एक सायंकाळ शिक्षकांसाठी 

अशीच एक सायंकाळ ,घालवली मुलांच्या सहवासात |
मुले होती कॉलेजची, अन काही दहावीची |
संभाषणातून आपल्या बरच काही सांगून गेली |
नकळत विचारचक्र फिरवून गेली ||१||
याच अविस्मरणीय सायंकाळी मुले माझी गुरू बनली |
खेळ , विज्ञान  ,साहित्य , राजकारण |
आहार , पोशाख , नाट्य अन संगणक |
सार्‍याच बाबतीत तीच वरचढ ठरून गेली ||२||
याच उद्धस्त सायंकाळी विषय निघाला शिक्षकांविषयी |
नव्हते प्रेम , नव्हताच आदर |
तो शिक्षक, ती मॅडम |
असल्याच भाषेने झालो मी गारद ||३||
याच धूसर सायंकाळी गतकाळाची आठवण झाली |
मीही असा विद्यार्थी एक |
होते माझेही शिक्षक अनेक |
नव्हता मनात असा अनादर , सारेच प्रेमळ वातावरण ||४||
याच विचारप्रवर्तक सायंकळी, उलगडली मनाची कळी |
काहीतरी चुकतय , बरचस गमावलय |
आपणच आपल्याला बदलायला हवय |
याचाच मनाशी केला मी  पक्का निश्चय ||५||
याच भयानक सायंकाळी , कळले मला आम्हीच स्वार्थी |
संपाच्या तलवारीबरोबर |
ज्यांची आम्ही केली ढाल |
विविध शैक्षणिक प्रयोगात , केले आम्ही त्यांचेच हाल ||६||
याच दयनीय सायंकाळी विद्यार्थ्यांची कीव आली |
पेपरफुटी , मासकॉपी | ,तारखेत बदल |
मार्कात गोंधळ ,सरेच वार यानेच झेलले |
नैतिक शिक्षणाचे गोडवे गात ,यालाच आम्ही बेशिस्त ठरवले ||७||
                                                                                         नीला