डायरी 

डायरी !


मी रोज नदी किनारी त्या दगडावर बसुन माझी तिच रोजची जुनी पुरानी फाटलेली डायरी वाचत असे. ती माझी रोजची सवयच होऊन गेली होती. रोज तिच नदी, तोच दगड, आणि तिच दिशा. सर्व काही तेच तेच तेच फक्त डायरीचं पान मात्र वेगळं. नियतीने मला या निसर्गावर सोडलं आहे, मला कुणीच मित्र नाही कुणी नातेवाईक सुद्धा नाहीत, माझ्या कुणी जवळचं असेल तर फक्त अन फक्त ही डायरी ! ही डायरी जर नसती तर मी कोण आहे, कशासाठी आहे, का आहे ? कधीच कळालं नसतं. 
 

आज ही मी नेहमी प्रमाणे डायरी वाचत बसलोय. डायरी वाचताना त्यातल्या शब्दांशी पात्रांशी इतका एकरूप होतो की त्या डायरीतल्या घटना मला प्रत्यक्षात समोर घडताना दिसतात.

या डायरीत गोष्ट आहे एका मुलीची आणि एका मुलाची जे की रोज एकमेकांना भेटायला येतात याच नदी किनारी, आणि बसतात याच खडकावर जिथे की मी बसतो. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम, जसं माझं या डायरीवर आहे अगदी तसं, मुलगी एकदम साधी भोळ्या स्वभावाची. कोणत्याही निर्णयाची जबाबदरी हेड डिपार्टमेंट कडे न देता हार्ट डिपार्टमेंट कडे सोपवणारी. अsssहं ! मुलीचा स्वाभाव लिहलेला नाहीये या डायरीत हा माझा अंदाज आहे की तिचा स्वभाव असा असेल म्हणून. पण मुलाबद्दल भरपूर काही लिहलय यामधे. मुलगा मात्र डोक्याने विचार करणारा सगळे निर्णय प्रक्टिकली विचार करून घेणारा, calculative आयुष्य जगणारा, आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवी मनाचा. तिच्यावर केलेल्या सगळ्या कविता तोंडपाठ आहेत मला. आज ही तो तिला एक कविता वाचुन दाखवत होता...

"सुर उमलले तुझीया कंठातुनी
येऊनी माझीया मनात ठसले
तू एकदाच केलीस ग 
पापण्यांची उघडझाप

आणि मन माझे तुझ्या
डोळ्यात फसले"

अशा अनेक कविता त्याने तिच्यावर लिहल्या होत्या. 
एकदा त्याने तिला गमतीत विचारलं. 
"मी तुझ्यावर एवढ्या छान छान सुंदर कविता लिहतो तु काय लिहतेस ग माझ्यावर" 
ती काहीच बोलली नाही आणि आपल्या पर्स मधे हात घालून एक डायरी काढून त्याच्यासमोर ठेवली, त्यानं विचारलं
" काय आहे हे" 
ती म्हणाली "डायरी"
"अगं हो पण कसली" तो म्हणाला,
"आपल्या दोघांची डायरी ज्यात मी फक्त तुला आणि मलाच लिहलय, आपण रोज भेटतो, बोलतो, आणि दुसऱ्या दिवशी मात्र सगळं विसरून जातो. पण मी मात्र आपल्या सगळ्या भेटी या डायरीत कैद करून ठेवते. आपली पहिली भेट, आपल्या प्रेमाची सुरुवात, आपलं एकमेकांना चोरून बघणं, अशा सर्व घटना तारखासहित मी यात लिहून ठेवल्यात...तो मधेच तिला तोडत, "ए मला दे ना तुझी डायरी वाचायला" 

"नाही अशी कुणाची पर्सनल डायरी वाचायची नसते"

"अगं आपल्या दोघात काय पर्सनल"

"एकदा नाही म्हणलं ना नाही"

तो तिच्या हातातून डायरी हिसकावून पळु लागतो आणि ती त्याच्या मागे मागे...पकडा पकडी चा हा खेळ 10 मिनिट चालतो आणि ती दमून खाली बसते.
तो तिला लांबून चिडवत,
"पर्सनल का? बघतोच कशी वाचु देत नाही डायरी" 
असं बोलून तो डायरी वाचण्यासाठी उघडतो तो थेट शेवटच पान.

"आज त्याला कसल्याही परिस्थितीत सांगितलच पाहिजे, किती दिवस मी लपवणार आहे हे त्याच्यापासून ? कधी ना कधी सांगवच लागणार आहे मला. पण कसं ? सुरुवात कशी करू? तो नेहमी चेष्ठेच्या मूड मधे असतो. याला पण तो चेष्ठाच समजला तर ? नाही आज त्याला हे सांगितलच पाहिजे की मी तुझ्यापासून प्रेग्नंट आहे "

पुढचं एक अक्षरही न वाचता तो धाडदिशी डायरी बंद करतो न तिच्याकड़े जातो.
"हि घे तुझी डायरी"

"काय ठरवलस मग" ती विचारते

"कशाबद्दल" माहित असून माहित नसल्याचा अभिनय करत तो म्हणतो.

"आपल्या बाळाबद्दल"

तो शांत राहतो. 

"बोल ना गप्प का आहेस" ? ती म्हणते

"आपण प्रेमामधे हद्द पार केव्हा केली हे कळलं सुद्धा नाही ग, आपण पुढचा विचार न करता प्रवाहासोबत वाहत गेलो फक्त" हे बोलताना त्याचा स्वर अगदी गंभीर होता. 

ती त्याच्या गंभीर स्वराशी स्वर न जुळवता, " अरे मग आता काय बिघडलय ? आता करू ना पुढचा विचार,

तो मात्र त्याच स्वरात, "सगळं झाल्यावर विचार करायचा ? आयुष्य इतकं सोपं वाटतं तुला" ?

"अरे सोपं काय अवघड काय हे ठरवणारं शेवटी आपलं मनच असतं ना" ? तिच्या स्वभावानुसार तिने हे वाक्य बोलून टाकलं
 
दोघांच्या या चर्चे मधे एक गोष्ट मला कळाली, तिला या बाळाला जन्म द्यायच आहे पण त्याला मात्र ते बाळ नकोय.....

"हे बघ मला आता यावर जास्त चर्चा नकोय" 
थोडासा अडखळत पण डोळ्यात डोळे घालून त्याने एकदाचं सांगुन टाकलं
"तू पाडून टाक बाळाला" 

"काय म्हणालास पाडून टाकू ? का ? काय चुक आहे याची" थोड्याशा रडक्या आणि रागाच्या स्वरात ती बोलली.

त्याला तिचा स्वाभाव चांगलाच ठाऊक होता. ती इमोशनल आहे, भावनेच्या भरात काहीही निर्णय घेते, बुद्धीपेक्षा मनाचं जास्त ऐकते. त्यामुळे पारिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता तो समजावनीच्या सुरात म्हणाला,

"हे बघ माझं ऐक, माझं अजुन शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, मला सेटल व्हायला अजुन दोन वर्ष तरी लागतील, आपण बाळाचा विचार लग्नानंतर करूयात, जर आता बाळाला जन्म दिला तर आपल्याला ताबडतोब लग्न करावं लागेल आणि माझी सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य नाहीये. तू प्लिज समजुन घे आणि........"

त्याला मधेच तोडत "हे बघ पाण्यात पडल्यावर पोहता येतं, तू नकारत्मक विचार नको करूस आपल्यात क्षमता आहे बाळाला सांभाळायची, माझं ऐक आपण जन्म देऊया या बाळाला" 

दोघांच हे चर्चासत्र (भांडण) खुप वेळ चालुच होतं, कुणीही माघार घ्यायला तयार होतं नव्हतं, दोघेही आपल्या निर्णयावर अगदी ठाम होते. मला मात्र कळेना की बरोबर कोण आहे आणि चुकीच कोण आहे. कधी ती बरोबर वाटायची कधी तो. चर्चा वाढतच होती शेवटी असह्य होऊन तो तिच्यावर ओरडतो...

"बाsssस ! खूप झालं, आता मला या विषयावर एक अक्षर ही चर्चा करायची नाहीये. माझ्या निर्णयावर मी तटस्थ आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू जर तुझा निर्णय बदलला नाहीस तर तुझा माझा संबध संपला. तुला बाळ किंवा मी या दोन्हीपैकी एकाला निवडता येईल." 

एवढं बोलुण तो तिच्या उत्त्तरची वाट न पाहता तिथून निघून गेला. एवढ्या कठोर शब्दांचा वापर तो तिच्या समोर पाहिल्यांदाच करत होता. ती मात्र अजुन तिथेच बसून होती अश्रु ढाळत. एवढ्या कठोर शब्दांची सवय तिलाही नसल्यामूळे अश्रु येणं साहजिक होतं. ती आता एकटीच बोलत बसली होती...

"मला माहितीय तू स्विकारशिल आम्हा दोघांना. मी माझा निर्णय बदलणार नाही तुला निर्णय बदलायला भाग पाडेन". 

एवढच बोलून ती निघून गेली, त्यानंतर दोघेही कित्येक दिवस नदीवर आलेच नाहित, काय झालं तिचं ? बाळाचं ? तिचा बाळाला जन्म देण्याचा निर्णय बदलला का ? का त्या मुलाने निर्णय बदलला ? काहीच कळत नव्हतं. दिवस सरत होते नियमाप्रमाणे....

ती आली...हो ती आज आली तिच्या बाळाला घेऊन. पण ती एकटीच का आली ? तो कुठाय त्या बाळाचा बाप ? बहुतेक त्याने तिला सोडून दिलं का ? हो तिच्या चेहऱ्यावरून तर तसच वाटत होतं...

ती आली आणि त्या बाळाला त्याच दगडावर ठेवून रडू लागली ज्या दगडावर ते दोघे बसत. ती रडली खूप रडली शेवटी कसंबसं रडणं थांबवून ती बोलू लागली

"माझ्या बाळा मला माफ कर मी तुला एकट्याला टाकुन हे जग सोडून जात आहे, माझा निर्णय चुकला तुला जन्म देऊन असं नियती सांगत आहे पण माझा निर्णय बरोबर आहे हे तूला दाखवून द्यायच आहे. मला तुला या जगात आणायचं होतं आणि मी आणलं पण त्यामुळे माझं प्रेम मला सोडून गेलं आणि म्हणूनच मी हा जग सोडायचा निर्णय घेतला. बाळा तुझी आई वाईट होती असा विचार नको हा करूस कधी. मी जरी तुझ्यासोबत नसले तरी या डायरीच्या रुपाने सदैव तुझ्या सोबत असेन" 
ती डायरी त्या बाळाच्या बाजूला ठेवते आणि पुन्हा बोलू लागते

"बाळ तू इथे रोज येत जा, याच दगडावर बसत जा, रोज ही डायरी वाचत जा. तुला कळेल तुझी आई कोण होती तुझे बाबा कोण होते. मला खात्री आहे तो या नदीवर पुन्हा नक्की येईल तुला नक्की ओळखेल तो तुझा स्वीकार करेल"

एवढं बोलून ती नदीच्या दिशेने चालू लागली आणि त्या नदीच्या पात्रात विलीन झाली आणि मी आई ने सांगीतल्या प्रमाणे रोज इथे बसून तिची ती डायरी वाचतो. 

लेखक:- सागर सुभाष अचलकर
           +९१ ८७९३८७५४५६