आदि शंकराचार्य 

सन ७८८ मध्ये केरळमधील "कलाडी" नावाच्या गावी शंकराचार्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी शंकराचार्यांनी संन्यास घेतला. आणि वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मसूत्रे, उपनिषदे आणि भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास केला. लहान वयातच त्यांनी सारा भारत देश पालथा घातला. ठिकठिकाणाच्या धर्ममार्तंडांना आपल्या ज्ञानाने त्यांनी प्रभावित केले. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर अशा विविध संप्रदायात विभागलेल्या हिंदू धर्माला एकत्रित करून धर्माची एक समान रूपरेखा असावी असे त्यांना या भ्रमंतीनंतर वाटू लागले. त्यासाठी शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. आपल्या संप्रदायाचे आराध्य दैवत मध्यभागी ठेवून इतर संप्रदायांच्या दैवतांची चार बाजुला प्रतिष्ठापना करून पूजा करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. शंकराचार्यांनी आपल्या विचारांचा प्रचार करण्याच्या हेतुने दक्षिणेत शृंगेरी, उत्तरेला बद्रिनाथ, पूर्वेला पूरी, आणि पश्चिमेला द्वारका या भारताच्या चार टोकांना चार मठ स्थापन केले. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या या पीठांच्या प्रमुखांना आजही शंकराचार्य म्हणून संबोधले जाते. "ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या" हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.त्यांचे तत्त्वज्ञान "अद्वैतवाद" या नावाने प्रचलित आहे. मरगळलेल्या हिंदू धर्माला उर्जितावस्था देण्याचे महान कार्य करणार्‍या या तत्त्ववेत्याने वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला.