आग 

समोर होळी पेटली होती. आकाशात ठिणग्या उडत होत्या. केशरी रंगाच्या असंख्य जिव्हा लवलवत होत्या. आणि त्यांच्या आवाक्यात जे जे येईल ते ते भस्मसात करत होत्या. मोठमोठ्या ओंडक्यांची क्षणात राख बनत चालली होती. ओंडक्यांच्या अस्तंगतेत राखेचा जन्म होत होता. जन्म मृत्युचा तो खेळ जितका मर्म भेदक तितकाच लोभसही होता. पिवळसर केशरीरंगाच्या ज्वाळा उंच उंच आकाशात झेपावतानच मध्येच लुप्त होत होत्या. आणि काळ्याभोर धुराच साम्राज्य पसरत होत. क्षणात त्या धुरातून वाट काढीत आगीचे लोळ पुन्हा पुन्हा उसळत होते. आणि पुन्हा पुन्हा लुप्त होत होते. आग आणि धूर याचा पाठशिवणीचा खेळ मी टक लावून कितीतरी वेळ पहात होते.
"दहन करणे" हा आगीचा गुण. जी जाळत नाही ती आग कसली? लहान असताना सुट्टीच्या दिवशी परसातला सारा पातेरा गोळा करायचा आणि आग पेटवायची हा आमचा नित्य उद्योग होता. मग त्या आगीत कचर्‍याबरोबर कधी फणसाच्या आठळा, कधी काजूच्या बिया तर कधी चक्क खेकडेही भाजले जायचे. मग त्या आगीत ज्या ज्या वेळी जे जे जाळल जाई; त्याचा वास सगळीकडे धुराबरोबर दरवळायचा. क्षणात परसाच रूपच पालटून जायच. सगळ कस स्वच्छ स्वच्छ व्हायच. बाजुला तीन दगडांच्या चुलीवर आ़ईने पाण्याचा हंडा ठेवलेला असायचा. नारळाची सोडण , करवंट्या , झावळ्या आणि झाडाच्या वाळलेल्या काटक्या टाकून त्या चुलीच्या आगीवरआंघोळीसाठी मस्त गरम पाणी तापवल जायच. मग एके दिवशी बाबांनी बंब आणला. आणि मग त्या बंबाच्या नळीत ही आग बंदिस्त होऊन पाणी तापवले जाऊ लागले.
चुलीपुढे लाकड सारता सारता धुराने चुरचुरणारे डोळे चोळत आणि फुंकणीने फुं फुं करीत आजीचे उभे आयुष्य सरले. मग आईने मात्र शेगडी व स्टोव्हला जवळ करून आगीचे रौद्र रूप एकदम सौम्य करत करत गॅसची दोस्ती केली; तेंव्हा जेवण घरातली आग एकदम पालटली. मंद निळसर ज्योतीने तिची जागा घेतली. बाथरूममधला बंब माळ्यावर पडला आणि गीझरची चलती सुरू झाली. मात्र जेवणघरातला भांड्यांचा काळेपणा आणि भिंतीची काजळी जशी नष्ट झाली ; तशी सुके मासे भाजायची पंचाईत झाली. शिवाय भाजलेल्या वांग्याच्या भरताचा स्वादही नष्ट झाला.
थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर पेटवलेल्याशेकोटीची आग मला आजही आठवते. अजिबात धूर होऊ न देता ती पेटवली जायची. आजुबाजुची लहानथोर सारी मंडळी त्या भोवती जमायची. काळ्याकभिन्न काळोखात बसून केलेल्या भुतांच्या गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या, भजनांचे सूर अजूनही आठवतात.शेकोटीच्या साक्षीने ठरलेल ते रंगादादाच आणि सुमाच लग्न अजूनही सर्वांच्या चर्चेचा विषय बनतो. याच शेकोटीच्या आगीसमोर अनेक वाद मिटवले गेले, आणि अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न सर्वानुमते सोडवले गेले.
"आग" या शब्दोच्चाराने इतिहासाच्या पुस्तकातील अनेक घटना डोळ्यासमोर येतात. त्यापैकी वाजतगाजत मृत पतीच्या चितेवरजिवंतपणी सती जाणार्‍या  स्त्रिया आणि मुघलांपासून आपला बचाव करण्यासाठी सामुदायिक जोहार करणार्‍या रजपूत स्त्रिया यांचा क्रम प्रथम लागतो. त्यानंतर आठवते ती रावणाची लंका जाळणारी मारूतीची शेपटी. आणि युद्धातील दग्धभू धोरण,शिवरायांच्या मावळ्यांच्यापेटत्या मशाली, इंग्रजी राजवटीत केलेली परदेशी कापडाची होळी अशा एक का अनेक घटना आग म्हणताक्षणीचआठवायला लागतात.
आगीच्या संदर्भातील अगदी अलिकडच्या काळातील घटना आठवल्या की मात्र मन धास्तावत.पहिल्या प्रथम डोळ्यासमोर येते हुंडा दिला नाही म्हणून सासरच्यांनी रॉकेल पेटवून जाळलेली स्नेहल आणि प्रेमभंग झाला म्हणून अंगावर रॉकेल ओतून स्वतःच जाळून घेतलेला राकेश, या दोघांनाही विसरता येण शक्यच नाही. गॅस सिलेंडर फुटून लागलेल्या आगीत मृत झालेली  कुटुंब, बाँबस्फोटतील आगीत बळी पडलेली कित्येक निरपराध माणसे, बिल्डिंग बांधण्याच्या इराद्याने स्वार्थी बिल्डरने पेटवलेल्या झोपडपट्या आशा अनेक घटना आग या शब्दाबरोबर स्मरणात येऊन मन विषण्ण करतात."अति परिचयात अवज्ञा" अस तर या आगीबाबत घडत नाही न? की पेटत्या मनाचा तो दृश्य परिणाम असतो?
तसा आगीचा संबंध मनाशीही आहेच की! अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्या विरोधात मन पेटून उठते. आतल्या आत धुमसत रहाते , पण त्याच्या ज्वाला भडकत नाहीत. करण या भडकलेल्या मनाला शांत करण्याची ताकद कोणात आहे असा विश्वासच वाटत नाही. कधी कधी अगदी आपल्या वाटणार्‍या व्यक्तीकडेहे मनच दु:ख नकळत उघड होऊन जात.डोळ्यावाटे घळाघळा अश्रु वहायला लागतात. क्वचित निखार्‍यासारखे तापलेले शब्द मुखावाटेबाहेर पडतात. मग पलिकडून चार समजुतीच्या, सहनुभुतीचा शब्दांची बरसात होते. पण पेटत्या मनाला विझवण्याच सामर्थ्य त्यात नसत. मन तसच धुमसत रहात. आतल्या आत आणखी जळत रहात. आपल्याच माणसाला दुखावल्याची खंत करीत रहात. एक अपराधी भावना निर्माण होऊन हे मन मग स्वतःच स्वतःवर भडकते. आणि एकदम गप्प गप्प होते. आपल्या भावना, आपले विचार, आपली तत्त्वे आणि आपली स्वप्ने यांची राख होत असतानाच भोवतालची आणखी  कितीतरी मने विनाकारणच होरपळली गेली हे लक्षातयेऊन मन खिन्न ,विषण्ण, हताश बनते. अशा वेळी वाटत, ज्यांच्याजवळ मनीचे दु:ख उघड कराव अशी समजुतदार माणस नाहीत त्या व्यक्ती आगीलाच आपल मानून सीतेसारख अग्निदिव्य तर करायला तयार होत नसतील ना?
नवनिर्मिती आणि विध्वंस अशा दोन्ही क्षमता अंगी असणारी ही आग लहानपणी पाळण्यात असताना "धुरी"च्या रूपाने आपल्याजवळ प्रथम येते. आणि आपल्या मृत्युनंतर तिनेच बळकट केलेले हे शरीर जाळण्यात पुढाकारही तीच घेते. जन्म व मृत्युच्या या मधल्या काळत अनेक रूपात भेटणार्‍या या आगीला मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने इलेक्ट्रिक वायरच्या छोट्याशा नळीत बंदिस्त केले. पण मनामनात पेटणार्‍या या आगीचं काय? वैज्ञानिक प्रगतीबरोबर अशा आगींची संख्या वाढतेच आहे. जंगलातले वणवे कमी झाले पण माणसाच्या मनातील वणवे वाढतच आहेत. बाँबस्फोट, जाळपोळ इत्यादि रुपात ते नित्य प्रकटच होत आहेत. ते शांत करण्यासाठी आपल्याला विज्ञानाची मदत नाही होऊ शकणार. उलट मनातील ही आग जितकी बंदिस्त करू तितक्याच रौद्र  रुपात ती आपल्याला आपले दर्शन देईल. मनामनातली ही आग शांत करायची असेल तर एकमेकांची मने वाचायला येण महत्त्वाच आहे. माणसाने माणसाला जाणून घ्यायला शिकल पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे.