कवी वामन पंडित 

सन १६०८ ते १६९५ या कालखंडात म्हणजेच शिवकाळात वामन पंडित नावाचे कवी महाराष्ट्राला लाभले. आयुष्यभर विद्याव्यासंग करण्यार्‍या या कवींनी जवळजवळ बारा लाख श्लोक , पन्नास हजार कविता लिहिल्या. त्याकाळात काशी क्षेत्रात त्यांनी इतके सन्मान मिळवले कि तेथून महाराष्ट्रात येताना ती सारी प्रमाणपत्रे त्यांना गाढवावर लादून आणावी लागली. त्यांनी कथा काव्य , तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिले . संस्कृत ग्रंथ त्यांनी स्वतः रचलेच पण संस्कृत ग्रंथांची मराठीत भाषांतरेही केली.जगन्नाथ पंडित नावाच्या संस्कृत कवीचे "गंगालहरी" काव्य त्यांनी मराठीत केले. १२३२ समश्लोकी गीता मराठीत लिहिली. याशिवाय "यथार्थ दिपिका" नावाचा गीतेवर टिकात्मक ग्रंथ , "निमसागर", "शुकाष्टक" वगैरे १२ ग्रंथ, रामायणावर आधारित सात काव्ये, महाभारतावर आधारित सहा काव्ये, भागवतावर आधारित पंधरा काव्ये आणि "द्वारकाविजय " नावाचे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले. त्यांच्या काव्यात उपमा, उत्प्रेक्षा आदि अनेक अलंकार, व यमकांचा भरपूर वापर केलेला आढळतो. परमेश्वरावर त्यांची नितान्त श्रद्धा होती. आयुष्याच्या उत्तर काळात गावोगाव किर्तन करून लोकांना सन्मार्गाचा उपदेश त्यांनी केला.