बालकवी आणि निसर्ग 

    "हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी|
     त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी |
     प्रियसखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती |
     त्यांच्यास्तव धुंडून ताराकण अधाशी |
     आणसी धरेवर अक्षर धनराशी | "
असे वर्णन कवी कुसुमाग्रजांनी बालकवींचे केले आहे. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. १३ ऑगस्ट सन १८९०मध्ये खानदेशच्या काळ्या मातीत साहित्यातील अद्भूत अलौकिक रत्नाचा जन्म झाला. बालपणीच काव्याची देणगी लाभलेले बालकवी हे स्वतंत्र व्यक्तीमत्वाचे निसर्ग कवी होते. त्यांच्या कवितेत निसर्ग पहावा कि निसर्गात त्यांच्या कवितेची अनुभूती घ्यावी असा प्रश्न पडावा इतका निसर्गाशी तादात्म्य पावलेला निसर्गसखा म्हणजे बालकवी.
बालकवींनी निसर्गावर अतोनात प्रेम केले. त्यांच्या सर्वच कवितेत निसर्ग सजीव झाल्यासारखा वाटतो. चैतन्यमय निसर्गकविता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या "औदुंबर" कवितेतला हिरवाळी घेऊन वाहणारा झरा, कुरणांमधून चालणारी पायवाट, आणि जळात पायटाकून बसलेला औदुंबर, तसेच "पाऊस" कवितेत वर्षादेवीने भरून ठेवलेला माल हाताने उडवून देणारा मरूत, आनंदाने भरार्‍या मारणारा आनंदी पक्षी, सदैव सस्मित डोलणारे तृणपुष्प, फुलपाखराला 'या आता अंत किती पाहता नाथा' असे म्हणणारे फूल, मोठ्या प्रेमाने तार्‍याला अंगाईगीत गाणारी रजनीदेवी, या का अशा अनेक ठिकाणी बालकवींच्या निसर्गातील चैतन्य अनुभवता येईल. त्यांच्या "फुलराणी" कवितेमध्ये तर मानवी आविष्कारांची परिसीमाच गाठली आहे.
 जे प्रेम, जो आनंद त्यांना स्वतःच्या जीवनात उपभोगता आला नाही, तो त्यांनी निसर्गात शोधला. त्यासाठी ते निसर्गाशी एकरूप झाले. पण आपल्या कवितेतून निसर्ग वर्णिताना त्यातील सुंदरताच वर्णन करण्याचे जणू त्यांनी ठरविले होते. खळाळत जाणारा 'निर्झर', आनंदाने विहरणारा 'आनंदी पक्षी', पायदळी तुडविले जाऊनही सदैव सस्मित आणि वार्‍यावर डोलणारे 'तृणपुष्प' , गगनात स्वैरपणे झुलणारा 'बालविहग' ,या सर्‍यांच्याच चित्रणातून बालकवींनी निसर्गातील केवळ सौंदर्यच वर्णिले आहे.
"जे न देखे रवी ते देखे कवी", ही उक्ती खरी ठरावी इतके निसर्गातील बारकावे त्यांनी आपल्या नेत्रांनी टिपले आणि त्यांना चैतन्यरूप दिले. म्ह्णूनच अगदी मोजक्याच शब्दात ते "औदुंबरा" सारखे शब्दचित्र रेखाटू शकले. त्यांच्या  "जीर्ण दुर्ग", "खेड्यातील रात्र", "पारवा", अशा कितीतरी ठिकाणी हीच सूक्ष्म निरिक्षण दृष्टी दिसून येते. त्यामुळेच त्यांचा निसर्ग कविता वास्तववादी बनल्या आहेत. त्यात कल्पनेचा लवलेशही सापडत नाही.
अशा वास्तववादी कवितारंगविताना चित्रकाराला लाजवतील अशा रंगांच्या विविध छटा त्यांच्या कवितेत ठिकठिकाणी विखुरलेल्या आढळतात. "औदुंबर" कवितेतील कृष्णवर्ण आणि गोकर्ण रंगांचे ढग, "मेघांचा पाऊस"  कवितेतील इंद्रनीळाचा रंग फासून बसलेला गिरी, शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊन आगमन करणारी उषा , संध्यासमयी सोन्याहूनही पिवळे पडणारे ऊन, अशा अनेक ठिकाणी रंगांची पखरणच त्यांनी केली आहे. "चौबाजुला थाट दाटला हिरवाळीचा " हे दृष्य सतत पहाणार्‍या त्या खानदेशच्या बालकाला हिरवाळीचा हिरवा रंग तर अधिकच प्रिय. त्या हिरव्या रंगाच्या विविध छटांचे वर्णन त्यांनी आपल्या कवितांमधून केले आहे. श्रावणमासी हिरवळीकडे बघून हर्षभरीत झालेल्या या कवीने "हिरवे हिरवे गार गालिचे " जसे पाहिले तशी पाचूंची हिरवी रानेही पाहिली. आणि वनमालांचा हिरवा शेला जसा त्यांना दिसला तशीच शेतमळ्यांची हिरवी गर्दीही त्यांनी अनुभवली.
निसर्ग जसा सौंदर्याने भरलेला आहे, तसाच तो संगीतमयही आहे, असे बालकवी मानतात. "तव गीते भरली सारी | गाण्यांनी भरली राने | वरखाली गाणे गाणे | गीतमय स्थिरचर झाले | गीतमय ब्रम्हांड डुले |" असे निसर्ग वर्णन ते आपल्या कवितेत करतात. निसर्गात संगीत शोधणार्‍या या कवीने आपल्या कवितेत नादमयताच आणली आहे.
अशा प्रकारे निसर्गातील दिव्य सौंदर्य व अलौकिक आनंद आणि मानवी जिवनाची अपूर्णता नादमय शब्दात आविष्कृत करणारा कवी या सम हाच.Tryambak Bapuji Thombre (1890–1918) was one of the great Indian Marathi poet. He was gifted Poet He could not publish his own book as he died at age of 28 in an accident. He is mostly known with his pen name Balkavi, also spelled as Baalkavi or Baal-kavi. Thombre's poems deal with his love of nature and most of them depict nature in a beautiful poetic manner. Some notable poems written by Thombre are: Phulrani, Audumbar, Shraavan-maasii harshh maanasii, Anandi anand Gade jikade tikade chohikade. He was adopted by senior poet N. V. Tilak who nurtured his poetic qualities and provided guidance.