आठवणीतले खेळ 

समोरच मैदान मुलांनी खच्चून भरलेले होते. बघावं तेथे क्रिकेटचा पसारा मांडलेला होता. मी एका झाडाखाली निवांत बसले . आणि समोरच्या मुलांत माझ बालपण शोधण्याचा माझ्या मनाचा नेहमीचाच खेळ चालू झाला. माझ सार बालपण खेड्यात गेल.भलमोठ घर,समोर तेवढच मोठ अंगण, घरामागे झाडाची दाट गर्दी आणि त्यातच लपलेला पाण्याचा मोठा हौद व विहीर अशा चित्रातल्यासारख्या घराला मागे सोडून लग्नानंतर मी मुंबईत रहायला आले.

आमच्या घराला जवळजवळ सात-आठ खोल्या होत्या. घरात एकत्र  कुटुंबात आम्ही  खूप मुले  होतो.  घरात अडगळही खूप होती. त्यामुळे आमचा लपाछपीचा खेळ कायम रंगायचा. दारामागे, पलंगाखाली ,कपाटावर ,असे कुठे कुठे आम्ही लपून बसत असू. राज्य असलेला गडी शोधून शोधून रडकुंडीला यायचा. मग मोठ्यांची मदत घेतली जायची नेत्रपल्लवी व्हायची .आणि झुरळांच औषध मारल्यावर झुरळ जशी पटापट बाहेर पडतात, तसे एकेक मूल लपलेल्या जागेतून बाहेर पडायचे.कधीकधी हाच खेळ बागेत रंगायचा. झाडवेलींच्या मागे, झाडांवर, रिकाम्या हौदात,अश्या अनेक जागा शोधल्या जायच्या. यावेळी भोज्या ठरवला जायचा. लपलेल्या मुलांपैकी एकाने जरी भोज्याला हात लावला ,तरी पुन्हा राज्य यायचे त्यामुळे कधी कधी एकाच मुलावर कायम राज्य असायचे. "डबा ऐसपैस" हाही लपाछपीचच एक प्रकार. फक्त यात भोज्याऐवजी डबा वापरला जायचा . प्रथम डबा उडवला जायचा. राज्य असलेल्या मुलाने तो जागेवर आणून ठेवीपर्यंत इतरांनी लपायचे. लपलेला मुलगा दिसला, की "अमुक डबा ऐसपैस" असे राज्य असलेल्या मुलाने ओरडायचे. लपलेल्या मुलांपैकी एकाने जरी डबा हळूच येऊन उडवला, तरी पुन्हा त्याच मुलावर परत राज्य यायचे.

                                                                                                                                                               बागेत आम्ही"खांब-खांब" असा खेळही खेळत असू. जेवढे खेळाडू त्यापेक्षा एक झाड कमी ठरवले जायचे. आणि मग
आपापले झाड मिळवण्यासाठी आम्हा मुलात झटापट चालायची. ज्याला झाड मिळणार नाही, त्याच्यावर त्यावर राज्य असायचे. बाकीच्यांनी झाड बदलायची. या अदलाबदलीत राज्य असलेल्या मुलाने स्वतःसाठी झाड पटकावयाचे. असा तो खेळ असायचा. हाच खेळ अंगणात खेळताना दगड, भिंती, खिडक्या यांचा वापर व्हायचा तर घरात खेळताना घरातील वस्तू,दरवाजे,खिडक्या वापरल्या जायच्या. अंगणात "दगड की माती","उन की सावली", "जमीन की माती" असा एकच खेळ ऋतूमानानुसार नाव बदलून खेळला जायचा. राज्य असणार्‍याने दोनापैकी एक घर मागून घ्यायचे बाकीच्यांनी त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करायचा. "आम्ही तुमचा घरात ,आम्ही तुमच्या घरात अशा आरोळ्यांनी वातावरण दुमदुमून जायचे.

"पकडपकडी", आबाधोबी, असे पळपळीचे खेळही आम्ही खूप खेळायचो. आबाधोबीसाठी चिंध्यांचा बॉल तयार केला जायचा. तो एकमेकांना मारायचा . तो लागू नये म्हणून पळत रहायचे. रडारड, भांडण, दमवणूक याने त्याचा अंत व्हायचा.लगोरीचा खेळही त्याकाळी सर्वांचा आवडता खेळ होता. नारळाच्या रिकाम्या करवंट्या एकमेकांवर रचून लगोरी रचली जायची . एक गटाने ती बॉलने फोडायची. व परत लावायचा प्रयत्न करायचा. दुसर्‍या गटाने बॉल मारून त्यांना ती लावू द्यायची नाही, असा तो खेळ होता.या खेळांना फारसे नियम नव्हते. पण लंगडी, खोखो, कबड्डी यासारखे नियमांनी बांधलेले मैदानी खेळही आम्ही आवडीने खेळायचो.

विटी-दांडू, काजुच्या बिया, गोट्या या खेळांवर सामान्यपणे मुलांची मक्तेदारी होती .घरातील लाकडापासून विटी आणि दांडू बनवले जायचे  काजुच्या दिवसात काजुच्या बिया जमविल्या जायच्या संपूर्ण मे महिना भर या खेळांची सरशी असायची. बहुतांशी मुली सागरगोटे, पाचखडे, भातुकली, टिकरी ,झिम्मा फुगडी यातच रमायच्या. रात्री पत्ते, गाण्याच्या नाहीतर नावांच्या भेंड्या, कथाकथन, नकला,यात लहानांबरोबर मोठ्यांचाही समावेश असायचा.

अशाप्रकरे खेळाच विश्व हे बिनखर्चाच काम असायच. त्यासाठी पालकांकडे कशाची मागणी करणे, हट्ट करणे या गोष्टींना मज्जाव होता. पालकही मुलांच्या खेळात फारसे डोकवायचे नाहीत. त्याबाबतीत मुलांना पूर्ण स्वातंत्र्य होत. असेल त्या परिस्थितीत , उपलब्ध साधनांनी, आपल्या स्वतःच्याच कल्पना लढवून आम्ही आमचा वेळ मस्त घालवायचो. अर्थात आजच्या सारख अभ्यासाच टुमण मागे नव्हत. आणि विविध गेम्सनी बाजारही भरलेले नव्हते. दूरदर्शन, संगणकाचा जामाना सुरू होण्या अगोदरच्या  गोष्टी आहेत या.