मालतीबाई बेडेकर 

 "कळ्यांचे नि:श्वास", "हिंदोळ्यावर", "बळी" आदी अनेक पुस्तकांतून स्त्रियांची दु:खे जगासमोर निर्भयपणे मांडणार्‍या परखड लेखिका म्हणून मालतीबाईंचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. पुण्याजवळच घोडनदी येथे एक ऑक्टोबर सन १९०५ मध्ये मालतीबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील अमेरिकन मिशन स्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. या अमेरिकन मिशन स्कूलमध्येच मालतीबाई म्हणजेच लहानपणीच्या बाळूताई खरे यांचे शिक्षण झाले. आणि त्यानंतर पदवीपर्यंतचे  शिक्षण हिंगणे येथील कर्वे वसतिगृहात राहून त्यांनी पूर्ण केले. पदवी मिळताच त्यांनी पुण्याच्या कन्याशाळेत संस्कृत, इंग्रजी, मराठी या विषयाच्या शिक्षिका म्हणून नोकरी केली. सन १९२८ मध्ये त्यांनी एम्.ए. ची पदवी मिळवली. सन १९३३ मध्ये मुंबईला येऊन त्याकाळचे बी.टी. म्हणजेच आताचे बी.एड.चे शिक्षण मालतीबाईंनी पूर्ण केले. आणि अण्णा कर्वे यांच्या हिंगणे संस्थेच्या प्रमुख म्हणून त्या नोकरी करू लागल्या. याच काळात त्यांनी समाजसेवेला आरंभ केला. अस्पृश्यता निवारण, प्रौढ साक्षरता, परिसर स्वच्छता आदि कामांना त्यांनी सुरुवात केली
 काहि काळांनंतर हिंगण्याची नोकरी सोडून त्या मुंबईला छबिलदास हायस्कूलमध्ये मुलीच्या शाळेत "लेडी सुपरीटेडेंट" म्हणून रुजू झाल्या. पुढे हीही नोकरी सोडून सन १९३७ मध्ये सोलापूर येथे "क्रिमिनल ट्राईब्झ सेटलमेंटस". यांच्या वेल्फेअर आणि शिक्षण विभागाच्या सुपरीटेडंट म्हणून नोकरी करू लागल्या. भटक्या लोकांची मुले आणि स्त्रिया यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रातील सर्व रिमांड होमच्याही त्या प्रमुख बनल्या. सन १९३८ मध्ये मालतीबाईंचे लग्न चित्रपट व्यवसायात असलेल्या विश्राम बेडेकरांशी झाले. सन १९४०मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याच्या संगोपनासाठी मालतीबाईंनी नोकरी सोडून दिली. याच दरम्यान प्रजा समाजवादी पक्षाचे काम त्या करू लागल्या. सन १९५२ मध्ये मालतीबाईंना "पीस मिशन"तर्फे रशियाला येण्याच आमंत्रण देण्यातआल. तेथून आल्यानंतर सन १९५६ मध्ये मालतीबाई "महिला सेवाग्राम या अनाथ स्त्रियांच्या आश्रमात विनावेतन काम करू लागल्या.
         एक अभ्यासू लेखिका म्हणून नावलौकिक मिळवणार्‍या मालतीबाईंचे वाचन दांडगे होते. वेद, पुराण, श्रृती, स्मृती, हिंदू कायदा, इत्यादिचा त्यांनी अभ्यास केला होता. या सार्‍या अभ्यासाच्या दरम्यान त्यांनी त्यात्या काळच्या समाजातील स्त्रियांची स्थिती हा विषय डोळ्यासमोर ठेवला होता. मौज, स्त्री, मनोहर, गृहलक्ष्मी, केसरी, तरुण भारत, दीपावली आदी अंकांतून त्यांनी आपले स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडले. "घराला मुकलेल्या स्त्रिया" या आपल्या पुस्तकाच लेखन करताना त्यांनी विविध परिस्थितीत रहाणार्‍या , विविध जातीच्या जवळजवळ पाच हजार स्त्रियांचा अभ्यास केला होता. आपले विचार समाजमान्य होणार नाहीत ; पुरुषप्रधान संस्कृतीला तर मुळीच मानवणार नाहीत; या जाणीवेनेच त्यांनी आपल सार लेखन विभावरी शिरूरकर, श्रद्धा, बीके, कटुसत्यवादिनी, एक भगिनी अशा विविध टोपण नावांनी केले.