कोतवाल पक्षी 

'शेतकर्‍यांचा मित्र" म्हणून कोतवालाची ओळख करून द्यावी लागेल. कारण शेतीचे नुकसान करणारे कीटक हेच याचे अन्न असते. त्यामुळे शेताच्या कुंपणावर, गुरांच्या पाठीवर किंवा वीजेच्या तारांवर बहुधा कोतवाल पक्षी बसलेले आढळतात. तसे कोतवाल पक्षी ओळखायला सोपे असतात. चमकदार काळा रंग, दुभंगलेली शेपटी हे याच खासवैशिष्ट्य. तो साधारणतः एकतीस से.मी. आकाराचा, सडपातळ अणि चपळ असतो. भारताप्रमाणेच  हा पक्षी पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, चीन, म्यानमार, श्रीलंका आदि ठिकाणी सापडतो. कोतवालचे शास्त्रीय नाव "डिक्रूरस मॅक्रोसेर्कस" असे आहे. तर इंग्रजीमध्ये त्याला "ब्लॅक ड्रोंगो" किंवा "किंग क्रॉ" असे संबोधले जाते. तर हवेत उड्या मारून गुरांच्या पाठीवरील कीटक, गोचिड खाण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला संस्कृतमध्ये "गोप्रेरक" असे म्हटले जाते. नाकतोडे, मुंग्या, चतुर , फुलपाखरे, वाळवी, मधमाशा, भुंगे, अळ्या याबरोबरच कोतवाल पांगारा, पळस, काटेसावरीच्या फुलातला रसही तो आवडीने खातो. इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाणे, इतरांच्या आवाजाची नक्कल करणे यातही कोतवालचा प्रथम क्रमांक लागतो.
 कोतवाल नर आणि मादी सारखेच दिसतात. एप्रिल ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा काळ असतो. या काळात दोघेही सकाळी छान गात असतात. नर कोतवाल हवेमध्ये विविध कसरती करून मादीला आकर्षित करतात. एकमेकांची पसंती झाली की दोघे मिळून घरटे बांधण्याच्या तयारीला लागतात. गवत आणि पातळ काडड्या गोळा करून वाटीसारखे शंकूच्या आकाराचे घरटे ते बनवतात. काटक्या चिकटवायला कोळ्याच्या जाळ्याचा तर आतील मऊ गादीसाठी खसखशीची मुळे, घोड्यांचे केस,मऊ गवत इत्यादीचा वापर केला जातो. एप्रिल महिन्यात मादी पांढर्‍या रंगावर तपकीरी ठिपके असलेली अंडी घालते. साधारण चौदा ते पंधरा दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मग पुढे चार-पाच दिवस त्यांना उब दिली जाते. चौथ्या दिवशी पिल्लांना बारीक पिसे येतात. आठ दिवसाचे झाल्यावर पिल्लांचे डोळे उघडतात. बारा दिवस होईपर्यंत त्यांचे वजन वाढत असते. या काळात नर मादी आणि त्यांची अगोदरची पिल्ले या छोट्या पिल्लांना भरवण्याचे काम जवळजवळ महिनाभर करतात. पंधरा दिवसानंतर पिल्ल उडायला समर्थ बनतात. तीन आठवड्यानंतर त्यांना दुभंगलेली शेपूट येते. दोन वर्षापर्यंत ही पिल्ले वयस्क होतात . या काळात त्यांना आपले भक्ष पकडायला , खाद्य मिळवायला शिकवले जाते. त्यासाठी हवेत झाडाची पाने सोडून ती त्यांना पकडयला लावतात. आपल्या घरट्याच्या हद्दीत घार, सासाणा वा गरुडासारखा शिकारी पक्षी आला तर कोतवाल त्याला लगेचच हुसकावून लावतो. आणि आपल्या पिल्लाचे रक्षण करतो.