रेमाला नकार दिला म्ह्णून आपल्याला अत्यंत आवडणार्‍या मुलीवर केलेले निर्घूण अत्याचार", यासारखे अनेक किस्से समाजात वारंवार चर्चिले जातात. कारणांची उहापोह केली जाते. काही काळापुरता समाज ढवळून निघतो. आणि सारे लगेच शांत होते. कारणही ठराविकच संगितली जातात.आदर्श नेतृत्वहीन समाज, बेजबाबदार पालक, शिक्षक आणि जोडीला दूरदार्शन.
वरील सर्व कारणे बर्‍याच अंशी खरीही असतील. पण सखोलतेने विचार केला, आणि अपराधी मुलांच्या पश्चात्तापदग्ध मनस्थितीत दिलेल्या जाबजबान्या वाचल्या, तर असे लक्षात येते कि, या मुलांना आपण करत असलेल्या कृत्यांच्या परिणामांची जाणीवच नसल्याने या सार्‍या घटना घडत आल्या आहेत. आपण करत असलेले कृत्य इतके भयानक आहे, याची त्यांना कल्पनाच नसते. त्या एकाच क्षणाचा विचार मुले करत असतात. त्याचा परिणाम त्यांना माहीत नसतो. आज सार्‍या समाजातच भविष्यकाळाची चिंता न करता वर्तमानकाळ मजेत घालवण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आणि त्याचाच परिणाम या मुलांच्या वागण्यात दिसतो.
"निरिक्षणातून शिकणे" ही प्राण्यांची सहज प्रवृत्ती आहे. मुले समोर जे पहातात, जे ऐकतात, त्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटतो. व तसे अनुकरण करण्यास ती प्रवृत्त होतात. आज दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके, कथा कदंबर्‍या या सर्वांतून वरील घटनाच भडकपणे रंगवलेल्या दिसतात. त्या घटनांमुळे होणार्‍या परिणामांची दखल कोणत्याच प्रसारमाध्यमात फारशी घेतली जात नाही. उदा.  वरिल घटना घडल्यानंतर त्याचे विस्तृत चित्रण वा वर्णन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले असेल, त्या अपराधी मुलांचे फोटो, मुलाखती छपून आल्या असतील . पण त्यानंतरत्या अपराधी मुलांना कोणत्या शिक्षा झाल्या, त्यांना कोणत्या हालापेष्टांना सामोरे जावे लागले याचे विस्तृत वर्णन क्वचितच कोठे छापले गेले असेल. दूरदर्शन मालिका वा चित्रपटातून एखादी व्यक्ती गुंड कशी बनते, कोणत्या युक्त्या करून झटपट श्रीमंत बनते, कशी चैन करते, इत्यादिचे रसभरीत चित्रण केलेले आढळते.पण या खोटेपणापायी ,अपराधापायी त्या व्यक्तीला कोणत्या शिक्षा भोगाव्या लागल्या, त्याचे वर्णन विस्तृतपणे न दाखवता "तो गोळी लागून मरतो", "तुरुंगात जातो", "फरारी होतो" वा "एखाद्या चांगल्या माणसाच्या हाती सापडून सुधारतो",  इतकेच त्रोटक प्रसंगात दाखवले जाते. साहजिकच परिणामांपेक्षा घटनांचाच ठसा मुलांच्या मनावर उमटतो. आणि घटना लक्षात ठेऊन त्यातील आनंद उपभोगण्यासाठी त्यानुसार वागण्याचा ती प्रयत्न करतात.
म्हणून कार्यकारणांबरोबरच त्याच्या परिणामांचाही विचार तितक्याच प्रभावीपणे मुलांसमोर मांडला गेला पाहिजे. घटनांपेक्षा परिणामांकडे त्यांचे लक्ष अधिक वळविल्यास मुले गुन्हा करण्यास प्रवृत्त होणार नाहीत. आज विविध जाहिराती, प्रसारमाध्यमे,याद्वारे अजाण वयात भाराभर ज्ञान मुलांना मिळत असते. काहींचा अर्थ कळतो तर काहींचा अर्थ न कळताच ते ज्ञान माहितीच्या रूपात त्यांच्या जवळ साठून रहाते. कार्य, कारण, परिणाम यांची संगती त्यांना लागत नाही. सारासार विचार करण्याची कुवतही या वयात त्यांच्याजवळ नसते. साहजिकच  कुतुहलाच्या सहजप्रवृत्तीमुळे साठलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून आनंद लुटण्याचा ती प्रयत्न करतात.आणि परिणामांची जाणीव नसल्याने फसतात. 'अमुक एक भांड गरम आहे' , हे ज्ञान मुलाला दिले गेल्यावर 'त्याला हात लावला तर हात भाजतो', या परिणामाची कल्पनासुद्धा त्यांना त्याबरोबर दिली, तर ती त्या भांड्याकडे जाणारही नाहीत. याप्रमाणेच कोणत्याही कृत्याच्या परिणामांची जाणीव मुलांना दिली तर नको त्या गोष्टी करण्यापासून ती परावृत्त होतील.
आजुबाजुला घडणार्‍या घटना, चित्रपट, दूरदर्शन मालिका, याबाबत मुलांबरोबर चर्चा करून परिणामांकडे त्यांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. आपल्या इतिहासातही याबाबत अनेक दाखले आहेत. नारदमुनींनी पुढील परिणामांची कल्पना देताच वाल्याकोळ्याचे वाल्मिकी ॠषीत परिवर्तन झाले.आणि कित्येक निरपराधांना लुटणार्‍या आणि यमसदनास पाठविणार्‍या त्यांच्या हातून रामायणासारखा महन ग्रंथ रचला गेला. कलिंग युद्ध संपल्यानंतर झालेला संहार अशोक राजाने पाहिला, युद्धात जखमींचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आक्रोश ऐकले, त्यांच्या तिरस्कृत नजरा अनुभवल्या आणि त्याचवेळी रणक्षेत्रावर बौद्धभिक्षुंना मिळणारा सन्मान त्याने बघितला.परिणामी त्या शूर पराक्रमी अशा सम्राट अशोकाचे परिवर्तन शांती उपासक अशोकात झाले. धोपटण्यापेक्षा थोपटण्यात आणि घेण्यापेक्षा देण्यात जास्त आत्मसंतोष आहे हे त्याला पटले. परिणामांचे स्वरूप दर्शन होताच वाल्याकोळी आणि सम्राट अशोक यांच्यात परिवर्तन झाले. तेंव्हा परिणामांच्या जाणीवेने व्यक्तीमध्ये जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो.
मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्यास पालकांचे चुकीचे संगोपन कारणीभूत आहे. पालकांकडून दिली जाणारी फाजिल लाडाची किंवा अति धाकाची वागणूक, पाल्याबाबत उच्च अपेक्षा, पाल्याची इतर मुलांशी केलेली तुलना, पाल्याला दिले गेलेले अति महत्त्व किंवा अति दुर्लक्ष या सार्‍याचा परिणाम मुलांमध्ये मानसिक विकृती व त्याद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यात होतो. यासाठी शहरी व ग्रामीण भागात पालकांचे उद्बोधन होणे गरजेचे आहे. या पालकांच्या वर्गासाठी बालमानसशास्त्र, मुलांचे संवर्धन, बालकांचा आहार, त्यांचा शारीरिक ,मानसिक वाढीस पोषक वातावरण, मुलांच्य नैसर्गिक गरजा, त्यांच्या विविध समस्या इत्यादि अनेक विषयांचा समावेश करता येईल. आपल्याकडे बर्‍याच सामाजिक सेवाभावी संस्था, अशाप्रकारचे पालकांचे वर्ग आयोजित करीत असतात. शाळाशाळातून पालकवर्ग घेऊन पालकांशी हितगूज करण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याला  पालकांचा प्रतिसाद अत्यल्प असतो. याकरिता शासनामार्फत अशा पालकवर्गांचे आयोजन पालकांच्या नोकरीच्या ठिकाणी केले जावे. व त्याला सक्तीच्या उपस्थितीचा नियम ठेवावा. अशाप्रकारे केलेली पालक जागृती मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून वाचवू शकेल. पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
आजच्या वैज्ञानिक युगात परमेश्वरावर निष्ठा नाही, पापपुण्याचा विचार नाही, पालकांचा धाक नाही आणि शिक्षकांची भीती नाही,अशा परिस्थितीत आता कायद्याची ओळख मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून वाचवू शकेल. त्यासाठी अभ्यासक्रमात कायदेशिक्षणाची आवश्यकता आहे. अमुक एक कृत्य करणे हा गुन्हा आहे, आणि त्याला अमुक एक शिक्षा आहे याचे ज्ञान जर विद्यार्थ्याला असेल तर शिक्षेच्या भीतीने तो गुन्हेगारीपसून दूर रहाण्याची त्याची प्रवृत्ती बनेल आणि त्याबरोबरच कायदेपालन करणारा नागरिक तयार होईल. कायदे शिक्षणात केवळ कायद्यांची माहिती न देता कायदे करण्याचे उद्देश, ते पाळण्यचे फायदे, न पाळण्याचे होणारे परिणाम , दंडात्मक तरतुदी,शिक्षांचे प्रकार याचे ज्ञान दिले जावे. चिनी शिक्षण पधतीत अशाप्रकारचे कायदे शिक्षण मुलांना दिले जाते. त्यामुळे गुन्हा करण्याच्या व कायदे मोडण्याच्या प्रवृत्तीपासून तो दूर रहातो. महविद्यलयीन स्तरावर "जबाबदार पालकत्व" अशा स्वरूपाचा विषयही अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.
समाजातील विविध घटना व घटकही मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नेण्यास कारणीभूत ठरतात. काही चित्रपट, दूरदर्शनमालिका, जाहिराती, उत्पादने अशा अनेक गोष्टी मुलांवर कुसंस्कार करत असतात. त्यांच्या विरुद्ध शिक्षक पालकसंघटनांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या बाजुने समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध लढा देऊन त्यांच्या सुधारणेचा मार्ग मोकळा करण्यात जेष्ठांनी हातभार लावला पाहिजे. आज समाजातील मुले खरोखरच दुर्लक्षिली गेली आहेत. आपण जे बोलतो, जे लिहितो, जे सादर करतो त्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार समाजातील कोणताही घटक करताना दिसत नाही. ना पत्रकार, ना पटकथाकार, ना नेते, ना अभिनेते. प्रत्येकजण केवळ आपला स्वार्थ साधत आहेत. आणि त्याला आपली भावी पिढी बळी पडत आहे, याचा फारसा विचार कोणी करत नाही. मुलांना उत्तमोत्तम अन्नपदार्थ, पोषाख,आणि चैनीच्या वस्तू न पुरवता स्वकर्तृत्वाने काहीतरी मिळवण्याची उर्मी त्यांच्यत निर्माण करणे , मुलांच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांचा रिकामा वेळ सत्कारणी लावून स्वनिर्मितीचा आनंद त्यांना मिळाला तर ती गुन्हेगारी प्रवृत्तीपासून ती दूर जातील.