मनसोक्त 

    मनासारखे वागणे यालाच मनसोक्त वागणे अस म्हटले जाते. मनात येईल तेंव्हा ,मनाला वाटेल तसे , आणि मनाला वाटेल तेवढा वेळ कोणतीही कृती करायला मिळणे, यासारखा आनंद नाही. बांधिलकी विरहित काम म्हणजे मनसोक्त काम. "मजा आली. आज कितीतरी दिवसांनी मनसोक्त फिरायला मिळाल", किंवा"सगळ टेंन्शन खल्लास, त्यामुळे आज अगदी मनसोक्त खरेदी करता आली" "भरपूर वेळ होता बालपणी पोहायचो ना तसच बराच वेळ मनसोक्त पोहायला मिळाल"."आज मी खूप आनंदात आहे सगळी पथ्य विसरून मनसोक्त जेवणार आहे."यासारख्या वाक्यातूनच "मनसोक्त"मध्ये काय जादू आहे ते कळेल. लहानथोर सारीजण या मनसोक्तसाठी आसुसलेली असतात.पण तरीसुद्धा या "मनसोक्त" शब्दाला आपण जाणूनबुजून दूर ठेवत असतो. कोणाकडे पैसा आहे पण वेळ नाही म्हणून; तर कोणाकडे वेळ आहे पण पैसा नाही म्हणून; कोणी समाजाला घाबरतो; तर कोणी धर्माला. कोणाला पथ्य पाळायच असत तर कोणाला प्रिय व्यक्तिंची मने दुखवायची नसतात म्हणून मनसोक्तची साथच  सोडून देतात.आणि निखळ आनंदाला मुकतात.

मोठ्या माणसांच्या बाबतीत ही बंधन ठिक वाटतात; काहीवेळा इलाजच नसतो. पण बरेच वेळा विनाकारणच मनाला डावलले जाते. या विनाकारणात असतात लहानमुले. "मनसोक्त" पासून दूर ठेऊन त्यांच बालविश्वच उद्ध्वस्त केले जाते "अमुक इतकच खा,आजारी पडशील", "असच गाण म्हण नाहीतर बक्षिस मिळणार नाही", "भाषण असच उभ राहून याच आवाजात म्हण, तरच परीक्षक खूष होतील "हेच चित्र काढ ,तेच रंग वापर" असली बंधन मुलांवर विनाकारण लादली जातात. कधी कधी या सार्‍या बंधनांचा इतका अतिरेक होतो कि मुले त्या गोष्टी करायलाच कंटाळा करतात.एकदा तरी "मनसोक्त"चा आनंद त्यांना मनसोक्त उपभोगायला मिळू देत की . पडू देत आजारी, नको मिळू दे पहिला नंबर, हसू देत त्यांना लोक .त्यांचा त्यांना अनुभव येईलच की.त्या प्रसंगातून शिकतील त्यांची ती. अस शिकता शिकता ती मोठी होतील आणि "मनसोक्त" पासून आपोआप नकळतच दूर जातील. मोठ्यांनी त्यात लुडबूड करू नये. कारण "मनसोक्त"च  वास्तव्यच मुळी बालपणाच्या काळातच असत. " बालपणाचा काळ सुखाचा"  अस म्हटल जात ते याचसाठी. या अशा मनसोक्त बाललीलांचा आनंद मोठ्यांनीही मनसोक्त लुटावा .

मात्र मुलांना अशा मनसोक्त क्रिया करण्याची परवानगी देतानाच मोठ्यांनी हळूहळू त्यांना सामाजिक बांधिलकीची तसेच नैतिकतेची जाणीव जरूर द्यावी. तारूण्याच्या उंबरठ्यावर त्यांना "मनसोक्त"च्या मर्यादांचे भान आलेच पाहिजे. त्यांच्या मनसोक्त वागण्याचा इतरेजनांना त्रास होता कमा नये. असे भान आले तर अतिरिक्त  मद्यपान किंवा ड्रग्ज प्राशन करणे ,बेभानपणे मनसोक्त गाडी चालवणे,  आपल्या  प्रेमाचे मनसोक्त कुठेही कसेही प्रदर्शन करणे, मनाला येईल तसा पोशाख करणे इत्यादि अनेक गोष्टींपासून ते दूर रहातील.आणि त्यांच्याकडून घडू नयेत असे प्रसंग टाळता येतील.  थोडक्यात तारुण्यात "मनसोक्त"ला बंधनात ठेवणे गरजेचे आहे.

प्रौढावस्थेत तर "मनसोक्त"ला स्थान मिळ्णच कठीण जात .शारीरिक दृष्ट्या कमकुवतपणा आलेला असतो .जास्त बसता येत नाही जास्त उभही रहाता येत नाही.  खाण्यापिण्याचीही बंधन असतात. त्यामुळे पौढावस्था हे मनसोक्तच घर होऊच शकत नाही. सगळीकडे मनाला अडवणूकीची सवयच होऊन जाते.अर्थात खाणे, पिणे ,फिरणे,इत्यादि गोष्टींवर बंधन आली तरी आपल्या कुवतीप्रमाणे इतरांना सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आनंद मात्र अवश्य मनसोक्त लुटता येतो.

सारांश  बाल्यावस्था  हे "मनसोक्त"च स्वतःचच घर आहे.  तेथून त्याची हकालपट्टी करणे योग्य नाही.मुलांच्या भविष्यातील यशाचे हेच गमक आहे.