गांडुळखत 

गांडूळ म्हटले कि "शी ! गांडूळ !" अशीच प्रतिक्रिया प्रथम उमटते.या लिबलिबित ओंगळ प्राण्याचा आपल्याला काही उपयोग होऊ शकेल हे खरेच वाटत नाही. पण खर तर गांडूळ  शेतकर्‍यांचा सच्चा मित्र आहे. अत्यंत कमी खर्चात उत्कृष्ट प्रकारचे खत हे गांडूळ मित्र शेतकर्‍यांना पुरवत असतात.हे गांडूळ खत शेणखतापेक्षा तीन ते चार पट परिणामकारक असते. गांडूळ रोज त्याच्या वजनाइतके खातात आणि तेवढीच विष्टा टाकतात.त्यालाच गांडूळ खत असे म्हणतात. यामध्ये नत्राचे प्रमाण दोन टक्के इतके असते. शेण आणि अर्धवट कुजलेला कचरा हे गांडूळांचे अन्न असते. त्याच्या जोडीला दाट सावली आणि ओलावा मिळाला कि गांडूळांची पैदास  छान होते. त्यामुळे हे खत तयार करण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागत नाहीत. याशिवाय गांडूळ त्याच्याशरिरातून एक चिकट स्त्राव सोडतात. त्यामुळे गांडूळ खत तयार होताना एक प्रकारचे पाणी मिळते त्याला व्हर्मिवॉश असे म्हणतात.. या व्हर्मिवॉशमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, संप्रेरक, आणि संजिवकाचे गुणधर्म आढळतात. त्याचाही वापर शेतकरी करू शकतात.
                       गांडूळखत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. १] दोन फूट खोल, दोन फूट रूंद व  आवश्यकतेनुसार लांब असा चर खणावा.त्यात प्रथम काडीकचरा, मग शेण असे क्रमाक्रमाने घालावे. त्यावर गांडूळ सोडून रोज पाणी शिंपडावे. २] पाच फूट रुंद व आवश्यकतेनुसार लांब असे प्लास्टिक जमिनीवर पसरावे. प्लास्टिकखाली आठवणीने मुंग्या येऊ नयेत म्हणून लिंडेन पावडर टाकावीं नंतर प्लास्टिकवर दोन ते तीन फूट उंचीपर्यंत क्रमाक्रमाने काडीकचरा व शेण टाकावे. मग त्यावर गांडूळ सोडावेत. ३] तीन फूट रुंद व दोन फूट उंच आणि आवश्यकतेइतका लांब हौद बांधावा. हा हौद बंधताना मध्ये खिडक्या ठेवाव्या. तळाला काँक्रीट करून त्याला व्हर्मिवॉश गोळा करण्यासाठी उतार द्यावा. काडीकचरा, शेण क्रमाक्रमाने घालावे व गांडूळ सोडावित. ४] जमिनीपासून एक फूट उंचीचे पाय लावून पाच फूट रुंद व दोन फूट उंच अशी हव्या तेवढ्या लांबीची एंगलफ्रेम तयार करावी.या फ्रेमला आतून मोनोफिलामेंट शेडनेट लावलेली जाळी लावावी.क्रमाक्रमाने काडीकचरा, शेणखत घालून गंडूळ सोडावित.