कथा (भाग १) 

[डॉ. सरिता साने यांचा दवाखाना. संध्याकाळ्चे सात वाजले आहेत. सरिता साने या मानसोपचार तज्ञ आहेत. सोफ्यावर पेशंट कुमारी कविता सामंत पहुडल्या आहेत. डॉक्टरिण बाई बाजूच्या खूर्चीत बसल्या आहेत.]
कविता : तर डॉक्टर असा हा माझा प्रोब्लेम आहे. टेन्शनमुळे रात्रभर झोप लागत नाही. आणि दिवसा  
             कामात लक्ष लागत नाही. सारख आपलं वाटत असतं कि मी जे करत आहे, करणार आहे ते
             चुकीचे कि बरोबर ? या टेन्शनचा अगदी वैताग आला आहे.
सरिता  : हं ! (हातातले पेपर्स खाली ठेवतात) पाणी हवय कां प्यायला ?
कविता : अं ?
सरिता  : पाणी! पाणी पिणार का?
कविता : हो. चालेल ना. जरा थकल्यासारख्ख वाटत आहे. घश्याला कोरड पडली आहे.
              (सरिता उठते आणि टेबलावर ठेवलेल्या ग्लासामध्ये  पाणि आणून कविताला देते.)
कविता : थँक्स.
सरिता  : (हसून) पाणि पिऊन झाले कि डोळे बंद करुन बस. आणि कोणताही विचार मनात येऊ देऊ  
              नकोस.
             (कविता मानेनेच होकार देते. सरिता कोपर्‍यातील फोन उचलते)
सरिता : अग शैला ! आज मला जशीर होईल निघायला हं ! अग तुझी जाण्यांची वेळ झालि असेल
             नां? नाहि. नाहि. तू जा..... कविताचे पेपर्स उद्या फाईलला अ‍ॅटॅच कर. ओ के हं ! गुड नाईट !
             (फोन ठेवतात, परत कवितापाशी येतात, कविता डोळे बंद करुन बसली आहे.)
सरिता : आता कसं वाटतय ! (कविता डोळे उघडण्याचा प्रयत्न करते.) अहं ! डोळे उघडू नकोस. मनावरचा
             ताण हलका झाल्यासारखा वाटत आहे का ?
कविता : हो डॉक्टर ! सगळा ताण निघून गेला. आता एकदम हलकं फुलकं वाटत आहे.
सरिता  : हं तर मग आता डोळे उघडण्यास हरकत नाही.
कविता : (डोळे उघडून) थँक्स डॉक्टर.
सरिता  : आता पुन्हा कामाच्यावेळी मनावर ताण आला की असंच डोळे बंद करुन बसा. समजला नां !
कविता : हो डॉक्टर तुमच्यापाशी काही जादू आहे का हो ? आपल्या या पहिल्याच भेटीत तुम्ही माझ्या
              मनावरचा ताण काढून टाकलात You are great Doctor.
सरिता : (हसायला लागते.) अहो जादू वैगरे काहि नाही. माझा पेशाच आहे हा. तर आता आपण शनिवारी
             भेटू. शुक्रवारी फोन करुन वेळ नक्की करून घ्या.
कविता : थँक्स डॉक्टर. तुमची फी ?
सरिता  : तीनशे रुपये.
             (कविता पर्स उघडून पैसे देते)
कविता : ठिक आहे. डॉक्टर येते मी.
             (उठून जाते)
सरिता : (स्वतःशीच) भलतीच चमत्कारिक मुलगी आहे ही. श्रीमंत पणाचे चोजले सगळे ! हं ! आता केस
             पेपर्स बघूया जरा. या पवारांचा अजून फोन कसा आला नाही ? अपाँइंटमेंट तर घेतलीय.
             (इतक्यात फोन वाजतो.)
सरिता : पवारच असणार बहुतेक (घसा साफ करत फोन उचलते) हं ! बोला पवार साहेब्.... काय ? कसं
            ओळखल ? अहो ! तुमच्या सारखा वक्तशीर माणूस अजून भेटायचा आहे. (हसतात.) नाही-नाही
            चेष्टा नाही करत तुमची. अहो ! पोलिसवाले तुम्ही तुमची चेष्टा करण्याची कोणाची बिशाद. हं !
            माझा आवाज ? नाही हो. जरा सर्दी झाली आहे, घसा बसला आहे, बाकी तुमचे कान एकदम
            तिखट हं. तर मग काय ? Any news. हं सकाळी अजून दोन मुलांना मारल त्यांन ? वय ? आठ
            आणि दहा. (लिहून घेतात) ठिक आहे. मी प्रोफाइल रेडी ठेवली आहे.... हं ! ठिक आहे घ्या
            लिहून.... पूरुष वय वर्ष चाळीस ते पन्नाशी दरम्यान. मुंबईत बहुतेक ऐकटाच राहतो. साधन
            आहे. हं. नाही नाही त्याची अंगकाठी नाही सांगू शकत. पण अपंग नक्कीच नाही. ओ. के. काही
            पत्ता लागला तर मला लगेच कळवा. ओ. के. (फोन ठेवते, आणि वळते.... दचकते.... दारात एक
            माणूस उभा आहे.)
माणूस : मी आत्माराम जोशी तुम्ही मला ओळखत नाही.
सरिता : (सावरून) तुम्ही आत कसे आलात ?
जोशी   : कसे म्हणजे ? या उघडया दरवाजामधून आलो.
सरिता : अहो, पण तुम्ही अपाँइंटमेंट घेतलेली नाही. आणि मी अपाँइंटमेंट शिवाय कोणालाच भेटत नाही.
जोशी  :  नाही. बरोबर आहे. माझ सुध्दा तुम्हाला भेटायच हे आधी ठरलेल नव्हतं. सहजच या बाजूला
             आलो होतो. म्हटल जावं भेटून.
सरिता : मिस्टर जोशी मी एक प्रथिययश डॉक्टर आहे. मानसोपचारतज्ञ आहे. मी सहजच कोणाला भेटत
             नाही.
जोशी  : पण प्रथियश मानसोपचारतज्ञ शहरात मोकाट सुटलेल्या सिरियल किलर बद्दल चर्चा करण्यास
            नक्की तयार होईल अले मला वाटते.
सरिता : (रागावून) मी माझ्याकडे असणार्‍या केसेस बद्दल कधिही कोणाशीही चर्चा करत नाही.
जोशी  : माझं थोडं ऐकून  तरी घ्या.
सरिता : तुमच्यासारख्या अगावू पत्रकाबरोबर मला मुळीच चर्चा करायची नाही.
जोशी  : हे बघा बाई, मी कोणी पत्रकार वगैरे नाही. पण मला तुमचा थोडा वेळ पाहिजे आहे. प्लीज. If you
            want I will pay you double. Please.
सरिता : चालते व्हा इथून, तुम्हाला काय मी वीकाऊ वाटले ? नाहीतर मला नाईलाजाने मला पोलिसांना
             बोलवावे लागेल.
            (जोशी खिशातून सुरा बाहेर काढतात.)
जोशी  : (रागाने) तुम्हाला माझ्याशी चर्चा करावीच लागेल. नाहीतर....
सरिता : (स्वतःला सावरून) शांत व्हा ! Calm down. आपण बोलूया. तुम्हाला हंव तितका वेळ बोलूया.
जोशी   : (हसून सुरा खिशात ठेवतात) जेव्हा मनासारखी गोष्ट घडत नसते तेव्हा 'साम, दाम आणि दंड' ही
             त्रिसूत्री वापरावी. यापैकी एकाची तरी मात्रा नक्कीच लागू होते.
सरिता : या ! इथे बसा, ज्या अर्थी तुम्ही हिंसेवर उतरला त्याअर्थी तुम्हाला नक्कीच काहीतरी
             महत्वाचे बोलायचे असणार.
जोशी  : महत्वाच तर आहेच. पण पहिल्यांदा मी माझी ओळख करुन देतो. या सुर्‍यावरुन तुम्हाला वाटल 
            असेल कि मी एखादा सराईत गुंड किंवा कसाई असेन. पण तस काही नाही. दहा दिवसापूर्वी
            मी युनिव्हर्सिटीत तंत्वज्ञानाचा प्रोफेसर होतो.
सरिता : हे एकून फार बर वाटलं. पण खर सांगायच तर तुंमचं हे वागण एखाद्या प्रोफेसरला शोभेल असे
             नाहि.
जोशी  : त्याबद्दल मला माफ करा. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
सरिता : ठिक आहे. मी समजू शकते. बरं त्या सिरियल किलरविषयी तुम्हाला काय सांगायचे आहे ?
जोशी  : तुम्हाला काय वाटत हो ? कंसा असावा हा सिरियल किलर ?
सरिता : (जोशींकडे रोखून बघत) मला वाटत.... खर सांगायच तर.... नाही माझी खात्री आहे, तुम्हीच
             सिरियल किलर आहात.
जोशी  : (मंदपणे हसतात) 'मी सिरियल किलर नाही', असे जर तुम्ही म्हणाला असतात, तर तुम्हाला
            ज्या कोणी डॉक्टर बनवल नां ? त्याला मी उभा आडवा कापला असता.
सरिता : म्हणजे माझा तर्क बरोबर निघाला तर !
जोशी  : हो, अगदी बरोबर. त्या मुलांना मीच मुक्त केंल या जगातून. हो. मीच तो सिरियल किलर.
            तुम्हाला माझी भीती वाटतेय ? तुम्ही घाबरला आहात Am I right Doctor ?
सरिता : हो मी घाबरले आहे. पण माझ्यामते ते साहजिकच आहे.
जोशी  : घाबरु नका डॉक्टर. इथे तुम्ही डॉक्टर आणि मी रुग्ण आहे. आणि रुग्णाने डॉक्टरचा आदर केला
            पाहिजे या मताचा मी आहे.
सरिता : थँक्स.
जोशी  : मला माहित आहे कि प्रत्येक मनोरुग्णाच्या आजारा मागे काहीतरी कांरण असते.
            मोटिव्हशिवाय कोणीही मनोरुग्ण बनू शकत नाही.
सरिता : होय बरोबर आहे तुमचं. आणि तुमच्या या अशा यमदुतासारख्या वर्तनुकीमागचे कारण जाणून
             घेण्यास मी उत्सुक आहे.
जोशी   : डॉक्टर, तुम्हाला मृत्यूविषयी काय वाटत हो ?
सरिता : माफ करा. पण तुमचा प्रश्न आणि त्याचा रोख मला समंजला नाही तुम्ही
             तत्त्वज्ञानी लोक फारच गूढ बोलता.
जोशी  : मृत्यू असाच गूढ आहे. अनादी काळापासून मृतूला कोणीच उमगू शकल नाही.
सरिता : बरोबर आहे तुमचं. खरचं, मृत्यू हा गूढ आहे. सामान्यांच्या आकलना पलिकडचा.
जोशी  : (मदंपणणे हसतात.) मृत्यू  म्हणजे काय ? मरणानंतर काय होते ? हे कोणालाच ठाऊक नाही. 
             सर्वांना एवढचं माहित असत कि, जन्माला येणारा प्रत्येकण हा मरणार असतो. हो. मधी ना
             कधी तरी मरणारच असतो. पण मृत्यू कसा येईल, केव्हा येईल, कोठे येईल हे कोणीही सांगू
            शकत नाही. कदाचित तो भरधाव वेगाने अंगावर येणारा ट्रक असू शकतो. कदाचित एक उंच
            लाट, कदाचित तो एखादा शार्क असू शकतो किंवा एखादा सूक्ष्म विषाणू, कदाचित.... असे
            असंख्य कदाचित आणले तरी मृत्यू हा कोणत्या रुपात येईल ते कोणीच सांगू शकत नाही. (उभे
            रहातात, टेबलापाशी जाऊन पाणी पितात.) मीही एक मृत्यूचच रुप आहे. तुम्ही मला यमदूत
            म्हणालात नाही का ? मृत्यूच आणखी एक रुप-रेडयावरुन येणारं भयानक आणि रौद्र.
सरिता : म्हणजे ? तुम्ही स्वतःला मृत्यू म्हणवता तर !
जोशी  : नाही. नाही. मला माहीत आहे कि मी मृत्यू नाही. याक्षणी तरी मी मृत्यू नाही पण भूतकाळात मी
            मृत्यू होतो.
सरिता : क........काय ? मी समजले नाही. (अस्वस्थपणे) तुम्ही काय बोलता आहात ते मला काही
             समजत नाही आहे.
जोशी  : मला अस म्हणायच आहे की आजपासून बरोबर तीन दिवसापूर्वी मझ्याकडून मृत्यूच काम
            काढून घेण्यात आलं.
सरिता : पण तुम्ही तर प्रोफेसर होता नां युनिव्हर्सिटीमध्ये ?
जोशी  : ते दहा दिवसापूर्वी. मधले सात दिवस मी मृत्यू होतो.
सरिता : पण मुलांचे खून तर तीन दिवसापूर्वी चालू झाले.
जोशी  : होय कारण मला त्याला परत भेटायच आहे.
सरिता : त्याला ?
जोशी  : मृत्यूला ...... त्याला मी दहा दिवसापूर्वी भेटलो होतो.
सरिता : म्हणजे तुम्हाला असं म्हणायच आहे का कि तुम्ही मृत्यूला भेटला होतात.
जोशी  : हो, मृत्यूला भेटलो. जसे तुम्ही आणि मी बोलत आहोत ना तसेच आम्ही भेटलो.
सरिता : आणि तरीही तुम्ही जिवंत आहात ?
जोशी  : अहो, ही काही भूताची गोष्ट नाही मी अजूनही जिवंतच आहे.
सरिता : मला हे सारच भयानक वाटतय. एखाद्या भयकथेसारख.
जोशी  : डॉक्टर, एकदा मृत्यूला बघितल ना कि या भयानक शब्दाच्या व्याख्या बदलून जातात.
            आत्ताआत्तापर्यंत सुदंर वाटणार, मोहात पाडणार हे जीवन भयानक वाटू लागत, तुकाराम
            महाराजही बोलून गेले. "आपुले मरण पाहिले म्या डोळा | तो झाला सोहळा अनुपम्य || फिटले
           सुतक जन्मामरणाचे | मी माझ्या संकोचे दूरी झालो ||" खरचं मृत्यू हा सहजसाध्य असताना
           या दुष्ट जीवनापाआयी आपण आयुष्यभर कष्ट घेत रहातो. जन्मापसूनच मृत्यू आपल्याबरोबर
           असतो. आपणमात्र त्याला सदैव विसरण्याचा प्रयत्न करीत असतो.
सरिता : खरंच मीही मृत्यूला घाबरते. आतापर्यंत मला ही वाटत होत कि मृत्यूला विसरण्याने मी सुखी
             होईन.
जोशी  : सुख ? (उद्दवेगाने) असं कितीस सुख तुमच्या नशिबात येतं ? या जीवनात येणार्‍या सुख व
            दुखःची मोजदाद केली, तर सुख देणार्‍या गोष्टी या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतात.
           या जीवनात आपल्यापुढे एकच लक्ष्य असते ते म्हणजे मृत्यूचे. आपण जन्मताच मरणाचे
           तिकिट काढून आलेलो असतो. तुम्ही मृत्यूचा विचार करा किंवा करू नका तो कधीच टाळता येत
           नाही. खरं पाहिल तर प्रत्येक  शर्यतीमध्ये जो पहिला येतो तो यशस्वी ठरतो. तो जिकंतो असे
           आपण म्हणतो मग या जीवनाच्या शर्यतीत आपण सारेच हरण्याचा प्रयत्न का करीत असतो !
सरिता : तुमच हे बोलण ऐकन टागोरांच्या काहि ओळी आठवल्या ते म्हणतात, "मी आणि माझ्यापाशी
             असणारे सारे काही, माझ्य इच्छा, आकांक्षा, माझ्या भावना तुझ्याकडेच ओढले जात आहेत हे
             मृत्यू ! तू एकदाच माझ्याकडे बघ. आणि मी सर्वाथाने तुझाच होऊन जाईन."
             (उतावीळपणे) जोशी खरच तुम्हाला मृत्यू भेटला होता ? कोठे भेटला होता तो ? कसा होता ?
जोशी  : (हसतात) तुम्ही फारच उत्सुक झालेला आहात. मझा अनुभव तुम्हाला अविश्वसनिय वाटेल. पण
            तुमचा विश्वास बसावा अशी माझी अपेक्षाही नाही. मला एक सांगा, तुमच्या मताप्रमाणे मला
            भेटलेला हा मृत्यू कसा असावा ?
सरिता : वेल ! तुम्ही एखाद्या भयाण वाडयात किंवा स्मशानात गेला असणार आणि एखाद्या अक्राळ
            विक्राळ...... (जोशी खो-खो हसायला लागतात).
जोशी  : डॉक्टर तुम्ही भूतांच्या सिरियल्स फारच बघता वाटतं.
सरिता : म्हणजे असं घडलं नाही तर.
             (जोशी परत हसायला लागतात)
सरिता : आतापर्यंत मला असच वाटत होत कि तुम्ही मला असचं काही सांगणार. रामसे बंधूंच्या
             चित्रपटाप्रमाणे तुमचा अनुभव असेल.
जोशी  : नाही नाही (हसता हसता) माझा अनुभव हा रामसे बंधूंचाच काय पण राम गोपाल
            वर्मांच्या चित्रपटाप्रमाणे पण नाही.
सरिता : मग एखादं स्वप्न वगैरे किंवा सुप्त मनाची जाणीव. मृत्यूची चाहूल देणारी.
जोशी  : मृत्यूची चाहूल देणारं स्वप्न ! अतिंद्रिय जाणीव ! सगळ कसं भारदस्त ! कधी कधी आपणास
            जाणवतही नाही कि एखादी अद्दभूत घटना अतिसामन्य वातावरणात घडत आहे म्हणून.
सरिता : (उत्सुकतेने) तर मग तुम्ही मृत्यूला भेटलात कसे ?
जोशी  : मी त्याला अगदी सहज भेटलो. जसे आपण भेटलो ना तसे. नव्हे त्याहिपेक्षा सहजतेने.
सरिता : म्हणजे ?
जोशी  : सांगतो ना ! दहा दिवसापूर्वीचा तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. एकेक गोष्ट मनावर
            कोरली गेली आहे. त्या दिवशी सकाळपासून सर्वकस अगदी नॉंर्मल होत. माझ्या
            संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस आहे असं जाणवतही नव्हतं. नेहमीप्रमाणे मी
            युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. एक वाजेपर्यंत लेक्चर्स दिली. आणि दिडच्या सुमारास सहज कॉफी
            प्यायाला म्हणून जवळच्या कॉफीहाऊसमध्ये गेलो. (अंधार होता. अधांरातच)
सरिता : म्हणजे तुम्ही रोजच कॉफी प्यायला जाता कि फक्त त्याच दिवशी गेलात ?
जोशी  : रोज नाही. पण आठवडयातून दोन तीन वेळा तरी मी तेथे कॉफी प्यायाला जातो.
सरिता : आजूबाजूचे वातावरण कसे होते ! हवा पडलेली होती कि ढगाळ वातावरण वगैरे.
जोशी  : उंम ! नाही वातावरण चांगले होते. आकश निरभ्र होते. आणि दुपारी जशी हवा असावयास हवी
            होती तशीच होती. तर एक कोपर्‍यातील टेबल अडवून मी बसलो होतो. हॉटेल बर्‍यापैकी भरलेले
            होते.
            (प्रकाश. कॉफीहाऊसचा अंतर्भाग, आजूबाजूला लोक कॉफी पीत बसली आहेत. जोशी येतात
             आणि मध्यभागी असणार्‍या टेबलापाशी येऊन बसतात.)
जोशी  : अरे वेटर ! शुक शुक ! हं इकडे ये लवकर.
वेटर   : हं ! बोला साहेब, काय घेणार ?
जोशी  : एक कप कॉफी आण.
वेटर   : आणि साहेब, खायला काय आणू ?
जोशी : अं ?
वेटर  : साहेब, चांगल्या पेस्ट्रिज आहेत.
जोशी : अंहं ! काही नको. नुसतीच कॉफी आण.
वटर  : ठिक आहे.
जोशी : (घडयाल बघत) जरा लवकर आण.
वेटर  : दोन मिनिटात आणतो. (जातो)
           (जोशी पेपर उचलून चालू लागतात. एक माणूस टेबलाजवळ येतो. वय २० ते २५ च्या दरम्यान,
           वेश-टि शर्ट आणि जीन्स)
माणूस : (घसा खाकरून) Excuse me.
             (जोशी पेपर्मधून डोके वर काढून बघतात.)
जोशी  : हं ?
माणूस: मी इथे बसू कां ? म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी येथे बसल तर चालेल कां ?
जोशी  : हो. हो. बसा ना. मझी काहीच हरकत नाही.
माणूस: थॅंक्स .
            (जोशी हसतात.)
माणूस: वेटर ! एक स्पेशल कॉफी. (ओरडून हातवारे करून)
माणूस: (जोशींना) इथे कॉफी छान मिळते.
जोशी  : (पेपर वाचता वाचता) हं !
माणूस: मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही नां ?
जोशी  : (पेपरमधून डोकं बाहेर काढून) नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही.
माणूस: नाही तस नाही. त्याच काय आहे- मला गप्पा मारायला फार आवडतात. कोणाशी काही बोललो
            नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतं.
जोशी : मग ?
माणूस: नाही. तुम्हाला जर वेळ असेल तर आपण गप्पा मारूया कां ?
जोशी  : (पेपर खाली ठेवत.) माझ्याकडे तसा फार वेळ नाही आहे. थोडयावेळाने मला लेक्चर देण्यास
            जायचे आहे. पण कॉफी पिऊन होई पर्यंत आपन गप्पा मारु शकतो.
माणूस: ओह ! थॅंक्स. तुम्हाला लेक्चर द्यायला जायच आहे. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात तर.
जोशी  : हो, मी या युनिव्हर्सिटीत तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर आहे.
माणूस: हे फार उत्तम झाल बघा. बर्‍याच दिवसात तत्त्वज्ञानावर कोणाशीही चर्चा झाली नव्हती.
जोशी  : म्हणजे तुम्हालाही तत्त्वज्ञानाची आवड आहे तर.
माणूस: तत्त्वज्ञान हो. मला आवडतं.
जोशी  : बाय द वे, तुम्ही काय करता ?
माणूस: म्हणजे ?
जोशी : नोकरी, धंदा हो.
माणूस: माझा धंदा आहे. खूप काम असत हो. असा मोकळा वेळ मला फार क्वचितच मिळतो.
जोशी  : काय धंदा आहे तुमचा ?
माणूस: मी लोकांची दु:खे दूर करतो.
            (वेटर दोन कप घेऊन येतो आणि टेबलावर ठेवतो आणि जातो)
जोशी  : मी समजलो नाही.
माणूसः मी सर्वांची दु:खे संपवतो, कायमची.
जोशी  : ओहं. म्हणजे तुम्ही समाजसेवक आहात तर.
माणूस: (ह्सून) म्हटलं तर आहे. म्हटलं तर नाही.
जोशी  : पण एवढया लहान वयात हे असलं काम ! काय.... पुढे पॉलिटिक्समध्ये शिरायचा विचार
            दिसतोय तुमचा.
माणूस: पॉलिटिक्स ? छे हो. तुमचा गैरसमज दिसतोय झाला आहे. आजच्या काळात राजकारणी माणूस
            कधी कोणाची दु:खे दूर करत असेल असं मला वाटत नाही.
जोशी  : तेही खरच आहे म्हणा ! देशात हजारो लोक मरत असताना आणि हे राजकारणी लोकं त्यांचा
            गैरफायदा घेतात. बाय द वे. नाव काय म्हणलात आपल ? भविष्यात कधी दु:खी झालो तर
            दु:ख दूर करायला तुम्हालाच बोलवेन. कस ?
माणूस: (जोशीकंडे रोखून बघत) माझ नाव........ मृत्यू !
जोशी  : (दचकतात. माणसाकडे काही न बोलता नुसतेच बघत रहातात)
जोशी  : (सावरून) माफ करा. पण मी समजलो नाही.
माणूस: (कॉफीचा घोट घेतो) मी मृत्यू आहे. I am death.
जोशी  : (रागावून) हे पहा मला असले विनोद आवडत नाहीत. आणि जर तुम्ही टी. व्ही. प्रोग्रॉमवाले
            असाल ना तर मी तुमच्यावर केस करेन.
माणूस: (हसता हसता) आजकाल सत्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नसतं.
जोशी  : तो सत्या रामगोपाल वर्माच्या चित्रपटात मेला आणि विश्वास पानिपतावर...... Now just leave
            me alone.
माणूस: मला माहीत आहे. (जोशी काही बोलायला जातात) मला माझ बोलण संपवू दे. (एक टिचकी
            वाजवतो, आणि स्टेजवरची सर्व माणसं स्तब्ध होतात)
            (माणूस उठून जोशींजवळ जातो. जोशी हलायचा प्रयत्न करतात पण ते शक्य होत नाही, मृत्यू
             जोशींच्या खांद्यावर थोपटतो)
माणूस: दिसणं आणि वाटणं यावर आपण किती अवलंबून असतो. पण अनपेक्षितता हीच जीवनाची
            खरी ओळख आहे. मला माहीत आहे की तुम्हाला अपेक्षित असणार्‍या मृत्यूच्या रुपाप्रमाणे मी
            दिसत नाही. पण त्यामुळे मी मृत्यू नाही असे तुम्ही म्हनू शकत नाही. जेव्हा तुम्ही जीवन
            जगत असता तेव्हा तुम्हाला अनपेक्षित गोष्टींना सामोंर जाण्याची तयारी ठेवावीच लागते. या
            जगात अपेक्षित अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे मृत्यू . आपण कधी ना कधी मरणार हे
            सर्वांनाच माहीत असतं. पण आपण कसे मरणार, कधी मरणार हे कोणालाच माहीत नाही. याला
            कारण हे अनपेक्षित जीवन जेंव्हा तुम्हाला मरणाची वेळ कळते ना तेंव्हा तुम्ही सारेच माझी
            अगदी आतुरतेने वाट पाहू लागता. मग जीवन नकोसे वाटू लागत. कधी कॅन्सरने ग्रस्त झालेला
            रुग्ण पाहिला आहे तुम्ही ? त्या वेदनादायी जीवनापासून मुक्त होण्यासाठी तो माझी आतुरतेने
            वाट पाहत असतो. जीवन हे असच दु:खमय आहे. दु:खाने भरलेले आहे. या जगात सुख म्हणाल
            तर फारच कमी आहे. पाण्यावरील तरंगासारखा असत हे सुख फारच थोडाकाळ त्याची जाणीव
            होते. आणि पाण्यावरील तरंग कसा नाहीसा होऊन पाणी पुर्वव्रत होते तसंच जीवनातील सुख
            संथपणे येते आणि हल़केच नाहीसे होते.  रहात ते फक्त दु:ख ओतप्रोत दु:खाने भरलेले जीवन !
            (कडवटपणे) जीवनाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत  दु:ख सर्वांना चिकटलेलच असत. अगदी
            सावलीसारख म्हणूनच जन्माला येणारा प्रत्येक  अभ्रक हे रडतच जीवनाची सुरवात करत.
            त्याला कळलेल असत कि एका दु:खी जीवनाची सुरवात आहे. पण मग या जीवनाच्या
            भूलभूलैय्या त्याला हळूहळू हवाहवासा वाटू लागतो. जगण्याचा मोह सुटत नाही. मग तुम्ही लोक
            सत्यापासून दुर जाऊ लागता. जीवनातील क्षणभंगूर सुखासाठी तुम्ही अफाट दु:ख आपलेसे
            करता. मीच तुमचा खरा सोबती आहे हे तुम्ही जाणून बुजून विसरतात मला तुमचा शत्रू मानता
            आणि मग मला टाळण्यासाठी आयुष्यभर  लढत रहता. पण शेवटी विजय माझाच असतो हे
            लक्षात ठेवा. तुम्ही ज्याला युध्द मानता ते तुमंच जीवनयुध्द असतं माझ्यासाठी ते युध्द
            नसतच ते माझ काम असत काम. तुम्ही नोकरी करता तस. खर सांगायच तर आजकाल मला
            या कामाचाच कंटाळा येऊ लागला आहे. एकही दिवस विश्रांती अशी नाहीच. तुम्हा सर्वांच्या
            वेदना आपल्याशा करताना मी अगदी थकून गेलोय. तुम्हाला मृत्यूच भय वाटत. पण माझ काम
            किती कठीण आहे, याची तुम्हाला जाणीवच नसते. आणि हीच जाणीव तुम्हाला मी करुण देणार
            आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्यायाला लावणार आहे. माझ्या कामाचा, मी एक आठवडा
            रजा घेणार तुम्ही घेता तशी. आजपासून तुम्ही माझ काम करायच. पुढील आठ दिवस तुम्ही
            मृत्यू असाल मृत्यू.
            (अंधार होतो)                       
                                                            (अंक पहीला समाप्त)