ग्रीन हाऊस परिणाम 

सर जोसेफ कुरियर यांनी सन १८२४मध्ये  प्रथमच "ग्रीन हाऊस परिणामां" कडे लक्ष वेधले.  ग्रीन हाऊस किंवा हरितगृह यामध्ये नियंत्रित वातावरणात वनस्पतींची वाढ करून जास्तीतजास्त उत्पादन मिळवले जाते,  ,हे आपणा सर्वांना माहीतच आहे.  अशाचप्रकारे प्रकारे पृथ्वीचे तापमान नियंत्रित करणारे वायु पृथ्वीभोवतालच्या वातावरणात आहेत. त्यांना "ग्रीन हाऊस वायू" असे म्हणतात. पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या खास गुणधर्मामुळे पृथ्वीला एक प्रकारचा उबदारपणा प्राप्त झाला आहे. वातावरणातील धुलीकण ,धुके यामुळे सूर्याचा प्रकाश अडवला जातो. आणि सूर्याची उष्णत अडवण्याचे काम वातावरणातील पाण्याची वाफ , कार्बनडाय ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड ,मिथेन हे घटक  करतात. हे वायू उष्णतेला जास्त अपारदर्शक असल्याने पृथ्वीवर सरासरी तापमान टिकवून ठेवण्यास मदत होते. म्हणून त्यांना "ग्रीन हाऊस वायू" असे म्हणतात.

पृथ्वीला उबदार बनवणार्‍या या वायूंचे प्रमाण नियंत्रित होते, तोपर्यंत सारे ठीक होते. पण मानवाने आपली प्रगती करण्याच्या नादात निसर्गाच्या कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरूवात केली आणि नकळतच वातावरणातील ग्रीन हाऊस वायुंचे प्रमाण वाढू लागले. या प्रमाणाबाहेर वाढलेल्या ग्रीन हाऊस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. तापमानातील वाढीमुळे ओझोनच्या थराला छिद्र, दु:ष्काळांच्या संख्येत वाढ, गोड्या पाण्याचा तुटवडा, प्रदुषित हवा, समुद्राच्या पातळीत वाढ, हिमनद्यांच वितळण, वाळवंटी प्रदेश वाढण, पिकांच्या जाती करपण, अन्नधान्याच उत्पादन कमी प्रतीच येण, इत्यादि अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

गेल्या शतकात पृथ्वीच तापमान ०.६ अंश सेल्सियस इतक वाढवण्याला जबाबदार आपणच आहोत. कारण वातावरणातील ग्रीन हाऊस वायुंचे प्रमाण नियंत्रित राखण्याच्या निसर्गाच्या योजनेचा आपणच बट्ट्याबोळ उडविला आहे. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेऊन त्याबदल्यात ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारी जंगले निसर्गात होती. पण अन्नधान्यासाठी शेती आणि स्वसंरक्षणासाठी निवारा याकारणांसाठी आपण मानवांनीच ती नष्ट केली. ग्रीन हाऊस वायुंची निर्मिती करणारे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादि घटक निसर्गाने पृथ्वीच्या पोटात दडवले होते. पण औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्याची वाढ, वीजनिर्मिती, वाहने इत्यादि अनेक कारणांसाठी निसर्गाने दडवलेल्या नैसर्गिक ज्वलनशील वायुंचा वापर मानवाने वाढवला आणि त्यातून ग्रीन हाऊस वायुंची निर्मिती आधिक होऊ लागली. इतकेच नव्हे तर या इंधनांच्या ज्वलनाबरोबरच क्लोरिन,फ्लोरिन ,कार्बन यांच्या संयोगातून नव्या मानवी ग्रीन हाऊस वायुंची निर्मितीही होऊ लागली आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही

ग्रीन हाऊस वायुंच्या प्रमाणात अतिरिक्त वाढ करून मानवाने अनेक नैसर्गिक आपत्ती स्वतःवर ओढवून घेतल्या आहेतच शिवाय निकृष्ट प्रतीचे अन्नधान्य, प्रदूषित पाणी, आणि दूषित हवा या गोष्टीही शिक्षेच्या रूपाने प्राप्त झाल्या आहेत. विकास आणखी विकास करण्याच्या मानवी छंदापायी भौतिक जग एकदम चकाचक झाले; पण मानवी शरीर मात्र दिवसेंदिवस कमकुवत बनू लागले आहे. आणि म्हणून आता या ग्रीन हाऊस वायुंच्या प्रमाणात घट करण्याचा प्रयत्नही मानवानेच करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम लोकसंख्या कमी केली पाहिजे. हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेणारी आणि ऑक्सिजन देणारी झाडे, मुबलक प्रमाणात लावली पाहिजेत. दगडी कोळसा, पेट्रोल ,डिझेल याचा वापर कमी केला पाहिजे. आणि पारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवला पाहिजे.