टूथब्रश डे 

सकाळी उठल्यावर प्रथम हातात येणारी वस्तू म्हणजे टूथब्रश. ब्रश म्हणजे दातांचा झाडूच. आज विविध आकारात आणि विविध प्रकारात उबलब्ध असलेल्या या टूथब्रशची प्रथम निर्मिती करण्याचा मान चीनने पटकावला. सन१४९८च्या जून महिन्याच्या सव्वीस तारखेला त्याची निर्मिती झाली असे म्हटले जाते. म्हणूनच २६ जून हा टूथब्रश डे म्हणून साजरा केला जातो. टूथब्रशच्या निर्मितिपूर्वी कडूलिंब व बाभळीच्या काड्यांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी होत असे. सुरवातीला हाडांपासून तसेच बांबूपासून टूथब्रशचे हँडल बनविले जाई आणि त्याच्या ब्रिसल्ससाठी जनावरांचे केस वापरले जात असत. सन १७८० मध्ये इंग्लंडच्या विल्यम एडिसने टूथब्रशला आधुनिक रूप दिले. त्यानंतर सन १९३८ मध्ये अमेरिकेतील एच. एन. वॉसवर्थ यांनी टूथब्रश बनवण्याचे प्रथम पेटंट मिळवले.मग त्यात हळूहळू सुधारणा होत जाऊन आजचे आधुनिक रुप त्याला प्राप्त झाले.
                  या टूथब्रशचा वापर करताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
१.] ज्या दिशेने दात उगवतात त्या दिशेप्रमाणे ब्रशचे धागे फिरवावेत. याचाच अर्थ वरच्या दातांसाठी ब्रशचे धागे वरून खाली तर खालच्या दातांसाथी ते खालून वर असे फिरवावे.
२.] दाढा घासताना ब्रशवर मध्यम जोर देऊन ब्रश गोलाकार फिरवावा.                                                   ३.] ब्रशचा वापर करताना फार कमी किंवा फार जास्त जोर दातांवर देऊ नये मध्यम जोर द्यावा जास्त जोर दिल्याने दाताचे इनॅमल नष्ट होण्याची भीती असते.
४.] एकाग्रतेने शांतपणाने केवळ दिड ते दोन मिनिटेच दात घासावे. जास्त वेळ घासल्यास दाताचे इनॅमल झिजू शकते.
५.] टूथब्रशचा वापर करताना त्या ब्रशचा स्पर्श प्रत्येक दाताला होईल याची काळजी घ्यावी. ब्रशचा वापर करताना हिरड्यांवरही हलका भार द्यावा त्यामुळे हिरड्या मजबूत तर होतातच पण त्यामधील रक्ताभिसरणही सुरळीत होईल.
६.] ब्रशच्या मागच्या बजुला असणार्‍या टंग क्लिनरने जीभ साफ करावी.
७.] ब्रश खरेदी करताना त्याचे धागे मऊ आहेत कि नाहीत ते पहावे.
८.] ब्रशचे धागे ब्रशचा वापर करुन वेडेवाकडे झाले असतील तर लगेचच ब्रश बदलावा.
९.] दात ब्रश करुन झाले की भरपूर पाण्याने खळखळून चूळ भरावी.
१०.] रात्री झोपताना अणि सकाळी उठल्यावर असे दिवसातून दोन वेळा दात ब्रश करावेत.