माझे नाव ब्राह्मणी मैना 

     होय. "ब्राह्मणी मैना" असे नाव असणारा मी एक पक्षी आहे. आता मैना ठिक आहे; पण त्यापाठीमागे ब्राह्मणी शब्द पाहून तुम्ही नक्कीच चक्रावला असाल. पक्ष्यांमध्येसुद्धा ही जातीची टक्केवारी वगैरे प्रकरण असते की काय? अशी शंकाही तुमच्या मनात नक्कीच आली असेल. तर तसे मुळीच नाही. माझ्या काळ्या चकचकीत डोक्यावर असलेल्या काळ्या शेंडीमुळे मला हे नाव मिळाले आहे. याशिवाय माझ्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी काळी पिस असतात, म्हणून मला "भांगपाडी मैना" असही म्हणतात. माझ्या शरिराचा वरील भाग राखी रंगाचा तर खालील भाग तांबूस पिवळसर रंगाचा असतो. माझ्या पंखांना छान काळ्या कडा असतात. तर शेपूट पिंगट रंगाची असून तिच्या टोकाची पिसे पांढरी असतात. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे माझी चोच तिरंगी असते. चोचीचा पुढचा भाग पिवळा, मधला हिरवा तर शेवटचा भाग निळ्या रंगाचा असतो. माझे पाय पिवळ्या रंगाचे तर डोळ्याची बुबुळे हिरवट रंगाची असतात. अशा अनेक रंगाच्या नजराण्याबरोबरच मला सुमधूर आवाजाची देणगी लाभली असल्याने पूर्वी मला पिंजर्‍यात पाळले जात असे. पण खर तर मला बागा, झुडुपे, विरळ जंगले, येथे वास्तव्य करायला फार आवडते. आंबा, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुलिंब, अशा झाडांच्या ढोलीत किंवा मंदिरे, पॅगोडा, उंच कौलारू इमारतींच्या कौलांमध्ये मी घर बांधते. सुरक्षिततेच्या दृष्टिने आम्ही जमिनीपासून बारा ते पंधरा फूट उंचावर घर बांधणे पसंत करतो. सुकलेल्या पानांच्या थरावर बारीक गवत आणि मऊ पिस, लाकडाचा भुसा वापरून मी माझ्या ढोलीत छान गादी तयार करते. मे ते जून  या महिन्यात माझ्या या ढोलीत तुम्हाला निळसर हिरव्या रंगाची अंडी दिसतील. कारण हा काळ आमचा विणीचा काळ असतो. या अंड्यातून साधारणतः बारा-पंधरा दिवसांनी पिल्ल बाहेर येतात. आम्ही दोघे मिळून त्यांचा सांभाळ करतो. आमच्या नावात ब्राह्मणी शब्द असला तरी आम्ही मिश्र आहारी आहोत. विविध फळ, फुलातला मधुरस, याबरोबरच कीटक खाणेही आम्ही पसंत करतो.वड, पिंपळ,सिताफळ, अशा फळांबरोबर छोटे सरडे,पाली यांचा आस्वाद  घ्यायला आम्हाला खूप आवडते.