ह. ना. आपटे 

आधुनिक मराटीचे आद्य कदंबरीकार म्हणून ह. ना. आपटे यांना गौरविले जाते. सरकारी नोकरीचा रूळलेला राजमार्ग सोडून आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजसुधारणेच्या दृष्टीने साहित्य निर्मितीसाठी करणारे श्रेष्ठ कादंबरीकार म्ह्णून ते ओळखले जातात. हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ मध्ये खानदेशातील 'पारोळे ' या गावी झाला. त्यांचे आजोबा चिमणाजीपंत खानदेशात महालकरी होते. पण त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे हरीभाऊंच्या वडिलांना इंदूर येथे नोकरी पत्करावी लागली. नंतर ते पुण्याला आले. हरीभाऊंची आई लक्ष्मीबाई खानदेशातील एका सधन मामलेदाराची कन्या होती. हरीभाऊंचे शिक्षण नानाशंकरशेठ यांच्या शाळेत झाले . विद्यार्थी दशेतच हरीभाऊंनी आपल्या लेखनाला सुरूवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी 'पुरी हौस फिटली' ही कथा लिहिली. सन १८८३ मध्ये मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये नाव दाखल केले. याच सुमारास म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला.

हर्बट स्पेन्सरच्या शिक्षणविषयक विचारांनी ते भारलेले होते. बहुश्रुतता, अफाट वाचन आणि स्वरातील गोडवा या गुणांमुळे त्यांना अनेक मित्र मिळाले.मिल, स्पेन्सर, चार्लस डिकन्स, शेक्सपीयर आदि अनेक मान्यताप्राप्त लेखकांच्या पुस्तकांचे वाचन त्यांनी केले. आगरकर, लोकमान्य टिळक यांसारख्या शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सरकारी नोकरी करायची नाही हे त्यांनी अगोदरच ठरविले होते. त्यामुळे आजकालच्या सामाजिक स्थितीवर लिहावे या हेतुने त्यांनी आपले लेखन चालू केले. त्याकाळच्या 'मनोरंजन', 'करमणूक' आदि मासिकांतून ते लेखन करीत. सन १८८५ ते सन १९१७ पर्यंतची ३२ वर्षे त्यांनी विपुल लेखन करून मराठी ललित साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी त्यांनी इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच जर्मन आदि भाषांचाही अभ्यास केला.

हरीभाऊंच्या लेखनाला एक बैठक होती. लहानपणापासून समाज व व्यक्ती यांचे सूक्ष्म निरिक्षण करण्याची सवय, अंतःकरणापासून लेखक होण्याची इच्छा, समाजाच्या भल्याची काळजी, स्त्रियांच्या मागासलेपणाबद्दल खंत, आणि या सर्वांच्या जोडीला अखंड वाचन व मनन यामुळेच हरीभाऊ अद्वितीय लेखक ठरले. हरीभाऊंचे लेखनकौशल्य खरे पणाला लागले ते त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांपासूनच. काल्पनिक व ऐतिहासिक प्रसंगांचे व व्यक्तीचे बेमालूम मिश्रण त्यात आढळते. 'म्हैसूरचा वाघ', 'उषःकाल', 'केवळ स्वराज्यासाठी','रूपनगरची राजकन्या' ,' गड आला पण सिंह गेला', 'सूर्योदय', 'सूर्यास्त', 'मध्यान्ह','सूर्यग्रहण', 'कालकूट' ,'वज्राघात', अशा एकूण अकरा कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. सन १९१२ मध्ये अकोला येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कॉलेजची परीक्षा उत्तीर्ण न झालेले हरीभाऊ स्वकर्तृत्वाने मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या परीक्षेचे परीक्षक बनले. सार्वजनिक जीवनातही हरीभाऊंनी मोठी कामगिरी बजावली. सन १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी केलेल्या समाजसेवेमुळे सरकारने त्यांना "कैसर ए हिंद " हे पदक दिले. "नूतन मराठी विद्यालय" व "न्यू पूना कॉलेजच्या  स्थापनेतही त्यांचा हातभार होता. ३ मार्च १९१९ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला