तुतारी २ 

धर्माचें माजवुनि डम्बर ,
नीतीला आणिती अडथळे ;
विसरुनिया हें जातात खुळे;
नीतींचे पद जेथे न ढळे,
धर्म होतसे तेथेच स्थिर .


ह्ल्ला करण्या तर दंभावर --तर बंडांवर,
शुरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे
तुतारिच्या ह्या सुराबरोबर


नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी जाणा ;
प्रगतिस जर तें हाणी टोणा ,
झुगारुनि तें देउनि ,बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !


घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या त्वरा करा रे !
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढे सरा रे --
आवेशाने गर्जत 'हर हर ' !


पूर्वीपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती;
सम्प्रति दानव फार माजती ,
देवांवर झेंडा मिरवीती !
देवांच्या मदतीस चला तर !


कवी-  केशवसुत