ग्वाल्हेरचा किल्ला 

        भारतातील मध्यप्रदेश राज्यात असलेला कलात्मक आणि भव्य असा ग्वाल्हेरचा किल्ला पहाण्याचा योग आला. जमिनीपासून साधारणतः तीनशे फूट उंचीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. पावणे दोन मैल लांबी आणि २८०० फूट रुंदी असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच आहे. किल्ल्याच्या उत्तरेला स्वर्णरेखा नदीचे खोरे, तर पश्चिमेला उखाही नावाची खोल दरी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला ग्वाल्हेर शहर पसरलेले आहे. ग्वाल्हेरच्या या किल्ल्याला पूर्व बाजूने एक आणि पश्चिम बाजूने दोन दरवाजे आहेत. हा किल्ला पूर्व बाजूने चढावयाचा झाल्यास दगडी चढ चढावी लागले कारण या बाजूने पायर्‍यांऐवजी जवळजवळ अडीच हजार फूट दगडी चढणीचाच रस्ता आहे.या चढावाच्या शेवटी सहा संरक्षक दरवाजे अणि चौक्या आहेत. "अलमगिरी दरवाजा", "हिंदोला दरवाजा" किंवा "बालगड पोल" , "भैरव दरवाजा", "गणेश पोल", "लक्ष्मण पोल", "हाती पोल" या नावांनी ते ओळखले जातात.
          किल्ल्यावर ५२ फूट उंच अशी एक जैन तीर्थंकाराची मूर्ती आहे. या किल्ल्यावर "दाताबंदी छोड" नावाचे संगमरवरी दगडाचे एक गुरुद्वारही आहे. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग यांचे स्मारक म्हणून जहांगिरने या गुरुद्वाराची स्थापना केली असे म्हटले जाते. या ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील अनेक मंदिरांपैकी "मानसालबहू" मंदिर आणि "तेली मंदिर" विशेष प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ऐंशी फूट उंच व तीस फूट लांब असलेले तेली मंदिर उभट आकाराचे आहे. त्याच्या कडांना सिंहमुखे आहेत आणि त्याच्या वेदीबंधावर शिवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत."सासबहू" किंवा "सहस्त्रबाहू" नावाने ओळखले जाणारे आणखी एक भव्य मंदिर ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर आहे. सासू-सूनेची मंदिरे म्हणून प्रसिद्ध असणार्‍या या मंदिरांपैकी मोठे मंदिरजमिनीपासून बारा फूट उंच चबुतर्‍यावर बांधले असून या मंदिराची लांबी शंभर फूट तर रुंदी त्रेसष्ट फूट आहे. हत्ती, फुले, वृक्ष, कुंभकळस, कीर्तिमुख आदि प्रकारचे सुंदर नक्षीकाम त्यावर पहायला मिळते. मंदिराचे छतही पहाण्यासारखे आहे या मंदिराच्या अर्ध्या मंडपाला कमळाच्या फुलाचा आकार दिला आहे. तर सभामंडपाच्या छतावर मधुछत्र कोरले आहे. आकाशातून विहार करणार्‍या गंधर्वांच्या मूर्तीही या ठिकाणी पहायला मिळतात. सासबहू मंदिरापैकी छोटे मंदिर सहा फूट उंच चबुतर्‍यावर बांधलेले असून ते शंभर फूट लांब आणि तेवीस फूट रुंद आहे. बारा स्तंभावर उभ्या असलेल्या या मंदिराच्या स्तंभांच्या वरच्या भागात निरनिराळी वाद्ये वाजविणार्‍या अप्सरा कोरलेल्या आहेत तर स्तंभाच्या पायाशी पद्मासन घातलेल्या गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत.
               या ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर हिंदू राजांनी बांधलेले पाच राजवाडे, व मुसलमान राजांनी बांधलेले दोन राजवाडे आहेत. त्यापैकी हातीपोल दरवाजातून आत गोल्यावर दिसणारा मानमंदिर राजवाडा अप्रतिम आहे. तीनशे फूट लांब व एकशे साठ फूट रुंद असा हा राजवाडा राजा मनसिंहाने सन १५०८ मध्ये बांधला आहे. दोन भागात विभागलेल्या या राजवाड्याच्या एका भागात राजा व त्याचा परिवार तर दुसर्‍या भागात त्याचे नोकरचाकर रहात.राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर दोन उंच मनोरे व त्यावर घुमट आहेत. या राजवाड्याला चार प्रमुख स्तंभ असून त्यावर एक मोठा घुमट उभारलेला आहे. वाड्याच्या भिंतीवर निळ्या पिवळ्या फरशांतर्गत छान कोरीव काम केलेले आहे. राजवाड्याच्या खिडक्या अर्ध अष्टकोनी असून त्यावरही छान नक्षीकाम केलेले आहे. दोन मजले असलेला हा राजवाडा अनेक शिल्पे, चित्रे, नक्षीकाम,कमानी, खिडक्यांच्या सुंदरजाळ्या यांनी नटलेला आहे.
           या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात मानससरोवर तलाव, सूरजकुंड तलाव, जोहार तलाव, कटोरा तलाव, सासबहू तलाव असे अनेक तलाव तसेच गुजरी बावडी, अनार बावडी, शरद बावडी नावाच्या विहिरी विपूल पाण्याने भरलेल्या आहेत.