कुणी उंदीर देता का उंदीर 

कुणी उंदीर देता का उंदीर 


"बेंच वर उभा रहा तास संपेपर्यंत, 
ह्या असल्या घाणेरड्या अक्षरात शुद्धलेखन लिहण्याची हिम्मत झालीच कशी तुझी, अरे अक्षर आहेत का उंदराचे पाय"

बापरे..! सर आज जास्तच रागवले माझ्यावर. पण हि काय पहिली वेळ नव्हती. या आधी ही माझ्या अक्षरांची तुलना उंदराच्या पायाशी झाली होती. खुप वेळा सर म्हणाले होते कि, तुझ्या अक्षरांपेक्षा उंदराचे पाय बरे. सर सारखे  माझ्या अक्षरांची तुलना उंदराच्या पायाशी का करतात हे मला कळत नव्हतं. मी ठरवलं ह्या उंदराचे पाय असतात कसे हे पहायचेच. 

घरी गेलो, 
"आई आई मला उंदीर हवाय."
"काय ?? उंदीर..! हे काय मधेच ?"
शिवणकाम करत करतच आईने विचारलं.
"अगं आई मला उंदराचे पाय बघायचे आहेत."  मी म्हणालो.
"आधी स्वत:चे पाय बघ किती घाण झालेत जा धूऊन ये"
"नाही....आधी मला उंदीर आणून दे मला उंदीर पाहिजे. "
मी आणखीन हट्टी स्वरात बोललो.
"अरे पण कशासाठी ?" 
"कशासाठी हे नतंर सांगतो पण मला उंदीर हवाय म्हणजे हवाय."
माझा हट्ट वाढत होता.
"गपचुप हातपाय धूऊ आणि आभ्यासाला बस, तुझ्या शाळेसाठी नवीन गणवेश शिवत आहे. उद्या माझा राजा नवीन शर्ट घालणार. ओहोssss"
थोडसं रागात आणि थोडसं लाडात आई म्हणाली.
"नकोयत मला नवीन कपडे मला उंदीरच हवाय."
असं बोलुन मी दप्तर टाकुन एका कोपऱ्यात फुगून बसलो. कोपरा हा फुगून बसण्यासाठी जगातली सर्वोत्तम जागा आहे. 

आईला कळेना मी असं अचानक उंदीर का मागतोय ते, आई म्हणाली,
" देव्हाऱ्यावर जा गणपतीच्या मूर्तीखाली आहे बघ उंदीर....बघ जा. "

"काय? खरचं..! "
मी आनंदात उड्या मारत धावत धावत देव्हाऱ्याजवळ गेलो गणपतीच्या खाली उंदीर शोधू लागलो. मूर्ती लहान असल्यामुळे उंदीर लवकर दिसला नाही. 
"दिसला दिसला..!
अरे पण हे काय ह्याचे तर पायच दिसत नाहीयेत ? शी बाबा या उंदराचा काहीच उपयोग नाहिये. "

ज्या गतीने मी देव्हाऱ्याकडे गेलो होतो त्याच गतीने बाहेर आलो.

"आई तुझ्या त्या उंदराचा काहीच उपयोग नाही" 
थोडासा चिडून मी म्हणालो.
"अरे माझा थोडीच आहे ? त्या गणपती बाप्पाचा आहे" 
आईने विनोद करण्याचा उत्तम प्रयत्न केला होता पण तो फसला आणि माझा चेहरा पाहुन ते तिच्या लक्षात सुद्धा आलं बहुतेक. दुसऱ्या क्षणाला ती लगेच बोलली,
" मग कसला उंदीर हवाय तुला ?"
"पाय असलेला" मी चटकन म्हणालो.

जवळ जवळ एक तास आमच्या दोघात उंदीर या विषयावर चर्चा झाली. आईला कळत नव्हतं मी असा का जगा वेगळा हट्ट धरलाय. नंतर आईचा असा गैरसमज झाला कि, मला खेळण्यातला उंदीर हवाय. आई म्हणाली,
" तुझ्या बाबांना सांगुन आणायला लावते उदया उंदीर"
पाय असलेला, मी लगेच म्हणालो.
"हो रे बाळ पाय असलेला"

दुसऱ्या दिवशी शाळेतुन घरी आल्यावर,

"आई आई बाबांनी उंदीर आणला ?"
"अरे आधी हात पाय धू कपडे बदल"  
"नाही नको आधी उंदीर,"
"बर बाबा जा कपटात ठेवलाय घे"
"अगं आई कपाटात का ठेवलस ? कपडे कुरतडेल तो"
"कपडे कुरतडेल" या वाक्यावर आई हसली. हसण्याचे कारण नाही समजले आणि मी विचारायच्या मुड मधे पण नव्हतो. मला कधी एकदा उंदराचे पाय बघू असं झालं होतं. सर का माझ्या अक्षरांची तुलना उंदराच्या पायाशी करतात हे मला जाणून घ्यायच होतं.
मी पुन्हा आनंदात उड्या मारत मारत कपाटा जवळ गेलो, कपाट उघडला आणि उंदीर शोधू लागलो.

"सा प ड ला !
हे काय ? उंदीर लाल असतो, आणि याचे पाय गोल असतात ? "
बाबांनी खेळण्यातला उंदीर आणला होता. मी तो उंदीर घेऊन बाहेर आलो.
"आई गं, हे काय आहे?" थोडासा रागातच.
"छान आहे ना उंदीर ! हे बघ याला ना अशी चावी द्याची मग ना सोडून द्यायचं खाली. बघ कसा तुरूतुरू पळतो, आणि याला...."
"याचे पाय कुठं आहेत? आईला मधेच तोडत मी बोललो"
"अरे याला ना पाय नसतात याला चाक असतात. म्हणून तर खाली ठेवल्यावर तो तुरुतुरु पळतो ना "
"आई मला खेळण्यातला उंदीर नकोय खराखुरा उंदीर हवाय."
इतक्या प्रेमाने आणलेल्या उंदरावर एका अभ्यासु समीक्षकाप्रमाणे मी सडेतोड टिका केली आणि पुन्हा जगातल्या सर्वोत्तम रुसुन बसण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जागेवर जाऊन रुसुन बसलो.

जगातल्या कुठल्या मुलाने आपल्या आईकडे जिवंत उंदीर हवाय असा हट्ट धरला होता हे आईच्या ऐकिवात नव्हते त्यामुळे आई माझ्या वर काहीतरी विकृत परिणाम झाला कि काय या शंकेत होती. माझ्या नकळत माझ्या मित्रांना माझ्याबद्दल विचारत होती. शाळेत नीट वागतो का नाही. वागण्यात काही बदल तर नाही ना झाला वगैरे वगैरे. नंतर मला कळलं कि आई शाळेत पण येऊन गेली होती माझ्या नकळत माझ्या शिक्षकांना विचारायला हेच उंदीर पुराण. पण त्यांच्याकडून पण काही माहिती मिळाली नाही. आईची चिंता वाढत होती आणि माझं उंदराचं हट्ट अजुन संपलेलं नव्हतं.

आईने विचार केला, जाऊ दे याला आपण देऊयाच जिवंत उंदीर, बघुयातच हां करतो तरी काय ह्या उंदराच. आणि सुरु झालं आईच मिशन उंदीर. सर्वप्रथम आईने आपल्याच घरात उंदीर आहे का याचा शोध घेतला. माळ्यावर, स्वयंपाक खोलीत, बाहेर व्हरांड्यात, टेबलाखाली, कमानीत संपूर्ण घर आईने scan केलं होतं पण उंदीर कुठच सापडला नाही. जवळ जवळ दोन तास उंदराचा शोध चालु होता. पण उंदराने काय दर्शन दिले नाही. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट
मात्र छान झाली ती म्हणजे किती तरी दिवस न आवरलेलं घर नकळत आवरून झालं. आता इथून पुढचा एक आठवडा तरी सगळ्या वस्तू ह्या वेळेवर मिळणार होत्या.

शाळेतुन आल्यावर माझं रोज उंदीर पुराण चालु व्हायचं. आई रोज कामातुन वेळ काढून उंदराचा शोध घेत असे. दिवस सरत होते. उंदीर काय सापडत नव्हता शेवटी आईने शेजारी पाजारी विचारायला सुरुवात केली. 

"अहो सुनीता वाहिनी तुमच्याकड़े उंदीर आहे का ?"
हां प्रश्न ऐकून शेजारून निमूटपणे चाललेल्या दर्शना काकू बोलल्या,
"अगं उंदीर काय मागत आहेस ? उंदीर ही काय मागायची गोष्ट आहे का ? शेजाऱ्याकडून कसं साखर, दूध, तेल, पेपर अशा गोष्टी मागयाच्या असतात. एवढं बोलुन दर्शना काकू आपण पुलंपेक्षा दर्जेदार विनोद केला या अविर्भावात हसत हसत निघून गेल्या. आईने मात्र दुर्लक्ष केलं पण सुनीता वाहिनी दर्शना काकूंचा मान ठेवण्यासाठी थोड्याशा हसल्या.
"सुनीता वाहिनी तुमच्याकड़े उंदीर आहे का ? " आई पुन्हा बोलली.
"उंदीर ! कशासाठी ?" सुनीता वाहिनीनी विचारलं.

खरंतर आईला 'आहे ' अथवा 'नाही ' 
वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असलेल्या उत्तराची अपेक्षा होती पण वाहिनीनी प्रश्नार्थक वाक्याचा बाण सोडला.

'अहो त्याचं काय झालं ' या वाक्यापासून सुरवात करून आईने 'तर असं आहे'  या वाक्यापर्यंत सगळी हकीकत सांगितली. 

"अग्गोsss बाईsss ! हे काय भलतच ? उंदीराचा हट्ट कुणी धरतं का ?" सुनीता वाहिनींनी नको असलेली त्यांची बहुमोल प्रतिक्रिया दिली.
"अहो ते राहु द्या, उंदीर आहेत का तुमच्या घरात ते सांगा "
" नाही बाई" संथपणे सुनीता वाहिनींनी सांगुन टाकलं.
"अगं मग सटवे आधीच सांगायच ना उगीच माझा वेळ वाया घालवला" मनातल्या मनात आई बोलून गेली आणि तोंडावर मात्र 
"अच्छा येते हा वाहिनी"

आई पुन्हा चिंतेत. आता कुठं शोधायाचा हा उंदीर. नाही म्हणलं तरी सगळे विचारणारच कशाला हवाय उंदीर म्हणून. सगळ्यांना सांगत बसायचं म्हणजे बापरे. पण आईने एकदा का काम हाती घेतलं तर ते काम पूर्णत्वाला नेतेच अशी ख्याती आहे आमच्या आख्या घरामधे. तुम्हाला काय वाटलं आख्या पंचक्रोशित ? काय तुम्ही पण विनोद करताय राव. 


तर पुढचं घर गोवर्धन काकुचे..
"आहात का घरात वाहिनी ?" आईने बाहेरून आवाज दिला.
"कोण" आतून आवाज आला.
"अहो मी आहे मी" 
एवढ्यात गोवर्धन वाहिनी आल्याच बाहेर.
"अय्या तुम्ही होय, या ना घरात अगदी वेळेवर आलात बसा" गोवर्धन वाहिनी म्हणाल्या.
"म्हणजे मी यावं असंच तुम्हाला वाटत होतं का ?" आईने बसत बसत विचारलं
"अहो म्हणजे काय ? तुमचंच घर आहे कधी पण या, बर हे पहा ना आताच पार्सल आलय.  माझ्या भावानं पाठवलय. " 
असं म्हणून चार पाच साड्यांचा गठ्ठा गोवर्धन वाहिनींनी आईच्या मांडीवर ठेवलं.

आईला कळुन चुकलं आपण किती चुकीच्या वेळी आलो ते.
"आग्गोsssबाईssss gas वर दूध ठेऊन मी तशीच आले " अगदी perfect कारण सांगुन आईने तिथून पळ काढला. पण या सगळ्यात महत्वाच काम होतं ते राहूनच गेलं. 
उंदीर !
नको त्या वेळी घरात थैमान घालत असतात आणि आता हवाय म्हणलं कि....

असो, आताचे कुठे दोन घरं झालेत अजुन संपूर्ण सोसायटी बाकी आहे. तर पुढचं घर कोमल वाहिनीच.

"अहो कोमल वाहिनी आता तुमच्याकडेच येत होते बरं झालं तुम्ही रस्त्यातच भेटलात" 
"हो का ? या ना मग चला घरीच जाऊ मला ही खुप बोअर होत आहे मस्त बसुन गप्पा मारु" 
"हो हो मारू मारू" नाईलाजाने आईला हो म्हणावं लागलं, आई तरी काय करणार ? अडला हरी.....

"तुमच्याकडे उंदीर आहेत का ? " आईने थेट विषयाला हात घातला. 'कशासाठी' या प्रश्नाच्या अपेक्षासोबतच.
आणि समोरून प्रश्न यायच्या आतच, का हवाय हे सुद्धा सांगितलं. 
"अरे देवाsss आज कालची मुलं ना काय काय हट्ट धरतील ना देवच जाणे." कोमल काकुंनी देखिल आपली बहुमोल प्रतिक्रिया देऊन टाकली.
"हो ना" आईने देखिल हो मधे हो मिसळलं.
"आहेत ना उंदीर?" आईने आता विषयाला दुसरासुद्धा हात घातला अहो म्हणजे दुसऱ्यांदा हात घातला.
"तुम्हाला म्हणून सांगते आमचा चिंटू आहे ना, अहो म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा त्याने तर एकदा भिंतीवरची पाल हवीय असाच हट्ट धरला इतका रडला इतका रडला त्याची समजुत काढता काढता नाकी नौ आले होते." कोमल वाहिनींची गाडी अचानक बहिणीकडे कशी काय वळाली कुणास ठाऊक. 
"आणि हे तर सोडा थोड्या दिवसांनी परत......................."
कोमल वाहिनी बहिणीच्या घरातून बाहेर येतच नव्हत्या. 
आई बिचारी गपचुप ऐकत होती. 
"बरं तुम्ही काय म्हणत होतात ? उंदीर ना ?"
हुशssssssssss !
अखेर कोमल वाहिनी विषयावर आल्या.
"अहो उंदीर नाहीयेत आमच्या घरात" 
शेवटी व्हायचे तेच झाले एवढा वेळ खर्च केला ते काय "नाही" हे उत्तर ऐकण्यासाठी ? आई ने कसे बसे राग नियंत्रण केले आणि उंदीर शोधाला तात्पुरते स्वल्पविराम दिले. या उंदराच्या पायात घरची सगळी कामं तशीच राहिली होती. आई ची अवस्था नटसम्राट मधल्या आप्पासाहेब बेलवलकर सारखी झाली होती फक्त संवादामधे थोडा बदल झालय. म्हणजे 'कुणी घर देता का घर' च्या ऐवजी 'कुणी उंदीर देता का उंदीर' 

शाळा सुटली मी घरी आलो. रोजच्याप्रमाणे आईला उंदीर मिळाला का विचारलं आणि कपडे बदलून बाहेर खेळायला गेलो. खेळायला जाणे फक्त निमित्त होते. बाहेर कुठं उंदीर सापडतो का याच्यासाठीच मी हल्ली बाहेर पडत असे माझ्या अक्षरांमधे आणि उंदराच्या पायात काय साम्य आहे हे मला काही केल्या जाणुन घ्यायचेच होते. आणि त्यासाठी मी घरापासून दूर दूर भटकत असे. या गोष्टीवरुन आई रागवायची सुद्धा. तरी पण मी त्याकडे दुर्लक्ष करुन दूर जातच असे. मला उंदीर हवा होता काही केल्या. 

घरी आलो,
आई माझं दप्तर तपासत होती. वह्या, पुस्तकं, आभ्यास रोजच्या रोज करतो का नाही, शिक्षकांच्या शेरा, वगैरे वगैरे. 
तपासत असतानाच मी आलेला पाहून आई म्हणाली,

"अरे काय रे हे ? अक्षर आहेत का उंदराचे पाय ?"
"आई तू पण ?" 
"काय तू पण ! "
"तू पण माझ्या अक्षरांची तुलना उंदराच्या पायाशी करतेस ?"
"मी पण म्हणजे ? कुणी पण हेच म्हणेल. "
" जा मी तुझ्याशी बोलणार नाही, कट्टी फूsss ! तू पण तशीच आणि आमचे सर पण तसेच, ते पण माझ्या अक्षरांना उंदराचे पाय म्हणतात. सगळे मला चिडवा पण उंदीराचे पाय कसे असतात हे मात्र सांगू नका.
एवढं बोलून मी आईवर रुसुन बसलो.

आईला मात्र माझ्या या जगावेगळ्या उंदीर हट्टाचा संदर्भ लागला. मी उंदीर का मागत होतो हे आईच्या लक्षात आलं. हा सगळा प्रकार समजल्यावर आई माझ्यावर हसायला लागली. आणि मी मात्र रुसुन पुन्हा कोपऱ्यात जाऊन बसलो. 
आई म्हणाली,
"अरे गाढवा...."
'गाढवा' शब्द ऐकताच मी आणखीन रुसलो. आईला मधेच तोडत मी म्हणालो,
" जा आता तर तुझ्याशी बोलतच नाही, एक तर माझ्या अक्षरांना उंदराचे पाय म्हणतेस आणि मला गाढव ?"
"अरे बाबा उंदराचे पाय म्हणजे...तुझे अक्षरं पाहिलास का तू ? पहा किती वाकडे तिकडे आहेत, शब्दांवर नीट रेषा पण मारता येत नाहीत तुला..आणि हे काय ? 'फ' असं काढतात का, अरे 'फ' आहे का 'क' हेच कळत नाहीये. आणि बाळा हे काय ? 'न' आणि 'ण' मधे गल्लत नाही करायची. 'पाणी' ऐवजी 'पानी' असं लिहलस तू. तुझे अक्षर उंदरासारखे आहेत याचा शब्दश: अर्थ नको घेऊस. आता मी मगाशी तुला गाढव म्हणाले तर तू काय गाढव झालास का, नाही ना ? तसच तुझ्या अक्षरांना उंदराचे पाय म्हणलं तर ते काय खरेच उंदराच्या पायासारखे झाले ? याचा अर्थ तूझे अक्षर घाण आणि अशुद्ध आहेत तुला अक्षर सुधारायची गरज आहे असं होतं. आणि वेड्या तू उंदराच्या मागे लागलास होय ? चल हात पाय धूऊन ये जेवायला वाढते.

आईने मला खुप छान पध्दतीने समजावलं होतं. मी जेवायला बसलो. पण या सगळ्या उंदीर पुराणातुन आईला एक गोष्ट मात्र लक्षात आली तुलना हि फार भयंकर गोष्ट आहे. त्यातल्या त्यात मुलांची तुलना म्हणजे फारच भयानक. मग ती अक्षरांची असो वा शेजारच्या बंटीशी असो किंवा अमुक पेक्षा तुला किती कमी मार्क पडले म्हणून असो. हि मुलं तुलना फार सिरिअस घेतात. आणि त्यावर नको ते विचार करतात आणि Frustrate होतात. हे सगळं टाळायच असेल तर तुलना पण टाळायच पाहिजे. 

"आई आज आमटी खुप छान झालीय"
"आवडली बाळाला ? घे अजुन घे"
"हो माऊशी करते ना अगदी तशी झालीय"
"गप्प जेव" आईने वाढता वाढता चमचा मागे घेतला. 


लेखक:सागर सुभाष अचलकर
         ८७९३८७५४५६