कर्मयोगी अप्पा पटवर्धन 

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील आगरगुळे या गावी ४ नोव्हेंबर १८९४ मध्ये अप्पा उर्फ सीताराम पटवर्धन यांचा जन्म झाला. मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमधून बी. ए. केल्यानंतर त्यांनी प्रथम क्रमांकाने एम. ए. ची पदवीही मिळवली. त्यानंतर पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये ते तत्त्वज्ञान विषय शिकवू लागले. याच काळात रामादास स्वामींकडून प्रेरणा घेऊन आजन्म ब्रम्हचारी रहाण्याची आणि समाजसेवा करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.

ब्रिटिशांनी रौलेक्ट अ‍ॅक्ट पास केल्यानंतर अप्पांनी आपल्या नोकरीचा राजिनामा दिला आणि ते गांधीजींच्या कार्यात सामील झाले. पुण्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 'समाज समता' संघामार्फत आयोजलेल्या सहभोजन कार्यक्रमात ते सहभागी झाले. त्यांनी "ब्राम्हण भंगी प्रभू संतान ; सफाई पूजा एक समान " अशी घोषणा देत मालवणमध्ये भंगीकामही केले. कुणबी लोकांच्या सहवासात बालपण गेल्याने त्यांचे दु:ख दरिद्र्य अप्पांनी पाहिले होते. अशा लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी " कुणबी सेवा संघ " स्थापन केला.  पण या सर्वांपेक्षाही त्यांनी कणकवली येथे चालू केलेल्या "गोपुरी" आश्रमामुळे त्यांचे कार्य विशेष नजरेत भरते. या ठिकाणी  सामान्य लोकांच्या उन्नत्तीसाठी त्यांनी अनेक ग्रामोद्योग सुरू केले.