दासबोध 

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला 'दासबोध' ग्रंथ वाचल्यावर खरोखरच आनंदाची डोही आनंद तरंगे अशी स्थिती झाली. तस पाहिल तर दासबोधात साहित्यिक रेखीव सलगपणा मुळीच नाही.त्याचे स्वरूप लिहिण्यापेक्षा बोलल्यासारखे अधिक आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारावेत  आणि समर्थांनी उत्तरे द्यावीत या स्वरूपाचेच ते लिखाण आहे. रचनेचा बांधेसूदपणा नसल्याने ते विस्कळीत वाटते. पण तरीसुद्धा त्यात आत्मीयता, जिव्हाळा आहे. दासबोधाची एकतरी अनुभवावी असे म्हटले जाते. पण एकच का त्यातील अनेक ओव्यात आपलेच प्रतिबिंब दिसते. आपल्या वैयक्तिक जीवनातील अपयशाची कारणे, आपल्या चुका त्यात आपल्याला सापडतात.
दासबोधाची रचनाच मुळी"शहाणे करून सोडावे सकळजन" या उद्देशाने झाली आहे. तस पाहिल तर महाराष्ट्रात संत साहित्याची वानवा मुळीच नाही.  परंतु अध्यात्म आणि प्रपंच यांचा सुरेख संगम रामदासांच्या साहित्यात आढळतो. "आधी प्रपंच करावा नेटका|  मग लागावे परमार्थ विवेका|"असे रामदास स्वामींनी सांगितले आहे. आणि पुढे "प्रपंच सोडून परमार्थ केला| तरी अन्न मिळेना खायाला| मग तया करंट्याला परमार्थ कैचा|" असे कारणही ते सांगतत. सुरूवातीला समर्थ प्रपंचाबाबत उदासिन होते. परंतु बारा वर्षाच्या भ्रमंतीनंतर "पाप इतुके जाहले पुण्य अवघेची बुडाले|" असा समाज त्यांनी पाहिला. प्रापंचिकांनी निराश व्हावे,प्रपंचावरची श्रद्धा उडावी आणि प्रयत्नावरही विश्वास राहू नये,अशा स्थितीत सापडलेला समाज त्यांना दिसला. "विप्री सांडिल आचार| क्षेत्री सोडिला विचार|" असे त्या समाजाचे वर्णन समर्थांनीच एके ठिकाणी करून ठेवले आहे. तेंव्हा अशा आपत्तीत सापडलेल्या समाजाला काहीतरी सांगितले पाहिजे हे त्यांना पटले. परमार्थ आणि प्रपंच यामध्ये समाज नावाची वस्तू आहे,आणि म्हणून आपल्या प्रतिपादनात बदल केला पाहिजे, हे त्यांना कळले. आणि म्हणून परमार्थ स्वतःपुरता ठेऊन लोकांना प्रपंचाचा आग्रह त्यांनी धरला. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आत्मिक विकास व्हावा, त्याबरोबरच सारा समाज पराक्रमी वर्धिष्णू बनावा अशी कळकळ त्यांना होती. म्हणूनच बहुजन समाजाला अनेक नीतिविचारच त्यांनी नुसते सांगितले नाहीत तर त्याचे सामुहिक व वैयक्तिक जीवनात स्वरूप कसे असावे याबाबत नेमके मार्गदर्शनही दासबोधात त्यांनी केले आहे. प्रपंच व परमार्थ, अध्यात्मिक व लौकिक यांची उत्कृष्ट सांगड समर्थाच्या विचारात दिसून येते. समाजाला एखादी गोष्ट एकदाच सांगून समजत नाही हे जाणून उलट सुलट प्रसंगपरत्वे तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांनी दासबोधात सांगितली आहे. 
     "पहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे सावधपण | सर्वांविषय चौथा अत्यंतसाक्षेप | फेडावे आक्षेप |" या ओवीत समर्थांचे धोरण स्पष्ट झाले आहे. हरिकथा निरूपण , राजकारण , सावधपण आणि साक्षेप या चार उपायांनी गलितगात्र समाजाला आत्मविश्वासाने उभे करता येईल व अवनतीला गेलेल्या समाजाला उर्जितावस्था आणतायेईल असा त्यांना विश्वास होता.त्यामुळे इतर संतांप्रमाणे केवळ नैतिक मूल्यांवर भर न देता नैतिक मूल्यांबरोबरच कठोर व्यवहारातील कटू गोष्टी त्यांनी विवरून संगितल्या आहेत. पण या कटू गोष्टींपासून आपले रक्षण कसे करायचे ,ताठ मानेने उभे कसे रहायचे तेही त्यांनी शिकविले. चातुर्याच्या युक्त्या सांगितल्या. व्यवहार नीती शिकविली. सत्पुरूष लक्षणांबरोबरच मूर्ख लक्षणेही सांगितली. गुरू कसा,  शिष्य कसा याचे मार्मिक विवेचन केले. बोलाव कस , चालाव कस , काय खाव , काय ल्याव या सार्‍याबद्दल मार्गदर्शन केले. स्वतः अनेक ग्रंथांचा अभ्यास केलाच  पण त्याला जोड दिली ती अनुभवांची. केवळ वाचन करून सांगितले असे नाही तर "आधी केले मग सांगितले " ही वृत्ती स्विकारली. विचाराला क्रियेची जोड दिली. "क्रियेवीण वाचाळ्ता व्यर्थ आहे" हे आपल्या आचरणांनी दाखवून दिले. म्हणूनच समर्थांचे विचार लोकांना आपलेच विचार वाटतात. समर्थ म्हणतात" हे प्रचितीचे बोल | आधी केले मग सांगितले | मानले तरी पाहिजे कोणी एके |"
दासबोधात समर्थांनी हरिकथा निरूपण ,राजकारण , प्रयत्न यासर्वच ठिकाणी सावधपण आवश्यक आहे असे सांगितले आहे. "अखंड सावधान रे | प्रयोग प्रेत्न मात्र रे | प्रसंग हा तुफान रे | नकोचि वेवधान रे ||" हे सावधपण म्हणजेच व्यवहार चातुर्य. दासबोधात या चतुर्यालाच समर्थानीं महत्त्व दिले आहे. आणि त्यासाठी एक समास लिहिला आहे. "चातुर्येविण उंच पदवी कदापि नाही "असे ते म्हणतात. "बाह्याकार शृंगारिले | तेणे लोकांच्या हातासी काय आले| चातुर्ये बहुतांसी रक्षिले नानाप्रकारे |" अशी चातुर्याची भलावण करत असतानाच "चातुर्ये शृंघारे अंतर | वस्त्र शृंघारे शरीर | दोहोमध्ये कोण थोर पहा बरे | असे सांगून ते आपल्याला विचार करायला लावतात.
समर्थ म्हणतात," दुसर्‍याच्या दु:खे दु:ख व्हावे | परसंतोषे सुखी व्हावे |प्राणीमात्रास मेळवून घ्यावे बर्‍या शब्दे ||
                        दुसर्‍याचे अंतर जाणावे | तदनुसारचि वर्तावे | लोकांस परीक्षित जावे | नाना प्रकारे ||
                        उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा |शब्द निवडून बोलावा | सावधपणे करीत जावा | संसार आपला ||
                         मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तीस सादर व्हावे | मरोन किर्तीस उरावे | येणे प्रकारे ||
राजकारण निरूपणात समर्थ म्हणतात ,
                       "नष्टासी नष्ट योजवे | वाचाळासी वाचाळ आणावे | आपणावरी विकल्पाचे गोवे | पडोच नेदी ||
                        कांटीने कांटी झडावी | झाडावी परि ते कळो नेदावी|कळकटेपणाची पदवी |असो द्यावी ||
                        हुंब्यासी हुंबा लावून द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौंदास पुढे उभा करावा |दुसरा लौंद||
                         धटासि आणावा धट | उद्धटसि उद्धट | खटनटासि खटनट | अगत्य करी ||
                         जैशास तैसा जेंव्हा भेटे | तेंव्हा मजालसी थाटे | इतेके होते परी धनी कोठे | दृष्टीस न पडे ||