हिशोब 

हिशोब


"मला आताच्या आता ताबडतोब भेटायचाय तुला नेहमीच्या ठिकाणी" हे एकच वाक्य बोलुन तिने फोन कट केला. आणि मी हातातली सगळी कामे बाजूला ठेवून तिला भेटण्यासाठी निघालो. आजही नेहमीप्रमाणे मीच तिच्या आधी पोहोचलो होतो. आणि नेहमीप्रमाणे एक डोळा घडळ्याकडे आणि एक डोळा ती येण्याच्या दिशेला लावुन बसलो. मगाशी तिने जे वाक्य फोनवर सांगितल (आठ शब्दांचे वाक्य) ते वाक्य ती मेसेजवरही पाठवू शकली असती. पण तिने फोन केला आठ सेकंदाचा तो कॉल म्हणजे 1.5 paise Per Sec च्या हिशोबाने बारा पैसे तिने या एका वाक्यासाठी खर्च केले तेही मोफत मेसेजची सुविधा असून देखिल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तिचा फोन तिची मर्जी तू का हिशोब लावत आहेस ? प्रश्न पडणं साहजिक आहे आणि याचं समाधानकारक उत्तर देखिल माझ्याकडे आहे...त्याचं काय आहे कि मी खूप हिशोबी स्वभावाचा माणूस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा recharj मी करतो. 

या हिशोबाच्या विचारात मी हरवलेला असतानाच ती बाजूला येऊन बसल्याचा भास मला झाला. मी वळून बाजूला पाहिलं तर खरच ती येऊन बसली होती. एरवी ती असं गुपचुप येऊन कधीच बसायची नाही. माझं लक्ष नसताना हळूच कानाजवळ येऊन भॉsssक करायची आणि एकटीच खुळ्यागत हसायची. 

आज मात्र असं काहिच घडलं नव्हतं ती आल्यापासून गप्पच होती, दोघांची एकदा नजरा नजर तेवढी झाली होती बस. तिला आज काहीतरी वेगळं बोलायचं आहे हे मी ओळखून घेतलं. शाळेत बाई जेंव्हा निबंधाचा विषय देत त्यावेळी आपल्याला सुरवात लवकर सापडायची नाही. बहुतेक अशीच काहीशी अवस्था तिची झाली असावी म्हणजे तिला सुरुवात सापडत नसावी. माझे हे असे विचार चालू असताना ती मधेच आणि अगदी सहजपणे बोलून गेली..
"मला तुझ्यापासून वेगळं व्हायच आहे"
हे अनपेक्षित वाक्य माझ्या कानी पडताच माझी नजर मी पटकन तिच्याकडे वळवली आणि तिला मात्र माझ्या नजरेचा सामना करता आला नाही. तिने नजर लपविली. मी काहीच न बोलता माझी नजर पूर्ववत केली. नजरेचा हा खेळ 10 सेकंद चालला. त्यात तिने आणखी 20 सेकंद add केले. असा भला मोठा 30 सेकंदाचा pause घेऊन तिने मला काळजीच्या स्वरात एक प्रश्न टाकला. माफ करा काळजीच्या स्वराचा अभिनय करत प्रश्न टाकला असं म्हणायचं होतं मला. 
"तू माझ्याशिवाय जगु शकशिल ? "

या प्रश्ननावर मी इच्छा नसताना देखिल माझ्या दोन ओठांना विलग न करता एक छोटसं स्मितहास्य दिलं आणि उत्तर न देता तिला प्रतिप्रश्न केला. 
तू सूर्य आहेस का ?
ती "नाही" म्हणाली
मी पुन्हा त्याचं प्रकारचा दूसरा प्रश्न केला
मग तू चन्द्र आहेस का ?
यावेळीही तिचं उत्तर नाहीच होतं
असे लागोपाठ मी अनेक प्रश्न तिला विचारले
तू हवा आहेस का ?
तू अन्न आहेस का ?
तू पाणी आहेस का ?
तिने प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर दिले..
नाही..नाही..नाही !
मी शांतपणे म्हणालो...
मग मी तुझ्याशिवाय सहज जगू शकतो.
ती यावर काहीच बोलली नाही आणि ताडकन उठुन निघुन गेली.

मी मात्र जागचा न हलता तिथेच बसून राहिलो आणि
माझ्या हिशोबी स्वभावामुळे आता पर्यन्त तिच्या सोबत घालवलेल्या वेळेचा हिशोब घालू लागलो. माझ्यापुढं आता हिशोबाचं एक खूप मोठं गणित होतं "वेळेचा हिशोब" आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या भावनांचं हिशोब जे कधीच सुटणारं नव्हतं. 

लेखक:- सागर सुभाष अचलकर
+९१ ८७९३८७५४५६