धुके आणि धूर 

हिवाळा म्हटला कि नजरेसमोर पसरते दाट धुके. थंडीने कुडकुडत बाहेर रस्त्यावर पाऊल टाकावे तर डोळ्यासमोरील काही अंतरावरील वस्तू अस्पष्ट दिसायला लागतात. धुक्यातल्या पाण्याच्या बाष्पकणांवरुन वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशाचे परावर्तन होऊन वाहन चालकांना समोरचे नीट दिसत नाही. त्यामुळे बस ट्रेन आदि वाहनांना आपल्या मार्गावरुन वाट काढून पुढे जाणे मुश्किल होऊन जाते. आणि नेहमीचा ओळखीचा रस्ता नकळत अनोळखी भासायला लागतो. थंडीत जेंव्हा हवेतील पाण्याच्या बाष्पाचे संद्रवण किंवा सांद्रीभवन होते तेंव्हा जमिनीवर आणि पाण्यावर हलकेसे ढग तयार होतात. यालाच आपण धुके असे म्हणतो. धुक्यामुळे वातावरणात छान धूसर पांढरी चादर पसरल्याचा आभास होतो. हवा प्रफुल्लित, प्रसन्न बनते.
    पण मोठमोठ्या शहरात मात्र अनेक आजारांना निमंत्रण देणारे धूरमिश्रित धुके तयार होताना दिसते. औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या शहरांमध्ये कारखाने, गिरण्या, विविध दुचाकी आणि चार चाकी वाहने यांतून बाहेर पडणार्‍या धुराच्या कणांभोवती बाष्पाचे संद्रवण होऊन धूरमिश्रित धुके तयार होते. धुक्यात मिसळलेली ही प्रदुषके सामान्य जीवनात भयानक आजार पसरवतात. कारण ही प्रदुषके धुक्यात मिसळून हवेत तरंगत रहातात. आणि श्वासाबरोबर मानवी शरिरात जातात.
             वाहनातून बाहेर पडणारा कार्बनमोनॉक्साइड वायू विषारी तर आहेच; शिवाय तो ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. कार्बनमोनॉक्साइडचा हवेत तरंगणार्‍या हायड्रॉक्सील मूलकांशी संयोग झाला की हरितगृह परिणामकारी असा मेथेन वायू तयार होतो. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात खूप वाढ होते. हा कार्बनमोनॉक्साइड वायू श्वासाद्वारे अपल्या शरिरात गेला तर रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर संयुग तयार करतो. आणि त्यामुळे शरिरातील पेशींना होणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात व्यत्यय येतो.
             औद्योगिक शहरातील धुक्यात मिसळणारा आणखी दूषित वायू म्हणजे सल्फर डाय ऑक्साईड हा वायू सुद्धा वाहने, गिरण्या, कारखाने आदिमधून बाहेर पडतो. धुक्यातील आर्द्रतेमुळे त्याचे गंधकाम्लात रुपांतर होते.आणि हे गंधकाम्ल किंवा स्वतः सल्फर डाय ऑक्साईड वायू श्वासातून आपल्या शरिरात गेल्यास फुफ्फुसांचे आजार संभवतात. शिवाय धातूवर या गंधकाम्लाची क्रिया होऊन धातू गंजतात.
          वाहनांच्या धुरातून बाहेर पडणरा तिसरा वायू म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड वायू. धुक्यातील बाष्पाच्या संपर्कामुळे नायट्रोजन ऑक्साईडपासून नायट्रिक आम्लाची निर्मिती होते. श्वसनावाटे हे आम्ल शरिरात गेल्यास फुफ्फुसांना अपाय होतो. दमा, कर्करोग यासारख्या आजारांना ते आमंत्रण असते.
             वाहनातील पेट्रोलमध्ये जर टेट्रेइथाईल लेड मिसळलेले असेल तर वाहनांच्या धुरातून शिशाची संयुगे बाहेर पडतात आणि हवेत मिसळतात. याशिवाय दगडी कोळशाच्या धुरातील फॉस्फरस पेंटॉक्साईड व सल्फर डाय ऑक्साईड धुक्यात मिसळतात. आणि विविध प्रकरे आपल्या शरिरावर अपाय करतात. आणि म्हणून असे हे अपायकारक धूरमिश्रित धुके तयारच होणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.