चंदन 

चंदन म्हटले की " ओम गं गणपतये नमः |" असा मंत्र म्हणत सहाणेवर चंदन उगाळणारी आजी डोळ्यापुढे उभी रहाते. अगदी मनापासून ती हे काम करायची. केवळ देवपूजेसाठीच नव्हे तर कोणाला ताप आला, कोणाचे डोके दुखत असेल तर लगेच चंदन उगाळून ती डोक्याला लावत असे. चेहर्‍यावर मुरम आली, उबाळू किंवा गळू झाले, भाजल किंवा मुका मार लागला तरी आजीच एकच औषध - चंदन.वयात आल्यावर आम्ही मुली मग आजीकडेच  उगाळलेल चंदन मागून चेहरा उजळ करीत असू. चंदनाच तेल, चंदनाच्या उदबत्त्या चंदनाचा साबण, चंदनाचा परफ्युम अशा कितीतरी गोष्टी नंतर हळूहळू आमच्या जीवनाच्या अविभाज्य घटकच बनल्या.
 वनस्पतीशास्त्रात "सांटालूम अ‍ॅल्ब्युम" नाव असलेल्या या चंदनाच्या झाडाला इंग्रजीत "सँडलवूड" अस म्हटल जात. चंदनाच झाड प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळत. त्याच मूळ कर्नाटकात आहे. म्हैसूर शहर तर "चंदनाचे शहर" म्हणूनच ओळखल जात. त्याशिवाय तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथेही चंदनाची झाडे आहेत. कर्नाटकात त्याला "श्रीगंधा" तर तामिळनाडूत "श्रीगंधम" म्हणून ओळखल जात.मलेशिया, इंडोनेशिया, सिलोन येथेही चंदनाची वाढ होते. आता ऑस्ट्रेलिया, थायलंड हे देशही  चंदनाची लागवड करू लागले आहेत.
            चंदनाच झाड साधारणतः वीस मीटर उंच वाढत.आणि त्यापासून पन्नास किलो इतक लाकूड मिळू शकत. चंदनाच्या फळाच्या बीपासून चंदनाची लागवड केली जाते. स्वभावतःच थंड असलेल्या या चंदनाच्या झाडाची रोप जास्त उष्णता सहन करू शकत नाहीत.  शिवाय पॅथजेनिक फंगस , फ्युसेरियम,   फाइटोपथेरा आणि नीमेटोड्स इत्यादि किडींपासूनही रोपांना धोका असतो. त्यामुळे रोपांची वाढ होईपर्यंत फार काळजी घ्यावी लागते. हे झाड जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचे झाले की त्याच्या गाभ्यात सुगंध कोशिका तयार होऊ लागतात. आणि तीस ते चाळीस वर्षानंतर ते झाड तेल काढण्यास योग्य असे होते.
                    नारळाच्या झाडाप्रमाणेच या चंदनाचेही बहुविध उपयोग आहेत. चंदनाच्या बियांचा रंगनिर्मितीसाठी वापर केला जातो. त्याची फळ चवीने खाल्ली जातात. चंदनाची पान जनावरांना खाद्य म्हणून पुरवली जातात. चंदनाच ला़ऊड तर बहुविध उपयोगी आहे. ते एक उत्तम इंधन आहे. हे ला़ऊड मजबूत व  टिकावू असल्याने अतिशय सुंदर अशा कोरीव कलाकृती त्यापासून बनवल्या जातात.या लाकडाच्या सालीत बारा ते चौदा टक्के टॅनिन असत. त्यामुळे टॅनिन उद्योगाकडूनही त्याला मागणी असते.चंदनाच्या खोडापासून तसेच मुळांपासून तेल मिळते. चंदनाचा भुसा लाकडी पिंपात भरून त्यावर दाब देऊन तेल काढल जात.त्यानंतर जो चोथा उरतो त्यापासून उदबत्या तयार केल्या जातात. चंदनाच तेल सौंदर्यप्रसाधन, औषध, अत्तर, साबण यात वापरल जात.
             शास्त्रज्ञांच्या मते चंदन हा एक विषहीन, शरिराचा दाह शमविणारा आणि मन शांत करणारा पदार्थ आहे त्यामुळे चंदनाचा वापर अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केला जातो. १.] कपाळाला चंदनाचा तिलक लावून कपाळाच्या मध्यभागी असणार्‍या संप्रेरक ग्रंथींचे आरोग्य सांभाळले जाते. २.] लघवीची जळजळ, मूत्राशयाची सूज या विकारांवर चंदनाच्या तेलाचे दोन थेंब दूधाबरोबर दिले जातात. ३.] परमा, गोनोरिया, ल्युकोरिय इत्यादि लैंगिक आजारात चंदनासव नावाच्या चंदन असलेल्या आयुर्वेदिक औषधाचा वापर केला जातो. ४.] टी.बी., निद्रानाश, धातुक्षय अशा आजारांवर चंदन एक बलवर्धक, शक्तीवर्धक म्हणून गुणकारी ठरते.५.] उष्माघातापासून बचाव करण्यासाठीही चंदनाचा वापर होतो. ६.] चंदनाच्या सौम्य, शीतल सुगंधामुळे त्याचा वापर साबण, क्रीम, अत्तर, अगरबत्ती, धूप यामध्ये केला जातो. ७.] ताप, डोकेदुखी, शरिरावरील सूज यावरही चंदनाचा लेप गुणकारी आहे. ८.] चंदनामध्ये असलेले बीटी-सँटालोल तारुण्य टिकवून वार्धक्य दूर ठेवण्यास मदत करते.