शांतिनिकेतन 

रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ हे एक नामांकित जमिनदार होते. आपल्या जमिनीच्या कामासंबंधात फिरताना त्यांच्या दृष्टोपत्तीस आलेला उजाडमाळ त्यांना आवडला त्यांनी तो विकत घेतला आणि सन १८६३ मध्ये त्यांनी तेथे आपल्या घराची म्हणजेच शांतिनिकेतनची स्थापना केली. सन १९०१ पासून रवींद्रनाथ शांतिनिकेतनच्या कामकाजाकडे लक्ष देऊ लागले. कलकत्त्याच्या हावडा रेल्वे स्टेशनवरून बोलपूरला जाणारी गाडी पकडून बोलपूरला उतरले की तिथून तीन कि.मी. वर शांतिनिकेतन आहे. शांतिनिकेतनच्या या शांत परिसरात खूप काही पहाण्यासारखे आहे. रवींद्रनाथ वापरत असलेली गाडी येथे पहावयास मिळते. तेथे "रवींद्रसंग्रहालय" आहे. ''उदयन", "विचित्र कोणार्क", "पुनश्च" अशी घरे येथे आहेत. यापैकी उदयन नावाच्या घरात रवींद्रनाथांचे देहावसान झाले. या घरांमध्ये अनेक चित्रे  व छायाचित्रे यांच्या माध्यमातून रवींद्रनाथांच्या जीवनचरित्राचा परिचय करून देण्यात आला आहे. रवींद्रनाथांची हस्ताक्षरे, त्यांनी काढलेली चित्रे, त्यांना मिळालेल्या भेट वस्तू, त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे यांचे प्रदर्शन येथे मांडण्यात आलेले आहे.
  शांतिनिकेतनमधील उघड्यावर भरत असलेली गुरुकुल पद्धतीची शाळा हे शांतिनिकेतनच खास वैशिष्ट्य आहे. येथे वर्ग झाडाखाली भरतात. आणि अभ्यासक्रमही ठराविक नसतो. रवींद्रनाथांनी चालू केलेली ही आश्रम शळा आता "विश्वभारती विद्यपीठ" म्हणून जगप्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीबरोबरच  पाश्चिमात्य संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचा येथील शिक्षणात समावेश करण्यात आला आहे. जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आंतरराष्ट्रीय संशोधनाचे ते केंद्र बनले आहे. भारताचे पंतप्रधान या विश्वभारती विद्यापीठाचे कुलुगुरू असतात. याच परिसरात भास्कर राम किंकर या शिल्पकाराने बनविलेले "अनिवार्ण शिखा" नावाचे एक उत्कृष्ट शिल्प पहावयाल मिळते. शांतिनिकेतनच्या परिसरात "उपासना गृह", "तालध्वज गृह", "मृणालिनी आनंद शाळा", "गौर प्रांगण", "तीन पहाड", आमकुंज" अशा विविध वास्तू आहेत. त्यापैकी उपासनागृहात ब्राह्मोसमाज पद्धतीने दर बुधवारी प्रार्थना सभा भरते. तालगृहात महिला संघाचे काम चालते. "तीन पहाड येथे पूर्वी एक तळे होते. नंतर  ते बुजऊन तेथे एक चौथरा बनविण्यात आला आहे. त्यावरून रवींद्रनाथ  सायंकाळच्या सूर्यास्ताची शोभा पहात असत. शांतिनिकेतनमध्ये विविध सण उत्सव साजरे करण्याचे ठिकाण म्हणजे आमकुंज. वैशाख महिन्यात येणारा "रवींद्र जन्मोत्सव", श्रावण महिन्यात "वृक्षारोपण" , शरद ॠतूत पंधरा दिवसांचा "शारदोत्सव", पौष महिन्यातील लोकसंगीत, हस्तकला, चित्रकला, संगीत, शिल्पकला यांचे प्रदर्शन, याशिवाय "माघ मेळा", "वसंतोत्सव" हे सण मोठ्या उत्साहाने आणि सर्वांच्या सहभागाने शांतिनिकेतनमध्ये साजरे केले जातात. शांतिनिकेतनच्या मोठ्या मैदानापुढे भव्य रंगमंच त्यासाठी तयार करण्यात आला आहे. रवींद्रनाथांचे मूळचे घर म्हणजे मृणालिनी आनंद शाळा. आता त्या ठिकाणी शांतिनिकेतन मधील कर्मचार्‍यांच्या मुलांना गायन, नृत्य, चित्रकला, खेळ यांचे शिक्षण दिले जाते. सिंह संसदेमध्ये मुलांच्या परीक्षा घेतल्या जातात. पदवीदान समारंभही येथेच होतो. येथील पदवीदान समारंभात पदवीबरोबरच सप्तपर्णी वृक्षाची एक फांदी विद्यार्थ्याला भेट म्हणून दिली जाते. नूतन घर व आलापिनीमध्ये महिलांच्या रहाण्याची सोय करण्यात आली आहे. "दिनंतिका" नावाच्या वास्तूमध्ये  रवींद्रनाथांची "चहा" वर केलेली कविता भिंतीवर लिहिलेली आहे. या ठिकाणी अध्यापक वर्ग चहापानाबरोबर विविध विषयांवर  चर्चा करतात. "चिना भवन" नावाच्या घरात भारत-चीन संस्कृतीचा अभ्यास केला जातो. याशिवाय शांतिनिकेतनमध्ये शामेंद्र शिशु पाठागर, चैति मुलांचे वसतिगृह, कलाभवन, नाट्यघर, संगीतभवन केंद्रीय ग्रंथागार, अशा वास्तू बघण्यासारख्या आहेत.