कवी केशवसुत 

कवी कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म सन १८६६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावी झाला. मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. सन १९०५ मध्ये हुगळी येथे प्लेगच्या आजाराशी झुंज देत त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

टिळक आगरकरांच्या न्यू. इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या कार्याचाही प्रभाव केशवसुतांवर पडला होता. आणि म्हणूनच देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या असंख्य कविता लिहून भारतीयांत राष्ट्र्प्रेम निर्माण करण्याचे कार्य केशवसुत करू शकले. राजकीय चळवळींपेक्षा तत्कालीन पुरोगामी सामाजिक वृत्तींशी ते मनाने अधिक एकरूप झाले होते. म्हणूनच सामाजिक सुधारणेसाठी लोकंना जागृत करणार्‍या "तुतारी"सारख्या कविताही त्यांनी लिहिल्या. राष्ट्रीय बाण्याच्या कवितांबरोबरच केशवसुतांनी निसर्ग कविता, प्रेमविषयक कविता, ,तत्वचिंतनपर कविताही लिहिल्या. या कवितांमधून त्यांची अमर्याद आत्मनिष्ठा, बंडासाठी आसुसलेली वृत्ती, बंधनाचा तिटकारा, इत्यादि अनेक स्वभाव वैशिष्ट्ये दिसून येतात. आपल्या कवितेतून कल्पनेच्या सहाय्याने जीवनातील अपुरेपणा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निसर्गातील चैतन्यशक्तीची त्यांना जाणीव होती. 'साध्या गोष्टीत मोठा आशय'  हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य होते.

केशवसुतांनी "सुनित" नावाचा परकीय काव्यप्रकार मराठीत रुजविला. "यमक" नावाच्या अलंकाराच्या सांकेतिक मांडणीत बदल केला. कवितेचे दोन किंवा चार ओळींचे खंड कल्पिण्याऐवजी चारापेक्षा अधिक ओळींचे  खंड त्यांनी केले. आणि चरणाची लांबी रुंदीही कमी-जास्त ठेवली. जुन्या सांकेतिक उपमा व उपमाने बाजुला सारून नविन प्रतिके व रूपके निर्माण केली. वृत्त रचनेतील बदलाप्रमाणेच काव्यात "झपूर्झा" सारखे नवे शब्द त्यांनी वापरले.

केशवसुतापासूनच आत्मनिष्ठ काव्याला मराठीत प्रतिष्ठा मिळाली. निसर्ग कवितेला स्वयंभू स्थान मिळाले. प्रेमविषयक नवा दृष्टिकोन लाभला. दैनंदिन जीवनातील नवा आशय काव्य रूपाने प्रकट होऊ लागला. नवे नवे काव्य प्रकार व रचना प्रकार रूढ झाले. लेखनशैलीला अधिक साधे व लवचिक वळण मिळाले. आणि जुनी काव्य परंपरा नष्ट झाली. म्हणूनच एकलकोंडा, व एकमार्गी स्वभाव, काहीशी संकोची,मितभाषी व अंतर्मुख वृत्ती असलेल्या कवी केशवसुतांना "आधुनिक कवींचे कुलुगुरू" किंवा "युगप्रवर्तक केशवसुत" असे म्हटले जाते.