दासबोधतील व्यवहार चातुर्य 

परमार्थ आणि प्रपंच यांची सुरेख सांगड समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध नावाच्या ग्रंथात घालून दिली आहे. अवघे जीवनच सुखमय करण्याचे उपाय त्यांनी दासबोधातून सांगितले आहेत. अनेक संतांनी "जगन्मिथ्या" असे म्हणून लोकांना जीवनापासून अलग राहून सुख मिळवण्याचे मार्ग दाखविले. पण रामदासांनी जगापासून ,त्यातील दु:खापासून दूर न पळता जीवनाला हसत हसत सामोरे जाण्याचे अनेक मार्ग लोकांना दाखवले व व्यवहार चातुर्य शिकवून लोकांना शहाणे केले.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे .समाजाशिवाय व्यक्ती जगूच शकत नाही. म्ह्णून प्रत्येकांने जास्तीत जास्त समाजाभिमुख झाले पाहिजे. सुखी जीवनासाठी"जनास मान्य ऐसी करावी क्रियासिद्धी |" असे ते सांगतात. "बहुतांचेसमाधान राखावे | बहुतांस मान्य ते बोलावे| विलग नपडो द्यावे कथेमध्ये|" असे सांगत असतांनाच त्याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. "आपण येकाकी येकला | सृष्टीत भांडत चालिला| बहुतांमध्ये येकल्याला यश कैचे| " म्हणून "जे बहुतांस मानले | ते बहुती मान्य केले| येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य|" ही वृत्ती कायम ठेवावी असे समर्थांनी सुचविले आहे.
"राखावी बहुतांची अंतरे|" हे समर्थांच्या सामाजिक उदबोधनातील महत्त्वाचे सार आहे.एकटा मणी शोभून दिसत नाही पण तीच जर मण्यांची माळ केली तर जास्त शोभून दिसते. तसे समाजात एकट्या व्यक्तीला महत्त्व नाही. किंबहुना परकीय आक्रमण थोपवून धरण्यास एकजीव समाजाची गरज आहे, हे ओळखून अनेक लोकांना एकत्र आणण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि इतरांनाही उपाय सांगितले.
पण असा समुदाय एकत्र करतांना चार सावधपणाच्या, व्यवहारचातुर्याच्या गोष्टीही समर्थांनी सांगितल्या.लोकसंग्रह करतांना "बहुत लोक शोधावे| त्यांचेअधिकार जाणावे| जाणजाणोन धरावे जवळी दूरी|" असे ते सांगतात. पुढे म्हणतात , "अधिकार पाहोन कार्य सांगणे| सापेक्ष पाहोन विश्वास धरणे| आपला मगज राखणे काहीतरी|"
समाजात स्वतःची किंमत कमी होऊ देता कामा नये. तुम्ही दुबळे, कमकुवत आहात असा जरा जरी समाजाला संशय आला तरी तुम्हाला नामोहरम करायला समाज टपलेलाच असतो. म्हणून आपल्याशी जसे इतरेजन वागतात तसेच आपणही त्यांच्याशी वागले पाहिजे. "जैशास तैसे |" ही वृत्ती ठेवावी. आणि "लोक पारखून सोडावे | राजकारणे बहुत झाडावे |पुन्ह मेळवून घ्यावे दुरिल्या दोरे |" असे समर्थ म्हणतात. एखादा आपल्यापेक्षा वरचढ होऊ लागला तर मोठ्या चातुर्याने त्याचा अभिमान दूर करावा.पण त्याचे चंगले गुण घेण्यासाठी इतरांच्या मदतीने पुन्हा त्याला जवळ करावा. नाक घासत स्वतः त्याच्याकडे गेले तर स्वतःचा कमीपणा उघडा पडतो. असा सल्ला ते देतात. आपल्या कार्यासाठी एखाद्याची गरजअसेल तर मात्र त्याचे "दोष देखोनी झाकावे| अवगुण अखंड न बोलावे|" अशी सूचना देत असतानाच "दुर्जन सापडोन सोडावे परोपकार करुनी |" हेही सांगायला ते विसरत नाहीत. दुर्जनाचा काटा काढतानासुद्धा सावधपणे काढावा, हे सांगताना समर्थ म्हणतात"करणे असेल उपाय | तरी बोलोन दाखवू नये |परस्परेची प्रत्ययो प्रचितीस आणावा |"
समाजात माणसे कशी जोडावी याचे सुंदर मार्गदर्शन दासबोधात वेळोवेळी केलेले आढळते. किंबहुना माणसे जोडून समुदाय करण्यावरच समर्थांनी अधिक भर दिला आहे. कारण माणसाला सार आयुष्य सभोवतालच्या समाजामध्येच घालवायचे असते. म्हणून "दुसर्‍यास सुखी करावे | तेणे आपण सुखी व्हावे | दुसर्‍यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये |" असा इशारा समर्थ देतात. लोकांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्या सांगितल्या आहेत. ते म्हणतात,"लोकी कार्यभाग आडे| तो कार्यभाग जेथे घडे | लोक सहजची ओढे कामासाठी |" हे लक्षात घेऊन थोडे कष्ट करावे लागले तरी चालतीलः पण अडलेल्या लोकांसाठी धाव घेणे आवश्यक आहे. सदासर्वदा लोकसेवेसाठी तत्पर असावे. त्यात आळस करता कामा नये."दु:ख दुसर्‍याचे जाणावे | ऐकून तरी वाटून घ्यावे | बरे वाईट सोसावे समुदायाचे |" असे सांगत असतानाच समर्थ सहनशील लोकांना सावध करतात. अति सहनशीलता कशी घातक ठरते हे सांगताना समर्थ म्हणतात ," जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना| अवघेची सोसिता उरेना महत्त्व अपुले |"तेंव्हा महत्त्व कमी होईल इतके अत्याचार सहन करणेही चुकीचे आहे. न सोसणार्‍याला जे दु:ख भोगावे लागते, त्यापेक्षा अधिक अति सोशिकाला भोगावे लागते. म्हणून त्यावर उपाय सांगताना समर्थ म्हणतात " बहुतांचे बहुत सोसावे | न सोसे तरी जावे दिगंतरा प्रती |"